पाऊस सरासरी गाठतोय पण दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 05:00 AM2021-07-25T05:00:00+5:302021-07-25T05:00:27+5:30

मागील दोन दिवसांच्या कालावधीत विदर्भात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना एकदाही पूर आला नाही. परिणामी, सिंचन प्रकल्प, तलाव, बोड्यांमध्येसुद्धा मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 

Rainfall is approaching average but wait for heavy rain | पाऊस सरासरी गाठतोय पण दमदार पावसाची प्रतीक्षा

पाऊस सरासरी गाठतोय पण दमदार पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देरोवणीला आला वेग : मात्र सिंचन प्रकल्पात मोजकाच साठा

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : तब्बल पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात पावसाने दोन दिवस हजेरी लावली. त्यामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तर अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने पावसाने सरासरी जरी गाठली असली तरी अद्यापही पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मागील दोन दिवसांच्या कालावधीत विदर्भात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना एकदाही पूर आला नाही. परिणामी, सिंचन प्रकल्प, तलाव, बोड्यांमध्येसुद्धा मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 
जिल्ह्यात १ जून ते २४ जुलै या कालावधीत ५१४.० मिमी पाऊस पडतो. यंदा याच कालावधीत ४६४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच आतापर्यंत सरासरीच्या ९०.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे १० टक्के पावसाची तूट अजूनही कायम आहे. जुलै महिना संपण्यास पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तर ऑगस्ट महिन्यापासून पाऊस कमी होतो. 
यंदा आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच रोवण्या झाल्या आहेत. तर ७० टक्के रोवण्या शिल्लक आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांच्या रोवण्या आटोपल्या आहेत. पण वर थेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा हवामान विभागाचा अंदाज सुरुवातीपासूनच फोल ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे. 

५५ हजार हेक्टरवर राेवण्या पूर्ण 
यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. यापैकी २४ जुलैपर्यंत ५५ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली असून, अजून १ लाख २६ हजार हेक्टरवरील रोवण्या होणे शिल्लक आहे. त्यामुळे रोवणीला वेग येण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

 

Web Title: Rainfall is approaching average but wait for heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.