गुजरातवरुन परतलेल्या २१ तरुणींची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:16+5:30

गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील २१ तरुणी गुजरात येथील विविध कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे तेथील कंपन्या बंद असल्याने त्यांचा रोजगार सुध्दा बंद होता. तर लॉकडाऊनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या तरुणींचे कुटुंबीय सुध्दा चिंतेत होते. त्यामुळे या तरुणींनी आपल्या स्वगृही जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली.

Inconvenience to 21 young women returning from Gujarat | गुजरातवरुन परतलेल्या २१ तरुणींची गैरसोय

गुजरातवरुन परतलेल्या २१ तरुणींची गैरसोय

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाला मदतीचा विसर : सामाजिक संस्थांनी केली जेवणाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी देशभरातील उद्योगधंदे बंदे असल्याने तिथे असलेले जिल्ह्यातील नागरिक आता आपल्या स्वगृही परतत आहे. रविवारी (दि.१७) सकाळी गुजरात येथून एसटी बसने गोंदिया येथे पोहचलेल्या तरुणींना स्थानिक प्रशासनाची कुठलीच मदत न मिळाल्याने त्यांची गैरसोय झाली.
गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील २१ तरुणी गुजरात येथील विविध कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे तेथील कंपन्या बंद असल्याने त्यांचा रोजगार सुध्दा बंद होता. तर लॉकडाऊनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या तरुणींचे कुटुंबीय सुध्दा चिंतेत होते. त्यामुळे या तरुणींनी आपल्या स्वगृही जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली.
परवानगी मिळाल्यानंतर या सर्व २१ तरुणी बसने १५ मे रोजी गुजरात नवापूर येथून गोंदियासाठी रवाना झाल्या. यानंतर त्या रविवारी सकाळी ७ वाजता गोंदिया येथील बस स्थानकावर पोहचल्या.येथे पोहचल्यानंतर या तरुणींना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी अथवा त्यांची विचारपूस करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी पोहचला नाही. त्यामुळे या तरुणी सकाळपासून तशाच उपाशी तापाशी उन्हात बसस्थानकावर उभ्या होत्या.
ही बाब काही स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर गोंदिया येथील सामाजिक संस्थेतर्फे त्यांच्या नास्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. स्थानिक तहसील प्रशासनाला फोनवरुन याप्रकाराची माहिती दिल्यानंतर अधिकारी बसस्थानकावर पोहचले आणि त्यानंतर या तरुणींना बसेस त्यांच्या गावाला सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र यासर्व प्रकारामुळे गुजरातवरुन परतलेल्या या २१ तरुणींची प्रचंड गैरसोय झाली.

प्रशासनाच्या मदतीच्या दाव्यात किती तथ्य
बाहेर जिल्ह्यात आणि राज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. तसेच विविध जिल्ह्यातून बसने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही पोहचविण्यासाठी मदत केली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र रविवारी सकाळी गुजरातवरुन जिल्ह्यात परतलेल्या तरुणींची झालेली गैरसोय पाहता प्रशासनाच्या मदतीच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे देखील दिसून आले.

स्थलांतरितांना स्वयंसेवी संस्थांचीच मदत
शासन व प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या स्वगृही पोहचविण्यासाठी बसेस आणि रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अजुनही स्थलांतरित मजुरांचे लोंढे पायीच आपल्या गावाकडे परतत आहे. रविवारी सुध्दा जिल्ह्यातून स्थलांतरित मजूर आपल्या गावाकडे जातांना पाहयला मिळाले. या मजुरांना शहरातील विविध स्वयंसेवी संस्थाकडून अन्नदान केले जात होते. त्यामुळे स्थलांतरितांना स्वयंसेवी संस्थाचीच मदत होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Inconvenience to 21 young women returning from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.