बीजीडब्ल्यू रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:00 AM2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:06+5:30

दोन वर्षांपूर्वीच या रुग्णालयाच्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे महत्त्व अधिक वाढले. मात्र या रुग्णालयातील सोयी सुविधांचा अभाव आणि माता व बालमृत्युचे वाढते प्रमाण यामुळे हे रुग्णालय सदैव चर्चेत राहते.

Health of BGW hospital at risk | बीजीडब्ल्यू रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात

बीजीडब्ल्यू रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात

Next
ठळक मुद्देप्रवेशाव्दारासमोर घाणीचे साम्राज्य : डासांचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रुग्ण आजारी पडल्यानंतर तो बरा होण्यासाठी रुग्णालयात दाखल होतो. मात्र येथील बाई गंगाबाई (बीजीडब्ल्यू) रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आणि आवारात घाणीचे साम्राज्य असल्याने येथे उपाचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील आदिवासीबहुल, दुर्गम आणि ग्रामीण भागातील गोरगरिब रुग्णांना नि:शुल्क आरोग्याची सुविधा मिळावी, यासाठी शासनाने येथे बीजीडब्ल्यू रुग्णालयाची स्थापना केली. सुरूवातीला १२० खाटांचे असलेले हे रुग्णालय आता २०० खाटांचे झाले आहे. महिला आणि बाल रुग्णालय असल्याने जिल्हाभरातून दररोज २०० हून अधिक रुग्ण येथे उपचारासाठी येतात. दोन वर्षांपूर्वीच या रुग्णालयाच्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे महत्त्व अधिक वाढले. मात्र या रुग्णालयातील सोयी सुविधांचा अभाव आणि माता व बालमृत्युचे वाढते प्रमाण यामुळे हे रुग्णालय सदैव चर्चेत राहते.
रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम रुग्णालय प्रशासनाचे आहे. मात्र, या रुग्णालयाचा फेरफटका मारला असता रुग्णांच्या आरोग्याचे तर सोडाच प्रशासनाचा बोजवारा उडाला असल्याची बाब पुढे आली.
प्रवेशाव्दारासमोर कचऱ्याचे ढिगारे
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची भव्य इमारत पाहुन कुणालाही एवढी सुंदर इमारत गोंदियात असल्याचे आश्चर्य वाटेल. मात्र जसे तुम्ही रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ पोहचाल तेव्हा इमारतीवरुन ठरविलेली कल्पना चूकीची ठरेल. प्रवेशव्दारासमोर मोठ्या प्रमाणात केरकचऱ्याचे ढिगार असून त्यावर डुकरांचा वावर असतो. नाल्यांचे सांडपाणी देखील तिथेच साचून असल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य कितपत सुरक्षित असेल याची कल्पना न केलेली बरीच.
जबाबदारी कुणाची
स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेची आहे. तेवढीच जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. मात्र या दोघांचेही दुर्लक्ष झाले असल्याने रुग्णांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी आणि विविध संघटना सदैव तत्पर असतात. काही राजकीय पक्ष एखाद्या कामाचे श्रेय घेण्याची संधी सोडत नाही. मात्र बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या परिसरातील केरकचरा आणि घाणीचा विषय कुणीही गांभीर्याने घेत नाही.

Web Title: Health of BGW hospital at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.