गोंदियात वार्ड बांधकामाअभावी रुग्णांवर जमिनीवर झोपण्याची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:22 PM2020-07-07T17:22:44+5:302020-07-07T17:25:05+5:30

गोंदिया येथे मेडिकल कॉलेज सुरू होवून चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. या दोन्ही रुग्णालयाची जागा अपुरी पडत असल्याने आता रुग्ण दाखल करण्याची समस्या निर्माण झाली आहे.

In Gondia, due to lack of ward construction, patients have to sleep on the ground | गोंदियात वार्ड बांधकामाअभावी रुग्णांवर जमिनीवर झोपण्याची पाळी

गोंदियात वार्ड बांधकामाअभावी रुग्णांवर जमिनीवर झोपण्याची पाळी

Next
ठळक मुद्देमेडिकलमधील प्रकाररुग्णांच्या नातेवाईकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून येथील शासकीय महाविद्यालयातील (मेडिकल) दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मेडिकलच्या खाटा फुल झाल्याने रुग्णांवर चक्क जमिनीवर बेड टाकून उपचार केले जात असल्याचा प्रकार मंगळवारी (दि.७) उघडकीस आला. रुग्णांना दाखल करण्यासाठी व्यवस्था नसल्याने आता मेडिकल व्यवस्थापनासमोर सुध्दा पेच निर्माण झाला आहे.
गोंदिया येथे मेडिकल कॉलेज सुरू होवून चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही इमारतीचे बांधकाम सुरू न झाल्याने मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. या दोन्ही रुग्णालयाची जागा अपुरी पडत असल्याने आता रुग्ण दाखल करण्याची समस्या निर्माण झाली आहे.

मेडिकलमध्ये सध्या रुग्णांना दाखल करण्यासाठी वार्ड क्रमांक पाच हा एकमेव वॉर्ड आहे.या वाडार्तील खाटांची क्षमता केवळ ३५ आहे. जिल्हाभरातून येथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता ते फारच अपुरे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कोरोनाचा देखील प्रादुर्भाव असल्याने मेडिकलमध्ये दाखल होणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील बाह्यरुग्ण तपासणी विभागात सध्या दररोज ६०० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. विविध आजाराच्या रुग्णांची संख्या सुध्दा वाढत आहे. तर काही खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे येथील वार्डात जागा अपुरी पडत असल्याने रुग्णांना खाली बेड टाकून उपचार केले जात असल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकारावर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सुध्दा संताप व्यक्त केला.

यासंदर्भात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वार्डात क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखीव ठेवण्यात आले. तेथे शासकीय दरानुसारच रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. या ठिकाणी रुग्णांना जाण्यास सांगितले जात आहे, मात्र रुग्ण जाण्यास तयार नसल्याने येथील वार्डात गर्दी वाढली असल्याचे सांगितले.

प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले बांधकाम
मेडिकलमध्ये रुग्णांना दाखल करण्यासाठी वाडार्ची समस्या लक्षात घेता वर्षाभरापूर्वी बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या आवारात चार वार्डचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाला करायचे होते. मात्र यासाठी शासनाची प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने हे बांधकाम रखडले असल्याची माहिती आहे.

लोकप्रतिनिधींनी दिला होता इशारा
दोन महिन्यांपूर्वीच स्थानिक लोकप्रतिनिधीनी मेडिकल आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाचा दौरा करुन रुग्णांवर खाली बेड टाकून उपचार केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र मंगळवारी मेडिकलमध्ये नेमका हाच प्रकार घडल्याने आता लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
 

Web Title: In Gondia, due to lack of ward construction, patients have to sleep on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य