हुंडा मुलांना घ्यायचा असतो की मुलांच्या आई-वडिलांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 05:00 AM2021-09-25T05:00:00+5:302021-09-25T05:00:07+5:30

हुंडा मागणी करणे हा समाजाला लागलेला कलंक मिटविण्यासाठी कडक कायद्याची निर्मिती झाली असली, तरी या कायद्याला न जुमानता हुंडा मागण्याची प्रथा देशात सुरूच आहे. तो हुंडा पैशाच्या रूपाने किंवा साहित्याच्या रूपाने मागितला जात आहे. हुंडा स्वीकारण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. हुंडा देण्यास मुलीचे वडील सक्षम नसले, तर त्यांच्या मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले जात आहे. लग्न करताना नवऱ्या मुलाला जणू मुलीचे वडील हुंडारूपाने जणू विकतच घेत आहेत.

Do you want to take the dowry to the children or to the parents of the children? | हुंडा मुलांना घ्यायचा असतो की मुलांच्या आई-वडिलांना?

हुंडा मुलांना घ्यायचा असतो की मुलांच्या आई-वडिलांना?

Next

लोकमत न्युज नेटवर्क
गोंदिया :  समाजातील हुंडा पद्धत मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अमलात आणलेल्या कायद्याच्या चाकोरीत आजही लोक अडकत आहेत. हुंडा मागणी करणे हा समाजाला लागलेला कलंक मिटविण्यासाठी कडक कायद्याची निर्मिती झाली असली, तरी या कायद्याला न जुमानता हुंडा मागण्याची प्रथा देशात सुरूच आहे. तो हुंडा पैशाच्या रूपाने किंवा साहित्याच्या रूपाने मागितला जात आहे. हुंडा स्वीकारण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. हुंडा देण्यास मुलीचे वडील सक्षम नसले, तर त्यांच्या मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले जात आहे. लग्न करताना नवऱ्या मुलाला जणू मुलीचे वडील हुंडारूपाने जणू विकतच घेत आहेत. जिल्ह्यात हुंड्याची परंपरा फारशी नसली, तरीही हुंडा मागत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत २०१८ मध्ये जिल्ह्यात ४४ गुन्हे, २०१९ मध्ये ३७ गुन्हे, २०२० मध्ये १२ गुन्हे, तर २०२१ मध्ये जूनपर्यंत १५ गुन्हे दाखल आहेत. आम्हाला हुंडा नको, असे म्हणणारी मंडळी आपल्या मुलीला दागिने करून द्या, फ्लॅट द्या, बंगला द्या, फोर व्हीलर-टू व्हीलर द्या, असे मुलीच्या वडिलांना सांगतात. पैसे किंवा साहित्याच्या रूपात हुंडा घेतला जातो. मुलाला मुलगीच हवी असते तर मुलाच्या आई-वडिलांना हुंडा हवा असतो. 

हुंडाविरोधी कायदा काय?

लग्नासाठी मुलीच्या वडिलांकडून पैसे, दागिने किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू तसेच लग्नात होणारा वर पक्षाचा खर्चही मुलीच्या वडिलांनी सांभाळावा यासाठी वर पक्षाकडून होणारी मागणी म्हणजे हुंडा होय. या हुंडा मागणाऱ्यांना लोकांना ३ वर्षांचा कारावास होऊ शकतो.

मुलांच्या मनात काय?
मुलांना मुलगी सुंदर, सुशील आणि संस्कारवान हवी असते. तिच्या पैशाकडे मुलांची नजर नसते. परंतु मुलाच्या नातेवाइकांनी मुलीच्या वडिलांना हे माग, ते माग असे म्हणून मुलावर दबाव टाकला तर मुलगाही त्याची मागणी करतो.
- प्रेमानंद पाथोडे, 
पदमपूर

मुलाला आपली जीवनसाथी योग्य मिळावी, ती रूपवान, संस्कारवान आणि आपल्यावर शंभर टक्के प्रेम करणारी असावी असेच वाटते. तिच्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. आई-वडिलांकडून हुंड्यासाठी दबाव पडला तर ते हुंडा मागतात.
- हिमालय राऊत 
पोवारीटोला

मुलांच्या पालकांना काय वाटते
आपला मुलगा शिकून खूप मोठा झाला. नोकरीवर लागला. मुलाच्या वडिलांनी जमीन विकून त्याला शिकवले आणि अधिकारी केले तर त्याच्यावर आम्ही केलेल्या मेहनतीवर मुलगी मजा मारेल म्हणून काही लोक मुलीच्या वडिलांकडून हुंडा घेतात, पण ते चुकीचे आहे.
- योगेश खोटेले, डोंगरगाव

आपला मुलगा किती होतकरू आहे, हे न पाहता गोरगरिबांपासून, गर्भश्रीमंतांपर्यंत आणि अशिक्षितांपासून अगदी उच्चशिक्षितांपर्यंत हुंडा मागितला जातो. लग्नात होणारे अवडंबर, मुलाला लग्नात लागणारा खर्चही मुलींच्याच वडिलांकडून घेतला जातो, हे चुकीचे आहे.
- माया शिवणकर, आमगाव

मुलींच्या मनात काय?
नवरा मुलगा निर्व्यसनी, कर्तबगार आणि सन्मानाची वागणूक देणारा असावा. लग्नाच्या गाठी ठरविताना किंवा लग्न ठरल्यावर मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल करून हुंड्याच्या रूपात आपल्या मुलाला विक्री करण्याचा मानस ठेवतात हे योग्य नाही.
- सुप्रिया वाहने
 

मुलाच्या कुटुंबीयांना मुलगा कर्तबगार वाटतो तर मुलीच्याही आई-वडिलांना मुलीचा अभिमान वाटतो. मुलामुलींचे लग्न जोडतानाच हुंडा घ्यायचा किंवा नाही हे ठरविल्यानंतरच लग्न जोडावे. अन्यथा विनाकारण मुलींनाच नाव ठेवणारा समाज आहे.
- ज्योती कोरे,

मुलींच्या पालकांना काय वाटते?

 मुलगा नोकरीवर आहे, आपली मुलगी सुखात राहील म्हणून मुलीचे पालक आपण त्रास सहन करून मुलाला हुंडा देतात. परंतु हुंडा घेणारा मुलगा आपल्या मुलीला कधीच सुखात ठेवणार नाही, त्याची हुंड्याची हाव वाढतच जाईल हे निश्चित.
- यादनलाल लिल्हारे, पालक

हुंडा म्हणून सरळ पैसे न घेता गाडी, बंगला, फ्लॅट, प्लाॅट, मौल्यवान दागिने मागितले जातात. लग्नात होणारे अवडंबर, मुलाला लग्नात लागणारा खर्चही मुलींच्याच वडिलांकडून घेतला जातो. लग्नात कन्यादानात झालेल्या मुलीच्या पैशांवरही सासरच्या मंडळींची नजर असते. हुंडा मागणारे असमाधानी असतात.
- गजानन शेंडे, पालक

 

Web Title: Do you want to take the dowry to the children or to the parents of the children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.