जिल्हावासीय गंभीर अन् प्रशासन बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:45+5:30

बाहेरुन आलेल्या आणि कोरोना संसर्गाची अनुषंगाने लक्षणे दिसणाऱ्यांना क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. मात्र क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. बुधवारी तिरोडा तालुक्यातील बापलेकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील अनागोंदी कारभार पुढे आला.या क्वारंटाईन सेंटरमध्ये येथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांची साधी विचारपूस सुध्दा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली जात नाही.

District residents serious administration without hesitation | जिल्हावासीय गंभीर अन् प्रशासन बिनधास्त

जिल्हावासीय गंभीर अन् प्रशासन बिनधास्त

Next
ठळक मुद्देकोरोनाचा वाढतोय विळाखा : उपाययोजनाचा बोजवारा, क्वारंटाईन सेंटर झाले समस्या केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील बारा दिवसांच्या कालावधीत ४०० कोरोना बाधितांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिक गंभीर आहेत. मात्र कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दररोज आरोग्य विभाग व प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुढे येत आहे. त्यामुळे जिल्हावासीय कोरोनाने गंभीर मात्र प्रशासन पूर्णपणे बिनधास्त असल्याची ओरड होवू लागली आहे.
बाहेरुन आलेल्या आणि कोरोना संसर्गाची अनुषंगाने लक्षणे दिसणाऱ्यांना क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. मात्र क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. बुधवारी तिरोडा तालुक्यातील बापलेकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील अनागोंदी कारभार पुढे आला.या क्वारंटाईन सेंटरमध्ये येथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांची साधी विचारपूस सुध्दा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली जात नाही. तर साधी सर्दी, खोकल्याची आणि डोकेदुखीची गोळी सुध्दा मिळत नसल्याची ओरड येथे दाखल असलेल्या नागरिकांची आहे. गरम पाणी नाही, नास्ता नाही, लहान मुलांना बिस्किटे नाही, दूध नाही व चहा नाही जेवण सुध्दा बरोबर मिळत नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच याच सेंटरमधील नागरिकांनी याची तक्रार थेट जिल्हाधिकाºयांकडे केली होती. मात्र यात अद्यापही कुठलीही सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे हे सेंटर केवळ नावापुरतेच ठरत असल्याचा आरोप येथे दाखल रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली. ही अवस्था केवळ सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरची नव्हे तर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्वच केंद्राची आहे.
क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमधील असुविधांमुळे तिथे राहण्यास कुणीही नाही. त्यामुळे बरेच जण बाहेरुन आल्यानंतर याची माहिती प्रशासनाला न देता थेट घरी जात आहे. यामुळे मागील बारा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. तर जिल्हा प्रशासन केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या नावावर बैठका घेण्यात व्यस्त आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन मात्र अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र आहे. यासर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाप्रती जिल्हावासीयांमध्ये रोष वाढत आहे.

शहरात वाढतोय प्रादुर्भाव
मागील आठ दिवसांपासून गोंदिया आणि तिरोडा शहरात सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र अद्यापही स्थानिक नगर परिषद, आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने हात पूर्णपणे हातवर केले असून नागरिकांना तुम्हीच काळजी तुम्हीच घ्या असा अप्रत्यक्षपणे सल्ला दिला जात आहे.

जिल्हाधिकारी घेणार का दखल
कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालय जिल्ह्यातील इतरही आरोग्य केंद्रामध्ये योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. तर क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटर संदर्भातील तक्रारीत दररोज वाढ होत असाहे. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोग्य विभाग आणि प्रमुख विभागाचे अधिकारी फोन उचलत नाही. त्यांना फोन उचलण्याची जणू अ‍ॅलर्जी झाली आहे. तर अर्धे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्यस्त असल्याचे सांगतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. या सर्व गोष्टींची दखल जिल्हाधिकारी घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: District residents serious administration without hesitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.