नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या कक्षात टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:07+5:30

नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या वांरवार लक्षात आणून दिली. तर मागील पंधरा दिवसापासून सफाई कर्मचारी सुध्दा प्रभागात येत नसल्याने या समस्येत पुन्हा वाढ झाली.

Councilors dump garbage in city hall | नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या कक्षात टाकला कचरा

नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या कक्षात टाकला कचरा

Next
ठळक मुद्देकचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याची तक्रार : बसपा नगरसेवकांचा पवित्रा, नगर परिषदेत खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील काही दिवसांपासून नगर परिषदेच्या कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. परिणामी शहरातील केरकचऱ्याच्या समस्येने बिकट रुप धारण केले आहे. वांरवार स्वच्छता विभागाला केरकचऱ्याची उचल करण्याची सूचना देऊनही उचल केली जात नसल्याने संतप्त झालेल्या बसपाचे नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी गुरूवारी(दि.९) दुपारी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या व स्वच्छता विभागाच्या कक्षात कचरा टाकून संताप व्यक्त केला. यामुळे घटनेमुळे नगर परिषदेत खळबळ उडाली होती.
नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या वांरवार लक्षात आणून दिली. तर मागील पंधरा दिवसापासून सफाई कर्मचारी सुध्दा प्रभागात येत नसल्याने या समस्येत पुन्हा वाढ झाली. आपण या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने नागरिक आपल्याला याचा जाब विचारत होते. त्यामुळे नगर परिषदेला या समस्येची जाणीव करुन देण्यासाठी नगराध्यक्षाच्या कक्षात आणि स्वच्छता विभागात केरकचरा टाकल्याचे ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी सांगितले. केरकचऱ्यासह प्रभागातील नाल्यांची सुध्दा अद्याप साफ सफाई करण्यात आली नसल्याने सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. रस्त्यावरुन घाणपाणी वाहत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात नगर परिषद स्वच्छता विभागात विचारणा केली असता सफाई कर्मचारी कामावर येत नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचे सांगितले. मात्र इतर वार्डातील साफ सफाईची कामे नियमित सुरू असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडील वाहनात डिझेल नसल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे या विभागाच्या अधिकाºयाने सांगितले. प्रभागातील नागरिकांच्या समस्येची जाणीव नगराध्यक्ष आणि नगर परिषदेला व्हावी यासाठी नगराध्यक्ष व सफाई विभागाच्या कक्षात कचरा आणून टाकल्याने दोन्ही नगरसेवकांनी सांगितले.
प्रभागातील समस्या सांगण्यासाठी माझे पती नगराध्यक्षांच्या कक्षात गेले होते मात्र त्यांची समस्या ऐकून घेण्याऐवजी नगराध्यक्षांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप ज्योत्सना मेश्राम यांनी केला. यावरून नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवकांमध्ये जवळपास अर्धातास वाद झाला. या वेळी काही नगरसेवक देखील उपस्थित होते.
दरम्यान यावर जाब विचारण्यासाठी नगराध्यक्षांनी सफाई विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन बोलविले, मात्र अर्धा तासापर्यंत कुणीही आले नव्हते.
दरम्यान या प्रकारमुळे नगर परिषद पुन्हा चर्चेत आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी नगर परिषद परिसरात असा प्रकार करणे उचित नसून आपण या प्रकाराचा निषेध करीत असल्याचे सांगितले.

सफाई कामगारांनी केली निदर्शने
मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांनी याच दरम्यान नगर परिषदेसमोर निदर्शने केले. कंत्राटदाराने त्यांना कामावरुन कमी केल्याचा आरोप केला. मागील १२ वर्षांपासून या सफाई कामगारांना केवळ २०० रुपये प्रती दिन मजुरी दिली जात आहे. त्यातच मागील तीन महिन्याचे वेतन नगर परिषदेने दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. शासन नियमानुसार सफाई कामगारांना ३७० रुपये प्रती दिन मजुरी देण्याची तरतूद असताना त्यांना केवळ १५० ते २०० रुपये मजुरी देऊन त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप केला. या विरोधात त्यांनी नगर परिषदेसमोर निदर्शने केली.

न.प.च्या अनागोंदी कारभाराला जिल्हाधिकारी जवाबदार असल्याचा आरोप
मागील तीन महिन्यांपासून नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील हे रजेवर आहेत. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरोश्यावर नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. मात्र त्यांच्यावर सुध्दा दोन नगर परिषदेचा पदभार आहे. त्यामुळे नगर परिषदेचा कारभाराचा पुर्णता बोजवारा उडाला आहे. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून नगर परिषदेत अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र यासर्व प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराला त्याच जवाबदार असल्याचा आरोप नगरसेवक पकंज यादव यांनी केला.

१५ दिवसांपासून केरकचऱ्यांची समस्या
शहरातील प्रभाग क्रमांक १४ व १६ या दोन्ही प्रभागात मागील १५ दिवसांपासून केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही. नाल्यांमधील गाळाचा उपसा न केल्याने नाल्यांमधील सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे नाल्या चोख झाल्याने रस्त्यावरुन घाण पाणी वाहत होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर सफाई कामगारांचे वेतन सुध्दा थकले असल्याने त्यांनी सुध्दा असहकाराची भुमिका घेतली आहे.

Web Title: Councilors dump garbage in city hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.