एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 05:00 AM2021-11-27T05:00:00+5:302021-11-27T05:00:06+5:30

कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कित्येकदा बँकेतून पैसे काढल्यानंतर बॅग हिसकावून नेणे, यासारख्या घटना घडल्या आहेत. अशात एटीएममधून पैसा काढण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक ठरत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना एटीएमदेखील सुरक्षित नसल्याची बाब उघडकीस आली आहे.  

CCTV only 'watch' at ATMs | एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचा ‘वॉच’

एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचा ‘वॉच’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गॅस कटरने एटीएम फोडल्याच्या अनेक घटना घडल्या असतानाही एटीएमच्या सुरक्षा वाऱ्यावर आहेत. न्यायालयाने सर्व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश बँका व्यवस्थापनाला दिले होते. मात्र या आदेशाची सुद्धा सर्रासपणे पायमल्ली केली जात आहे. गोंदिया शहर व जिल्ह्यातील बहुतांश एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचाच वॉच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 
गोंदिया शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा दिली आहे. कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कित्येकदा बँकेतून पैसे काढल्यानंतर बॅग हिसकावून नेणे, यासारख्या घटना घडल्या आहेत. अशात एटीएममधून पैसा काढण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक ठरत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना एटीएमदेखील सुरक्षित नसल्याची बाब उघडकीस आली आहे.  शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम केवळ सीसीटीव्हीच्या निगराणीत आहेत.
एटीएम शहरातील मुख्य परिसरात असल्याने त्यांना फोडण्यासारख्या घटना घडणे तेवढेही शक्य नसल्याचे दिसले. मात्र बँक ऑफ महाराष्ट्रचे दुर्गा चौकातील दुर्गा मंदिराच्या बाजूला असलेले एटीएम सुरक्षेच्या निकषांत बसत नसल्याचे दिसले. येथे गार्ड नसल्याने कुणीही या मशीन वापरा व निघून जा असे चित्र दिसले. या शिवाय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेलगत असलेले एटीएम सुरक्षारक्षकाविनाच दिसले. 
बाजारातील ॲक्सिस बँक, इलाहाबाद बँक यांचेही एटीएम दिवसाच काय रात्रीलाही सुरक्षारक्षकाविना असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. 

अन्य बँकांना सीसीटीव्हीचाच आधार 
- जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयटीआयसीआय व ॲक्सिस बँकेच्या एटीएमला सीसीटीव्हीचाच आधार आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या व्यवस्थापकांशी सुरक्षेबाबत विचारणा केली असता त्यांनी सीसीटीव्ही लागलेले असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे, एटीएम मशीन्सची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असतानाच एटीएममध्ये गुन्हेगारीचे प्रकारही घडत आहेत. अशात एटीएम व ग्राहक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही हा एकमेव पर्याय किती सुरक्षित आहे हा मात्र प्रश्न सर्वांना पडत आहे.

 

Web Title: CCTV only 'watch' at ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम