बीएसएनएल कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:00 AM2020-12-16T05:00:00+5:302020-12-16T05:00:14+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने सोमवारी (दि.१४) शहरातील एक्सीस बॅंकेच्या एटीएमला नगर परिषद ...

The BSNL office was locked | बीएसएनएल कार्यालयाला ठोकले कुलूप

बीएसएनएल कार्यालयाला ठोकले कुलूप

Next
ठळक मुद्दे५.५० लाखांची थकबाकी : कर वसुली पथकाची आगेकूच

  लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने सोमवारी (दि.१४) शहरातील एक्सीस बॅंकेच्या एटीएमला नगर परिषद मालमत्ता कर वसुली पथकाने कुलूप ठोकले होते. यामुळे शहरात खळबळ माजलेली असतानाच पथकाने मंगळवारी (दि.१५) थेट दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) सुभाष बागेच्या शेजारील कार्यालयालाच कुलूप ठोकले. त्यांच्यावर पाच लाख ५० हजार ७८२ रूपयांची थकबाकी आहे. वसुली पथक कधीही कुणावरही धडक देत कारवाई करीत असल्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. 
 नगर परिषदेला यंदा सुमारे ११ कोटी रूपयांच्या मालमत्ता कल वसुलीचे टार्गेट आहे. मात्र मालमत्ता धारकांकडून वसुली कर्मचाऱ्यांना टोलविण्यात येत असल्याने ही रक्कम वाढत आली आहे. यंदा मात्र हा प्रकार खपवून घ्यायचा नाही हे ठरवून घेत मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी कायद्याचा आधार घेत मालमत्ता धारकांनी कर भरण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे अधिकारच कर वसुली पथकाला दिले आहे. यातूनच पथकाने सोमवारी (दि.१४) शहरातील एक्सीस बॅंकेच्या एटीएमलाच कुलूप ठोकले. मालमत्ताधारकाने कर न भरल्याने पथकाला ही कारवाई करावी लागली. तर बॅंक ऑफ बडोदा व इंडियन ओव्हरसीज बॅंकेला नोटीस बजावले आहे. 
त्यानंतर मंगळवारी (दि.१५) शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बागेच्या बाजूला असलेल्या बीएसएनएल कार्यालयावर धडक दिली. कार्यालयावर पाच लाख ५० हजार ७८२ रूपयांची थकबाकी असून त्यांनी ती रक्कम पथकाला दिली नाही. अशात पथकाने सर्वप्रथम त्यांच्या टॉवरचे पॉवर ऑफ केले होते. मात्र यामुळे सर्वच शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले असते ही बाब लक्षात घेत मुख्याधिकारी चव्हाण यांनी पॉवर ऑप न करण्यास पथकाला सांगीतले. मात्र पथकाने बीएसएनएलच्या कार्यालयालाच कुलूप ठोकले. तर सोमवारी इडियन ओव्हरसीज बॅंकेच्या एटीएम एजंसीने दिलेल्या हमीपत्रानुसार एक लाख ५४ हजार रूपये पथकाकडे जमा केले. यामुळे इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या एटीएमवरील कारवाई टळली. 

आता शासकीय कार्यालय रडारवर 
पथकाने बीएसएनएल कार्यालयावर कारवाई करीत कुलूप ठोकल्याने एकच खळबळ माजली आहे. मात्र शासकीय कार्यालयांकडे मालमत्ता कराच्या मोठ्या रकमा अडकून पडल्या आहेत. यामुळे नगर परिषदेच्या वसुलीच्या थकबाकीचा आकडा वर चढलेला आहे. आता या शासकीय कार्यालयांकडून ही रक्कम काढण्यासाठी पथक त्यांच्याकडे धडक देणार आहे. शहरातील बॅंका, एटीएम व आता शासकीय कार्यालय पथकाच्या रडारवर आहेत. 
सात लाख रूपयांची कर वसुली 
मंगळवारी पथकाने शहरातील काही व्यापाऱ्यांकडे ही मालमत्ता कर वसुलीसाठी धडक दिली. तर यापूर्वी धडक दिलेल्या व्यापाऱ्यांनीही त्यांच्याकडील थकबाकी जमा केली. अशात मंगळवारी पथकाने सात लाख चार हजार ५३३ रूपयांची वसुली केली आहे. यामध्ये दोन लाख ५२ हजार रूपयांची धनादेश असल्याची माहिती कर अधिकारी विशाल बनकर यांनी दिली.

Web Title: The BSNL office was locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.