मुरकुटडोह-दंडारीच्या समस्यांना घेऊन प्रशासनाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:30+5:30

शासनाच्या विविध योजनांचा मुळीच लाभ न मिळणे, गावातील शाळा बंद करुन शिक्षणाची दारे बंद झाली. आरोग्य सेवेच्या अभावामुळे लोकांचे भगवान भरोसे जगणे. गावात लोकांना रोजगार नसून शेतीसाठी सिंचनाची कोणतीच सोय नाही. यासह इतर महत्वाच्या समस्या उचलल्या. यातच सर्वात ज्वलंत समस्या म्हणजे लोकांना गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीला मोफत धान्य मिळत नाही. तसेच अनेक गरजू लोकांचे रेशन कार्ड अद्याप बनले नाही याचाही समावेश होता.

The administration woke up with the problems of Murkutdoh-Dandari | मुरकुटडोह-दंडारीच्या समस्यांना घेऊन प्रशासनाला आली जाग

मुरकुटडोह-दंडारीच्या समस्यांना घेऊन प्रशासनाला आली जाग

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची त्या गावांना आकस्मिक भेट । प्रत्येक समस्येवर गावकऱ्यांशी विस्तृत चर्चा

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील सतत उपेक्षित आदिवासी क्षेत्रातील मुरकुटडोह-दंडारी काही ज्वलंत तर काही दिर्घकालीन समस्या असून त्यांना ‘लोकमत’ वर्तमान पत्राने वाचा फोडताच प्रशासन खळबळून जागे झाले. या समस्या प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.८) त्या गावांना भेट दिली व तेथील समस्या बघून त्याही आश्चर्यचकीत झाल्या. याप्रसंगी लोकांनी मनमोकळेपणाने आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
नुकतेच ‘लोकमत’ने एक वृत्तमालिका चालवत आठवडा भर दररोज वेगवेगळ्या समस्या उचलत बातम्या प्रकाशित केल्या. त्यामध्ये त्या गावापर्यंत पक्के बारमासी रस्त्यांचा अभाव, घरकुल योजना त्या गावापर्यंत पोहोचल्या नाही. शासनाच्या विविध योजनांचा मुळीच लाभ न मिळणे, गावातील शाळा बंद करुन शिक्षणाची दारे बंद झाली. आरोग्य सेवेच्या अभावामुळे लोकांचे भगवान भरोसे जगणे. गावात लोकांना रोजगार नसून शेतीसाठी सिंचनाची कोणतीच सोय नाही. यासह इतर महत्वाच्या समस्या उचलल्या. यातच सर्वात ज्वलंत समस्या म्हणजे लोकांना गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीला मोफत धान्य मिळत नाही. तसेच अनेक गरजू लोकांचे रेशन कार्ड अद्याप बनले नाही याचाही समावेश होता.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी प्रत्यक्ष जाणून घेतले तेव्हा त्यांना तेथील खरी वस्तुस्थिती कळली. त्यांनी लगेच तालुका प्रशासनाला खडसावले व त्वरित लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी निर्देश दिले. मुरकुटडोह दंडारी गावासाठी शासनाकडून आरोग्य उपकेंद्र मंजूर असून सुद्धा सुरु करण्यात आले नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकर त्यासाठी जागा निश्चित करुन आरोग्य उपकेंद्र सुरु करण्याचे आश्वासन दिले. शाळा बंद असून शाळांना पूनर्जिवीत करण्याचे आश्वासन देत इमारतीची रंगरंगोटी करुन त्यांना वर्ग लावण्यासाठी ग्रामपंचायतने सज्ज करुन द्यावे व अनुकूल परिस्थिती निर्माण होताच २ ठिकाणी शाळा सुरु केली जाईल असे आश्वासन दिले.
सिंचनाबाबत संबंधित विभागाशी माहिती घेवून प्रलंबित प्रकल्प सुरु करण्यासंबंधी चर्चा करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. ज्वलंत समस्या त्वरित दूर करावे यासाठी तहसीलदारांनाही त्यांनी खडसावले.
जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा आणि समस्यांची दखल घेतल्यानंतर तहसीलदारांनी लगेच दुसऱ्या दिवशी तातडीची बैठक बोलावून ज्वलंत समस्या दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत. आपल्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या बातम्यांची दखल घेत नागरिक व अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत बातम्यांचा उल्लेख केला.

‘त्या’ गावांना जाणाऱ्या पहिल्या जिल्हाधिकारी
मुरकुटडोह-दंडारी गावांचे नाव ऐकताच कोणीही कोणीही त्या गावापर्यंत जाण्यासाठी दुरुनच घाबरतात. मात्र प्रथमच एका जिल्हाधिकाऱ्यांनी त्या गावांना आकस्मिक भेट देवून आश्चर्यचकीत केले. आतापर्यंत कोण्या पुरुष कलेक्टरने हिमंत दाखविली नाही ती हिंमत एका महिला कलेक्टरने दाखविली. सुदूर घनदाट जंगल व पर्वतरांगाच्या मधात असलेला मुरकुटडोह-दंडारी अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात असून या गावांना कलेक्टरने भेट देणे येथील लोकांसाठी सुखद आश्चर्य होते. आपले कोणीतरी ऐकायला तयार आहे याचे त्यांना समाधान वाटले.

लोकांच्या अडचणी दूर होणार काय?
मुरकुटडोह-दंडारीच्या विविध समस्या प्रत्यक्षात कलेक्टरने ऐकल्या व बघितल्या. यानंतर तेथील समस्या दूर करुन त्या गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वस्तरावर इमानदारीने प्रयत्न चालविले जातील का? याची थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

Web Title: The administration woke up with the problems of Murkutdoh-Dandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.