19 lakhs fraud in Public Service Co-operative Credit Society | लोकसेवा सहकारी पतसंस्थेत २९ लाखांचा अपहार

लोकसेवा सहकारी पतसंस्थेत २९ लाखांचा अपहार

ठळक मुद्देप्रमाणित लेखा परीक्षकाचा अहवाल: सामान्य जनतेच्या पैशावर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : येथील लोकसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नोंदणी क्रमांक १४१८ यामध्ये कार्यरत व्यवस्थापकाने १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत २९ लाख २८ हजार ६६४ रुपयांचा अपहार केल्याची बाब उघडकीस आली आहे. लेखा परीक्षकाने याची रितसर तक्रार अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
लोकसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत लाखो रुपयांच्या अपहार झालेल्या प्रकाराचा लेखा परीक्षण प्रमाणित लेखा परीक्षक यशवंत रामटेके १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत लेखा परीक्षण करुन विशेष अहवाल संबंधितांना २० जानेवारी २०२० रोजी कळविला. लेखा परीक्षकांच्या अहवालानुसार लोकसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेनी नियुक्त केलेले व्यवस्थापक प्रशांत आस्तीक मेश्राम यांनी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य व्यवहार करुन २९ लाख २८ हजार ६६४ रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आक्षेप नोंदविला आहे. प्रमाणित लेखा परीक्षकाच्या अहवालानुसार प्रशांत मेश्राम हे संस्थेचे व्यवस्थापक पदावर ३० मे २०१५ पासून २८ सप्टेंबर २०२९ पर्यंत कार्यरत होते. कार्यरत व्यवस्थापकानी दैनिक शिल्लक संस्थेत जमा न करता संपूर्ण रक्कम स्वत:च्या हितासाठी वापरले असे अहवालात नमूद करण्यात केले आहे. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष लालदास शहारे हे १६ सप्टेंबर २०१८ पर्यंत अध्यक्ष पदावर कार्यरत होते.
१७ सप्टेंबर २०१८ रोजी तत्कालीन अध्यक्ष लालदास शहारे यांचे निधन झाल्यानंतर उपाध्यक्ष चरणदास भोवते यांच्यावर जवाबदारी देण्यात आली. ३१ मार्च २०१९ पर्यंत कार्यरत व्यवस्थापक प्रशांत मेश्राम यांनी रोज अखेर शिल्लक २२ लाख २८ हजार १८४ रुपये, रोकड वहीवरील खर्चाच्या बेरजेतील फरक ८६ हजार ५४० रुपये, बोगस लोकांना नित्यनिधी ठेव परत ६ लाख ३२ हजार ७४० रुपये, परत करावयाची रक्कम १८ हजार ८०० रुपये याप्रमाणे २९ लाख २८ हजार ६६४ रुपये संस्थेत जमा न करता परस्पर अफरातफर करुन स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी रकमेचा उपयोग करुन संस्थेची तथा सर्वसाधारण सभासदांची फसवणूक केल्याचा गंभीर आक्षेप प्रमाणित लेखा परीक्षक यशवंत रामटेके यांनी आपल्या अहवालात नोंदविला आहे. पतसंस्थेतील जमा असलेल्या लाखो रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी व्यवस्थापक प्रशांत मेश्राम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी नोंद अहवालात केली आहे.

बोगस नावाने नित्यनिधी ठेवीची उचल
लोकसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रशांत मेश्राम यांनी १५ लोकांच्या बोगस नावाने नित्यनिधी ठेव परत करुन दस्तऐवजात दाखवून ६ लाख ३२ हजार ७४० रुपये अफरातफर केल्याचे आढळले. पतसंस्थेत बोगस १५ लोकांची नित्यनिधी ठेव नसताना परत केल्याचे दाखविल्याचे लेखा परीक्षण अहवालात नोंद करुन गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
संचालक मंडळाची डोळेझाक
१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कार्यरत व्यवस्थापकांनी लाखो रुपयांची अफरातफर करुन पतसंस्थेला डबघाईस आणण्यास विद्यमान संचालक मंडळाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. संचालक मंडळांनी व्यवस्थापक प्रशांत मेश्राम यांचेकडून कोणतेही सुरक्षा ठेव संस्थेत जमा केली नाही.एकंदरित संचालक मंडळानी सुद्धा त्यांना दिलेल्या उपविधीतील तरतुदीनुसार जवाबदारी पार पाडली नाही. पर्यायांने व्यवस्थापकास आपल्या सोयीनुसार नियमबाह्य व्यवहार करण्यास वाव मिळाला असा स्पष्ट व गंभीर आक्षेप लेखा परीक्षकांनी अहवालात नोंदविला आहे.

लेखा परीक्षकाची पोलीस स्टेशनला तक्रार
पत संस्थेतील झालेल्या लाखो रुपयाच्या अफरातफर प्रकरणाची लेखी तक्रार लेखा परीक्षकासह प्रमाणित लेखा परीक्षक यशवंत रामटेके यांनी बुधवारी (दि.२६) अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशनला संस्थेच्या २९ लाख २८ हजार ६६४ रुपये अफरातफर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार दिली.

लेखा परीक्षक यशवंत रामटेके यांनी पतसंस्थेतील अपहाराची लेखी तक्रार अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनला बुधवारी दाखल केली. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
- महादेव तोंदले,
पोलीस निरीक्षक.

Web Title: 19 lakhs fraud in Public Service Co-operative Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.