आरजी-काँग्रेस आघाडी नाही; नवा प्रस्ताव आरजीने फेटाळल्याची काँग्रेसची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:23 IST2025-12-09T13:23:17+5:302025-12-09T13:23:46+5:30
आज, मंगळवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

आरजी-काँग्रेस आघाडी नाही; नवा प्रस्ताव आरजीने फेटाळल्याची काँग्रेसची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :काँग्रेस व गोवा फॉरवर्डसोबत विरोधी आघाडीत सहभागी होण्यास आरजीने स्पष्ट नकार दिला असून, काँग्रेसचा नवा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी यास दुजोरा दिला. दरम्यान, भाजप, आरजी व गोवा फॉरवर्डच्या बहुतांश उमेदवारांनी सोमवारी अर्ज भरला. आज, मंगळवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
भाजपतर्फे खोर्ली मतदारसंघातून सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. सिद्धार्थ देसाई यांनी शेल्डेत भाजपचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार नीलेश काब्राल यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. ताळगावमध्ये रघुवीर कुंकळकर यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. मंत्री बाबूश मोन्सेरात यावेळी उपस्थित होते.
मंत्री बाबूश म्हणाले, 'पक्ष केवळ निवडणुकीदरम्यानच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस लोकांसाठी काम करतो.' ताळगावमधील सांडपाणी पाइपलाइनच्या कामामुळे निर्माण झालेल्या रस्त्याच्या समस्येवर त्यांनी भाष्य केले. 'आचारसंहितेनंतर रस्त्याचे हॉट मिक्सिंग होईल', असे सांगितले. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांना काही आरोग्याच्या समस्या असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही कधीही विरोधकांना त्रास देत नाही. टीकेचे स्वागत करतो.'
आप'चा जाहीरनामा दोन दिवसांत
सत्तरीमध्ये 'आप'ने दोन मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर केले. अविनाश जाधव (केरी) आणि अर्जुन गुरव (नगरगाव) यांच्यासाठी अर्ज दाखल केले. कार्यकारी अध्यक्ष वाल्मीकी नायक म्हणाले, 'आपचा जाहीरनामा, दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल.'
गोवा फॉरवर्डकडून अर्ज दाखल
गोवा फॉरवर्डच्या प्रा. राधिका कळंगुटकर यांनी मये झेडपी जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर गोवा फॉरवर्डचे खोर्ली उमेदवार कृष्णा (विक्रम) परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काणकोणमध्ये प्रशांत नाईक यांनीही - उमेदवारी अर्ज दाखल केला.
...तरी भाजपला धडा शिकवू : सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे जामदार विजय सरदेसाई म्हणाले की, 'लोकांना विरोधक एकत्र येऊन भाजपशी लढलेले हवे होते. त्यामुळे आघाडीसाठी मीच पुढाकार घेतला होता; परंतु आता आरजीने फारकत घेतली आहे. आरजीच्या नेत्यांनी दिल्ली भेटीनंतर युतीचा विषय बंद केला. भाजप घरात फूट पडू शकतो, तसेच दोन पक्षांमध्येही दरी निर्माण करू शकतो. विरोधकांच्या युतीच्या बाबतीत हेच घडलेले आहे. तरीपण आम्ही खचून गेलेलो नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्यासाठी सज्ज आहोत. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवू.'
'आरजीच्या नेत्यांनी आपण आघाडीचा भाग बनण्यास इच्छुक नसल्याचे अधिकृतपणे कळवले असून, आता काँग्रेस केवळ गोवा फॉरवर्डकडेच युतीसाठी प्रयत्न करील.' - एम. के. शेख, ज्येष्ठ उपाध्यक्ष, काँग्रेस
आरजी हा फक्त राजकीय गोंधळ निर्माण करणारा पक्ष बनला आहे. गोव्यातील वास्तविक मुद्यांवरून लक्ष हटवण्याचे काम ते करत आहेत. - विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड