Goa Election 2022 : भाजपकडून पार्सेकर, पर्रीकर यांचा अपेक्षाभंग; पण हे धाडस...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:19 PM2022-01-21T17:19:43+5:302022-01-21T17:20:37+5:30

भाजपने अखेर शुक्रवारी तिकीट वाटप जाहीर केले. यात काही विद्यमान आमदारांना भाजपने धक्का दिला आहे.

special article on goa election 2022 utpal parrikar former cm laxmikant parsekar bjp election | Goa Election 2022 : भाजपकडून पार्सेकर, पर्रीकर यांचा अपेक्षाभंग; पण हे धाडस...

Goa Election 2022 : भाजपकडून पार्सेकर, पर्रीकर यांचा अपेक्षाभंग; पण हे धाडस...

Next

भाजपने अखेर शुक्रवारी तिकीट वाटप जाहीर केले. लोकमतने जसा अंदाज व्यक्त केला होता, त्यानुसार काही विद्यमान आमदारांना भाजपने धक्का दिला आहे. दीपक प्रभू पाऊसकर यांना भाजपने तिकीट नाकारले. हा फार मोठा धडा आहे, कारण बांधकाम खाते नोकर भरतीच्या महाघोटाळ्यात वादग्रस्त ठरले होते. भाजपने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल मनोहर पर्रीकर यांचा अपेक्षाभंग केला. भाजपचे हे धाडस पक्षाच्या अंगलट येणार की नाही याचे उत्तर शेवटी पणजीचे मतदार मतदानाद्वारे देतील. पर्रीकर कुटुंबातील पहिले बंड अटळ बनले आहे. भाजपमधील एका गटाने उत्पलवर बंडाची पाळी आणली असा अर्थ काढता येतो.

भाजपने ख्रिस्ती उमेदवारांची संख्या एका मर्यादेपलीकडे वाढवली नाही. एरव्ही भाजपकडे पंधरा ख्रिस्ती धर्मीय आमदार होते, पण इजिदोर फर्नांडिस यांना तिकीट दिले गेले नाही. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनाही अजून तिकीट मिळालेले नाही. भाजप पूर्वी नावेली मतदारसंघात मुस्लीम धर्मिय उमेदवाराला तिकीट देत होता, यावेळी तिथे हिंदू उमेदवार दिला गेला आहे. नुवेतही हिंदू उमेदवार दिला गेला. बाणावली मतदारसंघातही (जिथे भाजप आयुष्यात कधी जिंकलेला नाही) हिंदू उमेदवार देऊन भाजपने एक सोपस्कार पार पाडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नावापुरते तरी भाजपने समाधान मिळवून दिले आहे. 

म्हापशात जोशुआ डिसोझा, हळदोणेत ग्लेन टिकलो, पणजीत बाबूश मोन्सेरात, ताळगावमध्ये जेनिफर, सांतआंद्रेत फ्रान्सिस सिल्वेरा, दाबोळीत माविन गुदिन्हो, कुंकळ्ळीत क्लाफासिओ डायस, वेळ्ळीत सावियो रॉड्रिग्ज आणि कुडचडेत निलेश काब्राल अशा नऊ ख्रिस्ती उमेदवारांना तिकीट मिळाले. मनोहर पर्रीकर हयात असताना रमेश तवडकर यांना २०१७ च्या निवडणुकीत तिकीट नाकारले गेले होते. पक्षाने पुन्हा त्यांना यावेळी तिकीट दिले. स्व. अनंत शेट यांनाही भाजपने त्यावेळी तिकीट नाकारले होते, यावेळी शेट यांच्या बंधूला मयेत भाजपने उमेदवारी जाहीर केली. गणेश गावकर यांचा २०१७ मध्ये सावर्डेत पराभव झाला होता, पण यावेळी गावकर यांना तिकीट देणे भाजपला भाग पडले. कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणी मिलिंद नाईक यांचा मंत्रिपदाचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला होता, त्यांना तिकीट देऊन भाजपने बहुमान केला. हा नवा भाजप आहे असे समजावे काय?

नवा भाजप पणजीत उत्पलला तिकीट देऊ शकला नाही. उत्पलने डिचोली किंवा सांताक्रुझमध्ये लढावे अशा कल्पना काहीजण मांडतात पण त्या कल्पना हास्यास्पद आहेत. लहान मुलाला ही नाही तर ती चॉकलेट घे व गप्प राहा असे सांगण्याचा प्रकार आहे. 

मंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या राणे यांना तिकीट मिळाले. त्या आयुष्यात प्रथमच विधानसभा निवडणूक लढवतील. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांना मात्र तिकीट मिळू शकले नाही. ते मिळणे शक्यच नव्हते, कारण भाजपचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांना प्रथमपासूनच भाजपने उमेदवार म्हणून पुढे आणले होते. आपल्यावर घराणेशाहीचा पूर्ण शिक्का बसणार नाही एवढी काळजी भाजपने घेतली. मोन्सेरात व राणे कुटुंबांचे तेवढे फावले. नव्या सरकारमध्ये पुन्हा प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले तर विश्वजित यांची शक्ती त्यावेळी वाढलेली असेल. 

दोन वर्षांपूर्वी मगो पक्ष सोडणे ही दीपक प्रभू पाऊसकर आणि बाबू आजगावकर या दोघांचीही घोडचूक होती. दोघेही लटकले. आजगावकर यांना नावापुरती मडगावमध्ये तिकीट दिली गेली आहे. आपल्याला भाजपचे तिकीट नको असे सभापती राजेश पाटणेकर यांनी भाजपला सांगितले. यामुळे डिचोलीत भाजपची गोची झाली. डिचोली मतदारसंघातील उमेदवार भाजप काल जाहीर करू शकला नाही हे अपयश आहे. कुंभारजुवे, सांताक्रुझ या मतदारसंघांतही भाजप आपला उमेदवार ठरवू शकला नाही ही देखील नामुष्की आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तिथे भाजप आपले उमेदवार ठरवू शकत नाही याचा अर्थ काय? मांद्रेत पार्सेकर हे आपल्याला तिकीट मिळेलच असा दावा करत होते, पण तो दावा फोल ठरला. फोंड्यात रवी नाईक हे आयुष्यात प्रथमच भाजपतर्फे लढतील. पहिल्या यादीत साधारणत: भंडारी समाजातील नऊ उमेदवार भाजपने दिले आहेत. एसटी समाजातील तिघे आहेत. भाजपची ही यादी तशी प्रबळच आहे हे मान्य करावे लागेल.

Web Title: special article on goa election 2022 utpal parrikar former cm laxmikant parsekar bjp election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.