महागाईतही गोमंतकीयांमध्ये चतुर्थीचा उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 12:27 PM2019-08-29T12:27:34+5:302019-08-29T12:32:22+5:30

गोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे.

Preparation of Ganesh Chaturthi Festival in goa | महागाईतही गोमंतकीयांमध्ये चतुर्थीचा उत्साह 

महागाईतही गोमंतकीयांमध्ये चतुर्थीचा उत्साह 

googlenewsNext
ठळक मुद्देगोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याप्ती गोव्यात गेल्या पंधरा वर्षात वाढली आहे.सध्या बाजारपेठांमध्ये चतुर्थीनिमित्ताने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत.

पणजी - महागाई वाढली, पुराच्या झळाही बसल्या, शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली, भाजी, दुध व पाण्याच्या तुटवडय़ाने लोक हैराण झाले. मात्र या स्थितीतही गोमंतकीयांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. गोमंतकीयांना अतिशय प्रिय असलेला गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. चतुर्थीनिमित्ताने बाजारपेठा फुलल्या आहेत.

गोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे. घरे सजविली जात आहेत. रंगरंगोटी केली जात आहे. आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागपंचमी पार पडल्यानंतर गोमंतकीयांनी गणेशमूर्ती तयार होणाऱ्या शाळांमध्ये जाऊन आपली गणेशमूर्ती निवडली व आरक्षित केली. येत्या 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला आरंभ होत आहे. ज्या कुटूंबांमध्ये दुरच्या अंतरावरून गणेशमूर्ती आणावी लागते, अशा कुटुंबाकडून मूर्ती आदल्या दिवशीच सायंकाळी घरी आणून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुरोहितांना बोलावून मूर्तीची पुजा केली जाते व गणोशोत्सवाला आरंभ होतो. अनेक गोमंतकीयांच्या घरांमध्ये दीड व पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवात गोमंतकीय सहभागी होतात. सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याप्ती गोव्यात गेल्या पंधरा वर्षात वाढली आहे.

सध्या बाजारपेठांमध्ये चतुर्थीनिमित्ताने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. बाजारपेठांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती सरकारने करून वाहतूक व्यवस्थेत बदलही घडवून आणले आहेत. चतुर्थीच्या दिवसांत काही भागांमध्ये चतुर्थीचा बाजार स्वतंत्रपणे अन्यत्र भरविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात अलिकडेच महाराष्ट्रातील तिळारी धरणाचे पाणी सोडल्याने पूर आला. लोकांना मोठा फटका बसला. कृषी क्षेत्राची दहा कोटींची हानी झाली. तत्पूर्वी बेळगाव व अन्य भागातून येणारा भाजीपाला कमी झाल्याने गोमंतकीयांना अत्यंत महागडी भाजी खावी लागली. दुधाचा तुटवडा निर्माण झाला होता. जलवाहिनी फुटल्याने तिसवाडी व फोंडा तालुक्यातील काही भागांमध्ये आठ ते दहा दिवस नळ कोरडे पडले होते. लोकांनी सरकारच्या नावे बोटे मोडली. मात्र आता नव्या दमाने गोमंतकीय गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ लागला आहे. निदान चतुर्थीच्या काळात तरी सरकारने गोव्यातील पाणी व वीज पुरवठय़ाची नीट काळजी घ्यावी अशी गोमंतकीयांची अपेक्षा आहे.
 

Web Title: Preparation of Ganesh Chaturthi Festival in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.