'ओंकार'कडून तोरसे परिसरात बागायतीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:23 IST2025-12-02T16:22:40+5:302025-12-02T16:23:27+5:30
भीतीमुळे मुलांनी शाळेला मारली दांडी

'ओंकार'कडून तोरसे परिसरात बागायतीचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: जवळपास ६३ दिवसांनंतर गोव्याच्या सीमेवर आलेल्या ओंकार हत्तीने तोरसे परिसरात कवाथे, केळी, सुपारीच्या बागेची नासधूस केली. सोमवारी पहाटे हत्ती हरिजनवाड्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठाण मांडून होता. त्यामुळे भीतीने हरिजनवाड्यावरील सुमारे सोळा मुलांनी शाळेला जाणे टाळले. हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. वनखात्याचे कर्मचारी कालपासूनच ओंकारच्या मागावर आहेत.
रात्री हत्तीने या परिसरात ठाण मांडले. त्याला जंगलात पाठवण्यासाठी मशाली आवश्यक आहेत. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी मशालींची तयारी केली. या कर्मचाऱ्याकडे सुतळी बॉम्ब होते.दरम्यान, हत्ती सोमवारी पहाटे हरिजनवाडा पंचशीला नगरमध्ये आला. यावेळी नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. काही जणांनी त्याला केळी, केळीची पाने खायला दिली. हत्ती माणसांना घाबरत तो नसून माणसाळल्याचेही दिसले.
दरम्यान, आपण शाळेला जाण्यास तयारी करत असताना हत्ती आल्याचा गोंधळ वाड्यावर झाला असे येथील प्रेम तोरस्कर या विद्यार्थ्याने सांगितले. हत्ती रस्त्याच्या बाजूलाच बसला होता. त्याने कोणालाच काही केले नाही. तो चारचाकी वाहनाकडे गेला. तेथे त्याने सोंडेने त्या वाहनाला स्पर्श केला. परत मागे हटला आणि डोंगराच्या दिशेने बागायतीकडे गेला असे त्याने सांगितले. हत्ती सुमारे दोन महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात होता. परंतु, तेथील वनखात्याचे कर्मचारी, कामगार आणि अधिकाऱ्यांनी त्याचा बंदोबस्त केला नाही. त्यामुळे गोव्यातील शेतकऱ्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे.
हत्तीने हरिजनवाडा परिसरातील दोन-तीन शेतकऱ्यांच्या कवाथे, केळी, पोफळीची नासधूस केली. सरकारने हत्तीचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी उपसरपंच उत्तम वीर यांनी केली.
गेले दोन महिने हत्ती महाराष्ट्रात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होता. महाराष्ट्र वनखात्याला त्याचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे. आता राज्य सरकारने, वनखात्याने हत्तीचा बंदोबस्त करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी उपसरपंच वीर यांनी केली.