गडकरी आणि गोवेकरांचं वेगळं नातं; पर्रिकरांनंतर गोव्याला दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 12:26 PM2019-06-20T12:26:04+5:302019-06-20T12:26:32+5:30

पर्रिकर व गडकरी यांच्यात अनेक वर्षे मैत्री होती. गोव्यात जेव्हा भाजपचे सरकार अधिकारावरही आले नव्हते त्या काळात म्हणजे 90च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे नेते अधूनमधून गोव्यात यायचे

Nitin Gadkari always helps to Goa after Manohar Parrirkar | गडकरी आणि गोवेकरांचं वेगळं नातं; पर्रिकरांनंतर गोव्याला दिला मदतीचा हात

गडकरी आणि गोवेकरांचं वेगळं नातं; पर्रिकरांनंतर गोव्याला दिला मदतीचा हात

Next

सदगुरु पाटील

पणजी : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्याशी एक वेगळे नाते अनेक वर्षे तयार होऊन राहिलेले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले व आता सुदिन ढवळीकर यांच्याकडे गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खाते राहिले नाही तरी, गोव्याकडे पाहण्याचा गडकरी यांचा दृष्टीकोन मुळीच बदललेला नाही. गोव्याला मदतीचा हात देण्याची गडकरी यांची भूमिका कायम राहिली असल्याचा अनुभव येत आहे.

पर्रिकर व गडकरी यांच्यात अनेक वर्षे मैत्री होती. गोव्यात जेव्हा भाजपचे सरकार अधिकारावरही आले नव्हते त्या काळात म्हणजे 90च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे नेते अधूनमधून गोव्यात यायचे आणि पर्रिकर यांना ते मार्गदर्शन करायचे. 2017 साली गोवा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही गडकरी यांनी गोव्यात धाव घेतली व गोव्यात पुन्हा परीकर यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठीची प्रक्रिया त्यांनी पार पाडली. पर्रिकर मुख्यमंत्रीपदी होते तेव्हा सुदिन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते गोव्यात बांधकाम मंत्री होते. गडकरी यांची ढवळीकरांशीही मैत्री  होती. पर्रिकर व ढवळीकर देत असलेले प्रस्ताव गडकरी यांनी कायम मान्य केले व त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, नवे मोठे पुल अशा साधनसुविधा गोव्यात उभ्या राहिल्या. एकूण पंधरा हजार कोटींचे  प्रकल्प गडकरी यांनी गोव्याला दिले. गोव्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण व्हायला हवे ही भूमिकाही गडकरी यांनीच पर्रिकरांना पटवून दिली व मग गोवा सरकारने ही भूमिका स्वीकारली.

आता प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहेत आणि दिपक प्रभू पावसकर हे गोव्याचे नवे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. पावसकर यांनी बांधकाम मंत्री झाल्यानंतर प्रथमच बुधवारी दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांच्यासमोर पावसकर यांनी गोव्यातील खांडेपार ते अनमोड घाटर्पयतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा विषय मांडला. भू-संपादन प्रक्रियेतील अडचणींचाही विषय मांडला. हा महामार्ग आता सहापदरी होणार आहे व त्यासाठी गडकरी यांनी पूर्ण सहकार्याचा हात दिला आहे, असे पावसकर यांनी लोकमतला सांगितले. आपण लवकरच गोव्यात येईन व त्यावेळी प्रलंबित कामे मार्गी लावूया असेही गडकरी यांनी सांगितल्याचे पावसकर म्हणाले.
गडकरी यांनी गोव्यातील कोणतेच काम कधी अडवून ठेवले नाही. तिसऱ्या मांडवी पुलालाही गडकरी यांच्यामुळेच केंद्र सरकारने चारशे-पाचशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मंत्री पावसकर यांनी गोव्यात डांबराचा मोठा तुटवडा आहे असे गडकरी यांना सांगितले. आम्ही विदेशातून डांबराची आयात करू पाहतोय असे पावसकर यांनी गडकरींना सांगितले व गडकरी यांनी लगेच मान्यता दिली. दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनीही स्वतंत्रपणे दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली.

Web Title: Nitin Gadkari always helps to Goa after Manohar Parrirkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.