नाइट लाइफचे धिंडवडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:06 IST2025-12-09T13:05:34+5:302025-12-09T13:06:20+5:30
शनिवारी मध्यरात्रीची ही आग म्हणजे मोठा प्रलयच ठरला.

नाइट लाइफचे धिंडवडे
डिसेंबर महिना हा गोव्यात लाखो पर्यटकांच्या गर्दीचा असतो. ख्रिस्ती बांधवांची टुमदार घरे पांढऱ्या शुभ्र रंगाने नटलेली असतात. देखण्या चर्च परिसरात रोषणाईचे काम सुरू असते. नाताळची चाहूल लागलेली असते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांसोबतच हिंदू व मुस्लीम बांधवही सज्ज होत असतात. अशावेळी खास गोंयकार वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक या प्रदेशात येतात. मोसम हैं आशियाना... अशी सुखद हवा डिसेंबरमध्ये असते. याच सुखद वातावरणाला यावेळी गालबोट लागले आहे. उत्तर गोव्याच्या किनारी भागातील हडफडे येथे 'बर्च बाय रोमियो लेन' नावाच्या नाइट क्लबला आग लागली. शनिवारी मध्यरात्रीची ही आग म्हणजे मोठा प्रलयच ठरला.
डिसेंबर १९६१ पर्यंत गोव्यात साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांची राजवट होती, पण अशी महाभयंकर आग दुर्घटना तेव्हा आणि तेव्हापासून आजवर घडल्याचे कधीच ऐकिवात नव्हते, असे जुन्या काळातील गोमंतकीय सांगतात. क्लब जळून खाक झाला. मेहबुबा, मेहबुबा... अशा मादक गाण्याच्या तालावर नशीले नृत्य सुरू असते. पर्यटक बेधुंद होतात. मद्याचे फसफसते प्याले भरलेले असतात. अशावेळीच स्टेजवर झालेल्या आतषबाजीमुळे (पायरो गन) आग लागते. प्रचंड धावपळ उडते. प्रत्येकजण जीव वाचविण्यासाठी बाहेर धावतो. मात्र, चिंचोळ्या रस्त्यावरील या क्लबच्या आत व बाहेर जाण्यासाठी केवळ एकच दरवाजा. आग विझविण्यासाठी आत कोणतीही व्यवस्था नाही.
आग आटोक्यात आणण्यासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ देखील नाही. नर्तिका कशीबशी वाचते पण, आतील कर्मचारी-कामगार व पर्यटक मिळून पंचवीस जणांचा जीव जातो. काही जणांच्या शरीराचा फक्त कोळसा उरतो. केवळ गोव्यातच नव्हे तर पूर्ण देशात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. गोव्यातील असुरक्षित नाइट लाइफचे धिंडवडे उडाले आहेत. भारतीय संस्कृतीच्या बाता करणाऱ्या गोव्यातील सरकारचा चेहरा शरमिंदा झालेला आहे. आता सुरू आहे एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी झटकण्याचा निर्लज्ज खेळ. गोवा सरकार स्थानिक ग्रामपंचायतीला दोष देत आहे, तर पंचायतीकडून सरकारी खात्यांकडे बोट दाखवले जात आहे. पंचवीसपैकी तेवीस जणांचा जीव हा श्वास गुदमरून गेला. क्बलमध्ये आगीचे तांडव सुरू झाले, कारण बहुतांश सुके गवत, माडाची झावळे, सुतळी, दोरखंड अशा साहित्याचा वापर करून छप्पर व अन्य काम क्लबमध्ये करण्यात आले होते.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी या क्लबला भेट दिली, तेव्हा त्यांनादेखील धक्काच बसला, असे त्यांनी लोकमतला सांगितले. अगदी नदीच्या पाण्यात क्लब उभा केला गेला; पण कोणत्याच सरकारी यंत्रणेने कधी या क्लबला अटकाव केला नाही. ग्रामपंचायतीने एकदा बांधकाम पाडण्याचा आदेश दिला, पण पुढे त्या आदेशाला पंचायत खात्याने स्थगिती दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी पंचायत संचालकांसह तिघांना सेवेतून निलंबित केले. हा वरातीमागून घोडे नेण्याचा प्रकार झाला. पूर्ण देशात गोव्याच्या प्रशासनाची नाचक्की झाली आहे. केवळ हा एकच क्लब असुरक्षित आहे असे नाही, गोव्याच्या किनारपट्टीत असे अनेक क्लब व रिसॉर्ट्स आहेत. आग लागली तर अग्निशामक दलाचे वाहन नेण्यापुरतेही रस्ते अनेक ठिकाणी नाहीत. काहीवेळा ड्रग्जच्या अतिडोसानेही पर्यटकांचे बळी जात असतात.
२०२२ साली हरयाणा येथील टिकटॉक स्टार सोनाली फोगट हिचा उत्तर गोव्याच्याच किनारपट्टीत जीव घेतला गेला होता. गोव्याचे बेधुंद नाइट लाइफ अनुभवत असतानाच तिचा खून पाडला गेला. गोव्यात होणाऱ्या ईडीएमसारख्या ७८ तासांच्या पार्थ्यांमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनाने यापूर्वी काही जणांचे बळी गेल्याचीही उदाहरणे आहेत. खाओ, पिओ, मजा करो हीच गोव्याची संस्कृती, असे पर्यटकांना व नाइट क्लब चालविणाऱ्या व्यावसायिकांनाही हल्ली वाटते. बहुतांश व्यावसायिक दिल्ली व अन्य हिंदी भाषिक प्रदेशातील आहेत.
गोव्यातील काही राजकारणी, काही मंत्री-आमदार वगैरे किनारपट्टीतील गैरधंद्यांमध्ये पार्टनर म्हणूनही पडद्याआडून भूमिका बजावतात. त्यामुळेच सरकारी यंत्रणा बेकायदा धंदे रोखू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आता चौकशी समिती स्थापन केली असली, तरी ती समिती म्हणजे तोंडाला पाने पुसणेच आहे. गोव्याच्या मांडवी नदीत कसिनोंच्या नावाखाली अनेक जुगाराचे अड्डे चालतात. तिथेही लाखो पर्यटक असतात, तिथे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच सरकारने सुरक्षात्मक उपाय करण्याची गरज आहे.