गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 05:39 IST2025-12-09T05:39:39+5:302025-12-09T05:39:57+5:30
मांडवीत सध्या सहा कसिनो जहाजे कार्यरत आहेत, तर अठरा मजली नवीन कसिनो येऊ घातला आहे. ऑफ-शोअर कसिनो जहाजांमधून आणीबाणीवेळी लोकांना बाहेर काढणे ही चिंतेची बाब आहे.

गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
पणजी : ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाइट क्लबमधील भीषण आग दुर्घटनेची पुनरावृत्ती मांडवी पात्रातील एखाद्या ऑफ शोअर कसिनोमध्ये घडल्यास शेकडो बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
मांडवीत सध्या सहा कसिनो जहाजे कार्यरत आहेत, तर अठरा मजली नवीन कसिनो येऊ घातला आहे. ऑफ-शोअर कसिनो जहाजांमधून आणीबाणीवेळी लोकांना बाहेर काढणे ही चिंतेची बाब आहे. आगीसारखी दुर्घटना घडल्यास लोकांना जिवाच्या आकांताने मांडवी नदीत उड्या माराव्या लागतील.
गोवा सरकारने काय केले?
कसिनो परवाना नियमांमध्ये सुरक्षा उपायांच्या बाबतीत अटी आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास ७५ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा नियम सरकारने याच वर्षी ऑगस्टमध्ये आणला. त्यासाठी १९७६ च्या गोवा सार्वजनिक जुगार कायद्यात महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या.
नवीन वर्षाच्या स्वागतामुळे काळजी
मांडवी नदीवरील बहुतेक ऑफ-शोअर कसिनो अग्निसुरक्षाविषयक अनिवार्य एनओसीशिवाय चालत असल्याचे याआधी आढळलेले आहे. कसिनोंच्या बाबतीतही जीवघेणा निष्काळजीपणा चालू आहे.
डिसेंबरमध्ये नाताळ, नववर्षालाच नव्हे तर मोठ्या वीकेंडला देखील पर्यटकांची कसिनोंवर मोठी गर्दी असते. कसिनोंमध्ये अग्निसुरक्षेचे नियम पाळले जातात का? हा मोठा प्रश्न आहे.
गोवा सरकारला कसिनो उद्योगातून मागील पाच वर्षांत १,६६१ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. त्यामुळे अधिक महसूल देणाऱ्या कसिनो जहाजांवरील सुरक्षा त्रुटींकडे गोवा सरकार दुर्लक्ष करणारच, अशी टीका कसिनोंविरोधातील याचिकाकर्ते सुदीप ताह्मणकर यांनी केली आहे.