many criminals resides in Goa as tenants | भाडेकरुंच्या रुपात अट्टल गुन्हेगारांचे गोव्यात खुलेआम वास्तव

भाडेकरुंच्या रुपात अट्टल गुन्हेगारांचे गोव्यात खुलेआम वास्तव

मडगाव: जास्तीचे पैसे मिळतात म्हणून कुणालाही घरात भाडेकरु म्हणून ठेवण्याचे प्रकार गोव्यात मोठ्या प्रमाणावर वाढले असून अशा भाडेकरुंमध्ये गुन्हेगारही वास्तव करुन रहातात ही वस्तुस्थिती सोमवारी रात्री मडगावच्या एसजीपीडीए मार्केटात झालेल्या दुहेरी खून प्रकरणातुन उजेडात आली आहे. अशाप्रकारे गुन्हेगारांना आसरा देणाऱ्या घर मालकांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी वाढू लागली आहे.

सोमवारी रात्री हा खून झाला होता. रवी, भीम व सुनिल हे तिघेजण एसजीपीडीए मार्केटातील एका बंद बारसमोर दारु पित बसले असता संशयित अजरुन काजीदोनी तिथे आला होता. त्याने त्यांच्याकडे दारु मागितली. पण ती न दिल्यामुळे रागाच्या भरात त्याने एकाच्या डोक्यावर दगड घातला तर अन्य दोघांवर फुटलेल्या बाटलीने हल्ला केला. या हल्ल्यात रवी व भीम हे दोघे ठार झाले. मंगळवारी दुपारी या संशयिताला अटक करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, संशयित माडेल मडगाव येथे एका भाड्याच्या खोलीत रहात होता. हल्लीच त्याने आपले बस्तान माडेलला हलविले होते. ज्या घर मालकिणीच्या घरात तो रहात होता तिने त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती पोलिसांना दिली नव्हती. खुनाची घटना घडल्यानंतरच ही बाब उजेडात आली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, संशयित काजीदोनी हा जरी परप्रांतीय असला तरी त्याचा जन्म गोव्यातच झाला होता. त्यामुळे तो अस्खलीत कोंकणी बोलत होता. पोलिसांनी त्याला पकडल्यावर आपल्याला सुनिललाही ठार करायचे होते. पण तो आपल्या हातातून निसटला असे त्याने पोलिसांना सांगितले. सदर संशयित यापूर्वी पेडा-बाणावली या भागात रहात होता. त्यावेळीही त्याने अशाच प्रकारे एकावर हल्ला केला होता. त्याची तक्रार कोलवा पोलिसात नोंद झाली होती. काही दिवसापूर्वीच त्याने आपले बस्तान माडेल मडगाव येथे हलवले होते. एका घर मालकिणीने आपल्या प्रसाधनगृहाचे परिवर्तन खोलीत केले होते. त्या खोलीत त्याचे वास्तव होते.
संशयिताची बहिणही माडेल येथेच रहात असून त्याच्या भावोजीचा दूध पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. आपल्या भावोजीकडेच तो गाडी चालवायचे काम करत होता. ही खुनाची घटना झाल्यानंतर तो आपल्या कामाचे पैसे मागण्यासाठी रात्रीच्यावेळी भावोजीकडे आला होता. भावोजीकडून त्याने 2800 रुपये घेतले होते. त्यावेळी त्याच्या कपड्यांना रक्त लागले होते अशी माहिती त्याच्या भावोजीकडून पोलिसांना मिळाली आहे. कदाचित हे पैसे घेऊन तो पळ काढण्याच्या तयारीत असावा. मात्र एसजीपीडीए मार्केटात काय झाले याची खातरजमा करुन घेण्यासाठी मंगळवारी दुपारी तो मार्केट परिसरात आला असता केवळ संशयावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या या कृत्याचा उलगडा झाला.
दरम्यान, माडेल येथे ज्या घर मालकिणीच्या खोलीत तो रहात होता त्याबद्दल त्या घर मालकिणीने पोलिसांना कुठलीही माहिती दिली नव्हती. या घटनेचेही पडसाद माडेल येथील रहिवाशामध्ये उमटले असून माडेल व अन्य भागात अशाप्रकारे अनेक भाडेकरु वास्तव्य करुन रहात असून त्यापैकी कित्येकांची माहिती पोलिसांना दिली जात नाही. अशा घर मालकांच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे. पोलिसांनी स्वत:हून येऊन अशा भाडेकरुंची पहाणी करावी आणि जर कुठल्याही घर मालकाने माहिती दडवून ठेवली असेल तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, त्या घर मालकिणीच्या विरोधात फातोर्डा पोलीस कारवाई करतील अशी माहिती मडगावचे पोलीस उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी दिली आहे.
माडेल येथील रहिवासी असलेले सावियो डायस यांनी अशाप्रकारांना स्वत: पोलीसही जबाबदार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, मडगाव व जवळपासच्या किनारपट्टी भागात कित्येक परप्रांतीय असे भाडय़ाने रहातात. कित्येकदा एका फ्लॅटात सात आठ जण रहात असल्याचेही दिसुन आले आहे. त्यांना कुणी स्थानिक ओळखत नाहीत. त्यातही असे गुन्हेगार असण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी स्वत:हून अशा भाडेकरुंची चौकशी करण्याची गरज असून अशी माहिती न देणा:या घर मालकांविरोधातही कारवाई केल्यास अशा प्रकारावर आपोआप नियंत्रण येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
दारु देण्यास नकार दिल्यामुळे मडगावच्या एसजीपीडीए मार्केटात दोघांचा खून करण्याचा आरोप असलेल्या संशयित अजरुन काजीदोनी याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाचीच असल्याची बाब आता पुढे आली असून या पूर्वी अशाचप्रकारे एकावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली या आरोपीवर यापूर्वी कोलवा पोलीस स्थानकातही गुन्हा नोंद झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
 

Web Title: many criminals resides in Goa as tenants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.