गोव्याच्या कार्निव्हलवर मद्य दरवाढीचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 06:55 PM2020-02-14T18:55:21+5:302020-02-14T18:57:10+5:30

‘खा, प्या आणि मजा करा’, असा संदेश देणारा कार्निव्हल तोंडावर असताना राज्य अर्थसंकल्पात अबकारी करात केलेली लक्षणीय वाढ चर्चेचा विषय ठरली आहे.

liquor hike impact on Goa's Carnival | गोव्याच्या कार्निव्हलवर मद्य दरवाढीचे सावट

गोव्याच्या कार्निव्हलवर मद्य दरवाढीचे सावट

googlenewsNext

पणजी - ‘खा, प्या आणि मजा करा’, असा संदेश देणारा कार्निव्हल तोंडावर असताना राज्य अर्थसंकल्पात अबकारी करात केलेली लक्षणीय वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. दारू स्वस्त मिळण्याचे ठिकाण म्हणून गोव्यात येणाऱ्या  देशी पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे, परंतु सरकारने मद्यावरील करात केलेल्या वाढीमुळे अन्य राज्यांच्या तुलनेत आता गोव्याच्या मद्य दरात विशेष फरक राहिलेला नाही

विरोधी काँग्रेस पक्षाने या करवाढीवर नाराजी व्यक्त करताना पर्यटन व्यवसाय यामुळे धोक्यात आला असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘शेजारी महाराष्ट्र आणि गोव्यात बीअर बाटलीच्या दरात केवळ १२ रुपये फरक राहिलेला आहे. ८0 रुपयात मिळणारी पोर्ट वाइनची बाटली ९२ रुपयांवर पोचली आहे. सरकारने अर्थसंकल्पात कॅसिनो जुगारावर कोणतेही भाष्य केले नाही. कॅसिनोंसाठी कोणतीही करवाढ केलेली नाही. गोमंतकीयांच्या शिल्लक राहिलेला पर्यटन व्यवसायही मद्य दरवाढीमुळे धोक्यात आला आहे.

कार्निव्हलची धामधूम साजरी करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना मद्य दरवाढीचा हा तसा शॉकच आहे. सत्ताधारी मंत्रीही या करवाढीवरुन नाराज आहेत. कळंगुट किनारपट्टी मतदारसंघाचे आमदार तथा बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी व्टीट करून या करवाढीवर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन ही करवाढ कमी करावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे लोबो यांनी म्हटले आहे. लोबो म्हणतात की, ‘ख्रिस्ती धर्मीयांमध्ये विवाह समारंभ तसेच पारंपरिक उत्सवांसाठी वाइन लागते. त्यामुळे वाइनवरील करवाढ तसेच काजू फेणी वरील करवाढही कमी करायला हवी.’

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनीही मद्यावरील करवाढीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात की, काजू फेणी गोव्याची खासियत असून हे वारसा पेय आहे. गोव्याच्या फेणीला जीआय मानांकनही मिळाले आहे. सरकारने हे स्पष्ट करायला हवे की, फेणीवर कर वाढवण्याची सूचना कोणाकडून आली? की सरकारच्या डोक्यातूनच ही कल्पना आलेली आहे?, असा सवाल त्यांनी केला. 

गोव्यातील काजू फेणी उत्पादकांच्या संघटनेने करवाढीला विरोध केला आहे. गोव्यात काजू आणि नारळापासून फेणी बनवली जाते.  गोव्याची काजूफेणी, वाइन याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मुद्दामून येथे येत असतात. अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात मद्य स्वस्त मिळते परंतु आता दर वाढणार आहेत. पर्यटन व्यवसायाला आधीच उतरती कळा लागली असताना करवाढीचे हे नवे संकट व्यवसायिकांसमोर उभे ठाकले आहे.

दरम्यान, गोव्यात येत्या २२ ते २५ फेब्रुवारी असे चार दिवस कार्निव्हल साजरा केला जाणार आहे. शनिवारी २२ रोजी राजधानी पणजी शहरात कार्निव्हल मिरवणुकीतून ‘किंग मोमो’ खा, प्या मजा करा, असा संदेश देत अवतरणार आहे. अबकारी करवाढ प्रत्यक्षात १ एप्रिलपासून लागू होणार असली तर काही मद्य व्यावसायिकांनी दारु गडप केली आहे. त्यामुळे कार्निव्हलच्या तोंडावर हे नवे संकट उभे राहिले आहे. 

Web Title: liquor hike impact on Goa's Carnival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.