स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 09:17 IST2025-12-07T09:17:17+5:302025-12-07T09:17:56+5:30
पणजी - गोव्यातील हडफडे येथे असणाऱ्या 'बर्च बाय रोमिओ लेन क्लब'मध्ये रात्री मोठा स्फोट झाला. त्यानंतर काही सेकंदात इथं ...

स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
पणजी - गोव्यातील हडफडे येथे असणाऱ्या 'बर्च बाय रोमिओ लेन क्लब'मध्ये रात्री मोठा स्फोट झाला. त्यानंतर काही सेकंदात इथं आगीचा भडका उडाला. त्यामुळे आतमधील लोकांना बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण आगीने संपूर्ण परिसरात दहशत पसरली. या दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यातील २० जणांचा गुदमरून जीव गेला आहे. ३ जण जिवंत जळाले. आमदार माइकल लोबो यांनी ही भयंकर दुर्घटना असल्याचं सांगत क्लबच्या सेफ्टी ऑडिटची मागणी केली आहे.
बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये रात्री किचन एरियामध्ये हा स्फोट झाला. त्यानंतर काही क्षणात सगळीकडे आग पसरली. पाहता पाहता बेसमेंटपर्यंत धूर जमा झाला होता. क्लबमधील बेसमेंटमध्ये सर्वाधिक लोक होते. जसं आग लागली तसा मोठा गोंधळ उडाला. लोक बाहेरच्या दिशेने पळण्याऐवजी बेसमेंटच्या दिशेने धावले. ज्याठिकाणी धूरामुळे अनेकांचा जीव गेला. या दुर्घटनेत २० जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर ३ जण जिवंत जळाल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेतील २ जखमींचा उपचारावेळी मृत्यू झाला त्यामुळे मृतांचा आकडा २५ वर पोहचला आहे. या घटनेबाबत शोक व्यक्त करत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.
फायर सेफ्टी ऑडिट होणार
गोव्यातील या दुर्घटनेनंतर स्थानिक आमदार माइकल लोबो यांनी याप्रकारे पुन्हा दुर्घटना घडू नये म्हणून फायर सेफ्टी ऑडिटची मागणी केली आहे. राज्यातील सर्व क्लबचं सेफ्टी ऑडिट करा असं त्यांनी म्हटलं आहे. या मृतांमध्ये काही पर्यटक होते, परंतु बहुतांश लोक स्थानिक होते जे या क्लबमध्ये बेसमेंटमध्ये काम करत होते असंही आमदारांनी सांगितले.
दरम्यान, सुरुवातीच्या तपासात नाइट क्लबमध्ये फायर सेफ्टी नियमांचे उल्लंघन केल्याचं समोर आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील ४ पर्यटक आणि १४ क्लबचे कर्मचारी यांचा समावेश आहे असं गोवा पोलीस डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले. ही आग कशामुळे लागली याची कारणे शोधली जात आहेत. पोलीस कंट्रोल रूमला १२.०४ वाजता आगीची सूचना मिळाली. त्यानंतर पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका तिथे पोहचली. अनेक तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व मृतदेह बाहेर पडले.