जिल्हा पंचायत उमेदवारी; अर्जाची आज अंतिम मुदत, काल एकाच दिवशी तब्बल १३२ उमेदवारी अर्ज सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:20 IST2025-12-09T13:19:45+5:302025-12-09T13:20:20+5:30
प्रमुख राजकीय पक्षांसोबत अनेक अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

जिल्हा पंचायत उमेदवारी; अर्जाची आज अंतिम मुदत, काल एकाच दिवशी तब्बल १३२ उमेदवारी अर्ज सादर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज मंगळवारी संपत आहे. काल राज्यभरातून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी १३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज अपेक्षित आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसोबत अनेक अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
खोर्ली व पैंगीण मतदारसंघांमध्ये काल एकाच दिवशी प्रत्येकी ६ उमेदवारांनी अर्ज भरुन निवडणूक अधिक चुरशीची बनवली आहे. शिवोली व तोरसें मतदारसंघात काल ५ जणांनी अर्ज भरले. सांताक्रुझ, चिंबल, कळंगुट, हणजुण आदी मतदारसंघांमध्ये भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये तिरंगी लढत दिसत आहे.
दक्षिण गोव्यात सध्या तरी सावर्डे, धारबांदोडा या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या जास्त दिसत असली तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच चित्र स्पष्ट होईल. राजकीय समीकरणे, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि विविध पक्षांचे बंडखोर गट लक्षात घेता या निवडणुका अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.