क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले; गोवा पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:31 IST2025-12-09T13:30:34+5:302025-12-09T13:31:32+5:30

हडफडेत न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू, क्लब सांभाळणारा भरत कोहली अटकेत

goa night club owner luthra brothers flee to thailand goa police in touch with Interpol | क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले; गोवा पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क 

क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले; गोवा पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबमधील भीषण आगीत २५ या जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरणातील मुख्य संशयित तथा क्बलचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी रविवारी पहाटे काही तासांतच भारतातून पळ काढला. दोघेही थायलंडला पळाल्याचे वृत्त आहे.

तपासादरम्यान ब्युरो इमिग्रेशनकडून मिळालेल्या माहितीने पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. दोघांनी रविवारी, ७ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता इंडिगोच्या 6 E 1073 या विमानाने फुकेट, थायलंडला प्रस्थान केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, क्लबचे दैनंदिन व्यवहार पाहणारा भरत कोहली याला दिल्लीमधून अटक करण्यात आली असून त्याला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी या दोघांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापे मारले होते. मात्र तेथे ते दोघेही आढळले नाहीत. त्यांच्या घरावर नोटीस चिकटवण्यात आली आहे. आग लागल्याच्या घटनेनंतर काही तासांतच त्यांनी पोलिसांची चौकशी चुकवण्यासाठी पळ काढला. दुर्घटनेच्या दिवशीच, म्हणजे ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी दोघांविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली होती. गोवा पोलिस सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी समन्वय साधून लुथरा बंधूंचा शोध घेत आहेत.

हडफडे-बागा येथील क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीप्रकरणी हणजूण पोलिसांनी पाचव्या संशयितास अटक केली. क्लबचे कामकाज पाहणारा भारत करुणसिंग कोहली (वय ४९, रा. पंजाब) असे त्याचे नाव आहे. तो क्लबच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मालकांच्या वतीने सांभाळत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. क्लबचे मुख्य सरव्यवस्थापक राजीव मोडक यांच्यासह अन्य चार व्यवस्थापकांना अटक करण्यात आली होती. पोलिसांचे एक पथक क्लबच्या मालकाला अटक करण्यासाठी दिल्लीस रवाना झाले आहे. क्लबमध्ये काम करणारे काही कर्मचारी त्या परिसरात राहातात. क्लबने त्यांच्या निवासाची सोय केली होती. सुमारे वीसहून अधिक कर्मचारी सोमवारी परिसरात होते.

ड्रग्जवरच क्लब चालतात : आग्नेल

म्हापसा : कळंगुट तसेच इतर किनारी भागात गैरप्रकार वाढले आहेत. हप्ता वसुली केली जात असल्याने असे प्रकार घडू लागले आहेत. अशा क्लबमध्ये दारुऐवजी ड्रग्जची विक्री जास्त होत असते. ड्रग्जवरच हे क्लब चालवले जातात असा आरोप माजी आमदार आग्नेल फर्नाडिस यांनी केला. आमदार मायकल लोबो यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतः जबाबदारी स्वीकारावी. सरपंचाला स्थानकावर बोलावणे अत्यंत चुकीचे आहे.

वीज अभियंत्यांना नाकारला प्रवेश

या प्रकरणात चौकशी करणाऱ्या हणजूण पोलिसांनी अग्नितांडवानंतर सोमवारी दिवसभर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला. क्लबच्या सर्व तिन्ही गेटवर पोलिसांचा कडक पहारा तैनात करण्यात आला आहे. क्लबमध्ये आलेल्या वीज अभियंत्याला तसेच कामगार आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना आत शिरण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारली.

लुथरा बंधूविरुद्ध 'लूक आउट' नोटीस, पण...

पोलिसांनी रविवारी सायंकाळी क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा या दोघांविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली. देशातील सर्व विमानतळांना सतर्क करण्यात आले असून दोन्ही मालक देशाबाहेर गेल्याची माहिती त्यांना मिळाली.

समितीकडून चौकशी

'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमध्ये घडलेल्या भीषण आग दुर्घटनेनंतर सरकारने मंगळवारी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली मॅजिस्ट्रियल चौकशी समिती स्थापन केली. या समितीवर दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, फॉरेन्सिक सायन्सेसचे संचालक आशुतोष आपटे, अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर हे सदस्य आहेत. या समितीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी यादव, बार्देशचे मामलेदार अनंत मळीक यांसह अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोजा हेसुद्धा पाहणीवेळी होते.

आठवडाभरात अहवाल

परवान्यांमधील त्रुटी, शासकीय पातळीवरील दुर्लक्ष आणि सर्व संबंधित परिस्थितींची सखोल छाननी करण्याची या समितीची जबाबदारी आहे. प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, संबंधित विभागांकडून कागदपत्रे मागविणे व संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठविण्याचे अधिकार या समितीला असून, एका आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आगीत आठ नेपाळी कामगारांचा मृत्यू

हडफडे येथील नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत मृत्यू झालेल्या नेपाळी नागरिकांपैकी दोघाजणांचे मृतदेह कुटुंबीयांनी स्वीकारले आहेत. या दुर्घटनेत एकूण आठ नेपाळी कामगारांचा जीव गेला असल्याची पुष्टी झाली आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी गोवा सरकारने केलेल्या तत्पर मदतकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मृतदेह स्वदेशात पाठवण्याच्या प्रक्रियेत प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दलही नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. या दुर्दैवी घटनेमुळे नेपाळी कामगारांच्या समाजात हळहळ व्यक्त होत आहे.

परवाने देणाऱ्यांची चौकशी

मार्च २०२४ पासून ट्रेड लायसन्स कालबाह्य असूनही क्लब सुरू होता. गोवा पंचायत राज अधिनियमाच्या कलम ७२ अ नुसार स्थानिक संस्थेला असे आस्थापन सील करण्याचा अधिकार आहे. मात्र ते करण्यात आले नाही. त्यामुळे सरपंचाने दिलेल्या परवान्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सद्यस्थितीत क्लबला दिलेले विविध परवाने आणि परवाने देणारे अधिकारी समितीच्या रडारवर आहेत. अधिकाऱ्यांना समन्स पाठवून कसून चौकशी सुरू आहे. परवाने, अनुज्ञप्तीमध्ये काही त्रुटी राहिल्या का, तसेच प्रक्रिया नियमांनुसार पार पडली का? याची खातरजमा करण्यासाठी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. परवाना प्रक्रियेत झालेल्या संभाव्य उल्लंघनाची तपासणी प्राधान्यक्रमाने केली जात आहे. सध्या सुरक्षा मानकांचे ऑडिट करणारी समिती कार्यरत झाली आहे. अशा प्रकारच्या क्लब व आस्थापनांच्या सुरक्षा निकषांचे ऑडिट करणारी समिती स्थापन करून एसओपी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

क्लबचे ट्रेड लायसन्स २० महिन्यांपूर्वीच कालबाह्य

न्यायदंडाधिकारी समितीने घटनास्थळाला भेट देत सर्व संबंधित दस्तऐवज मागवले. मुख्यमंत्री कार्यालयातून रात्री उशीरा ही माहिती देण्यात आली. सरपंचाने दिलेल्या परवान्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ट्रेड लायसन्स मार्च २०२४ पासून कालबाह्य झाले आहे. सरपंचाकडून वीज-जोडणी, पाणी-जोडणी, बांधकाम दुरुस्ती, ट्रेड लायसन्ससह विविध ना हरकत दाखले देण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

स्थानिकांचा रोष

क्लब परिसरात इतर अनेक व्यवसाय आहेत. पण स्थानिक पंचायतीकडून क्लब वगळता इतरांना, स्थानिकांना परवाने उपलब्ध करुन देण्यास दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सरकार फक्त वशिलेबाजीला सहकार्य करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आगीत २० कर्मचारी व ५ पर्यटकांचा मृत्यू झाला. सर्व मृतांचे शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली असून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी मध्यरात्री कार्यक्रमादरम्यान कोल्ड पायरोगन (इलेक्ट्रिक फटाके) पेटवल्यामुळे क्लबमध्ये जोरदार आग लागली होती.
 

Web Title : गोवा क्लब अग्निकांड: मालिक थाईलैंड फरार; इंटरपोल से संपर्क।

Web Summary : गोवा के एक क्लब में भीषण आग लगने के बाद, मालिक गौरव और सौरभ लूथरा थाईलैंड भाग गए। पुलिस ने इंटरपोल से संपर्क किया है। एक संदिग्ध गिरफ्तार।

Web Title : Goa club fire: Owners flee to Thailand; Interpol contacted.

Web Summary : Following a deadly fire at a Goa club, owners Gaurav and Saurabh Luthra fled to Thailand. Police have contacted Interpol. One suspect arrested.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.