गोव्याचे स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 03:16 PM2020-10-01T15:16:33+5:302020-10-01T15:16:39+5:30

मडगाव : भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि गोवा मुक्तीसंग्रामात भाग घेतलेले आणि गोव्यातील सहकार चळवळीला मोठे योगदान दिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य ...

Goa freedom fighter Tulshidas Malkarnekar passes away | गोव्याचे स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांचे निधन

गोव्याचे स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांचे निधन

Next

मडगाव : भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि गोवा मुक्तीसंग्रामात भाग घेतलेले आणि गोव्यातील सहकार चळवळीला मोठे योगदान दिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास मळकर्णेकर (89) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. गुरुवारीच  मडगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पुत्र सुदेश, पत्नी, विवाहित कन्या व अन्य परिवार आहे.

गोव्यातील सहकार आणि सामाजिक चळवळीत क्रियाशील असलेले मळकर्णेकर हे वृद्धापकाळामुळे मागचा काही काळ आजारी होते. अशा  अवस्थेत गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र कोविड महामारीमुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यासाठी वापरला होता. योगायोगाने त्यांना मृत्यूही जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनीच आला. त्यांच्या निधनावर गोमंत विद्या निकेतन तसेच विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दुःख व्यक्त केले आहे.

1942 च्या चले जाव चळवळीत भाग घेतलेल्या मळकर्णेकर याना त्यावेळी अरुणा असफअली यांच्याबरोबर 9 दिवसांची शिक्षाही झाली होती. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच गोवा मुक्ती चळवळीतही ते सहभागी झाले होते. ते जरी स्वातंत्र्य सैनिक असले तरी त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा स्वेच्छेने त्याग केला होता.

गोवा मुक्तीनंतर त्यांनी गोव्यात कामगार आणि सहकार चळवळ उभारणीवर भर दिला होता. इंटक या कामगार संघटनेचे गोव्यातील संस्थापक अध्यक्ष वासुदेव गवस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गोव्यात कामगार चळवळ उभी केली. सहकार क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून मडगाव अर्बन बँकेचे संस्थापक सदस्य होते. गोवा राज्य सहकारी बँक,  गोवा मार्केटिंग फेडरेशन आदी संस्थांचे ते पदाधिकारी होते. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना 'गोवा सहकार श्री' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

मळकर्णेकर हे काँग्रेस पक्षाचे सदस्य होते, अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सदस्य असताना त्यांच्या संबंध अनेक मोठ्या नेत्यांकडे आला होता. मात्र मोरारजी देसाई यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर त्यांनीही काँग्रेस सोडून ते जनता दल पक्षात सामील झाले. गोवा जनता दल पक्षाचे ते उपाध्यक्ष होते.

मळकर्णेकर हे जाज्वल्य मराठीप्रेमी होते. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे यासाठी ते वावरले. गोमंतक मराठी अकादमी, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, गोमंत विद्या निकेतन या संस्थांशी संबंद असलेल्या मळकर्णेकर गोव्यात मराठीलाही राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी चळवळ केली होती. ते पत्रकारही होते. मुंबईहुन प्रसिद्ध होणाऱ्या नावशक्ती आणि गोव्यातून प्रसिद्ध होणाऱ्या गोमंतक या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

Web Title: Goa freedom fighter Tulshidas Malkarnekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा