Goa Election 2022 : ... तेव्हा पैशाला नव्हे, व्यक्तीला होती किंमत; माजी आमदारांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:25 AM2022-01-20T07:25:31+5:302022-01-20T07:26:08+5:30

"राजकारण व्यवसाय नसून व्रत आहे, मनोहर पर्रीकर यांनी यासंदर्भात आशेचा किरण निर्माण केला होता"

Goa Election 2022 that time money did not matter person has value said former mla rohidas naik bjp congress polls | Goa Election 2022 : ... तेव्हा पैशाला नव्हे, व्यक्तीला होती किंमत; माजी आमदारांनी व्यक्त केल्या भावना

Goa Election 2022 : ... तेव्हा पैशाला नव्हे, व्यक्तीला होती किंमत; माजी आमदारांनी व्यक्त केल्या भावना

अजय बुवा 

फोंडा : ‘पैशाने राजकारणाची वाट लावली हे जरी सत्य असले तरी याला मतदार जबाबदार नसून, राजकारणीच जबाबदार आहेत. राजकारणात पैशाचा उगम झाला नव्हता, त्यावेळी लोकांना व कार्यकर्त्यांना पैशाची चटक लावण्याचे काम काही राजकारण्यांनी केले. अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मग इतर उमेदवार व हळूहळू सरसकट सगळ्याच पक्षांनी पैशालाच महत्त्व द्यायला सुरुवात केली. मला पहिल्या निवडणुकीत फक्त नऊ हजार रुपये खर्च आला. कारण त्यावेळी पैसा नगण्य होता, माणूस महत्त्वाचा होता,’ अशी आठवण फोंड्याचे माजी आमदार रोहिदास नाईक यांनी जागवली. 

आज ९७ वय गाठलेले माजी आमदार नाईक ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘आता एका पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच चालू आहे. लोक म्हणतात की, पैसे देऊन तिकीट विकत घेण्याची परंपरा सुरू झाली आहे. तिकिटासाठी पैसे द्या. नंतर निवडून येण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करा ही पद्धत चुकीची, लोकशाहीकरिता घातक आहे. माझ्या मते राजकारण आज व्यवसाय झाला आहे. आज गुंतवणूक करायची, उद्या त्याची भरपाई करण्यासाठी मग सगळे मार्ग अवलंबायचे. आमच्याकाळी उमेदवारी घ्या म्हणून पक्षाचे नेते चांगल्या उमेदवाराच्या घरी हेलपाटे मारायचे. उमेदवाराला एक रुपया खर्च करावा लागत नव्हता. जो काही तुटपुंजा खर्च यायचा, तो पक्ष स्वतः खर्च करायचा. पहिल्या निवडणुकीत नऊ हजार खर्च झाल्यानंतर दुसऱ्या निवडणुकीत फक्त ३२ हजार खर्च मला आला होता. तोसुद्धा पक्षानेच केला होता.’

मुळात त्यावेळी प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा फार मोठ्या नसायच्या. त्यामुळे कमी खर्चात निवडणुका व्हायच्या. आजची परिस्थिती वेगळी आहे. याला कारण राजकारणीच आहेत. त्यांनी चुकीच्या सवयी लावल्या. तेव्हा शब्दाला किंमत होती. लोक व्यक्ती बघायचे. म्हणून पैसे नसताना अनेकजण आमदार झाले. लाच हा प्रकार त्यावेळी नव्हता. लाच न घेता कामे आम्ही केली. मतांसाठी एक छदाम त्यावेळी आम्ही कुणाला देत नव्हतो. समोरचा माणूसही तशी अपेक्षा ठेवत नव्हता. पोलिंग एजंटना वगैरे पैसे द्यायची पद्धत काँग्रेसने सुरू केली. परंतु आमचे पोलिंग एजंटसुद्धा पक्षाचा आदेश मानून काम करायचे’, असे नाईक म्हणाले. 

‘राजकारण व्यवसाय नसून व्रत आहे, हे काळजात बिंबवणारा नेता निर्माण व्हायला हवा. मनोहर पर्रीकर यांनी यासंदर्भात आशेचा किरण निर्माण केला होता. त्याचा प्रभावही वाढू लागला होता’ असेही नाईक म्हणाले. ‘मगोकडून असंख्य चुका झाल्या. पक्षाला गतवैभव मिळणे तसे कठीण आहे. परंतु अशक्य नाही. निवडणुकीच्या दरम्यान आमचे नेते जागे होतात. गतवैभव आणण्यासाठी सतत पाच वर्षे काम करण्याची तयारी पक्षाने ठेवायला हवी’ असेही मत त्यांनी मांडले. 

भाऊसाहेबांनी त्याग लक्षात ठेवला 
‘त्याकाळी पक्षाचा जो सर्वोच्च नेता असायचा, त्याचा शब्द अंतिम मानला जायचा. भाऊसाहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून कार्यकर्ते कामाला लागायचे, म्हणून त्यावेळी बजबजपुरी नव्हती. नेता पक्षाची दिशा ठरवायचा. आज अनेक नेते तयार झाल्याने हेवेदावे व स्पर्धा वाढीस लागली. कार्यकर्ता शेवटपर्यंत पक्षाकडे बांधील असायचा. मी या वयातसुद्धा मगो पक्षाशी एकनिष्ठ आहे. कारण आमच्यावर संस्कारच तसे झाले आहेत. १९७२ पूर्वीची निवडणूक लढविण्याची मी तयारी केली होती. परंतु पक्षाने शशिकला काकोडकर यांना उमेदवारी दिली. पक्षाचा आदेश मान्य करून मी माघार घेतली. आज तसे होताना दिसत नाही. तिकीट न मिळाल्यास बंडखोरी केली जाते. मी त्यावेळी माघार घेतल्याचे भाऊसाहेबांनी ध्यानात ठेवले.  १९७२ मध्ये मला घरी येऊन उमेदवारी दिली. आजचा राजकारणी त्याग करायला तयार नसतो.

Web Title: Goa Election 2022 that time money did not matter person has value said former mla rohidas naik bjp congress polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.