Goa Election 2022 : वीज, पाण्यासह नेटवर्कही हवे, गोव्यातील युवकांची अपेक्षा; स्थानिकांच्या जमिनींचा मुद्दा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:05 AM2022-01-19T09:05:01+5:302022-01-19T09:05:30+5:30

समस्या मांडण्यासाठी आमचा आमदार आम्हाला गावात उपलब्ध व्हावा, तरुणाईची माफक अपेक्षा

Goa Election 2022 Need for electricity water mobile network expectations of Goa youth The issue of local lands is on the agenda | Goa Election 2022 : वीज, पाण्यासह नेटवर्कही हवे, गोव्यातील युवकांची अपेक्षा; स्थानिकांच्या जमिनींचा मुद्दा ऐरणीवर

Goa Election 2022 : वीज, पाण्यासह नेटवर्कही हवे, गोव्यातील युवकांची अपेक्षा; स्थानिकांच्या जमिनींचा मुद्दा ऐरणीवर

Next

तेजा आरोंदेकर-मळेकर
पणजी : निवडणुका आल्या की, आपण काय करणार हे उमेदवार सांगत फिरतात. पण युवा मतदारांना काय पाहिजे, याचा कोणीच विचार करत नाही. मये मतदारसंघातील युवकांच्या प्रतिक्रिया लोकमतने जाणून घेतल्या. तेव्हा या युवकांच्या वीज, पाणी, नेटवर्क अशा किमान अपेक्षा आहेत. त्याचबरोबर स्थानिक जमिनींचा महत्त्वाचा प्रश्न लोकप्रतिनिधींनी सोडवावा, अशी मागणी त्यांची आहे. आजवर या मागण्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. 

मये मतदारसंघात अद्याप अनेकांना जमिनींचा हक्क मिळाला नाही. त्यांना केवळ आश्वासनेच मिळाली. जमिनींचा हक्क देण्यात यावा, असे युवक म्हणतात. तसेच काही गावांत अजून वीज, पाणी आणि नेटवर्क यांसारख्या समस्या आहेत. या समस्या आतातरी सोडवाव्यात. आमचा आमदार आम्हाला गावात उपलब्ध व्हावा. जेणेकरून आम्ही आमचे प्रश्न त्याच्याकडे मांडू शकू, असेही काही युवकांनी सांगितले.

बहुतांश युवकांनी रोजगार निर्मितीवर भर दिला आहे. तसेच जे स्वतः व्यवसाय करत आहेत, त्यांना पाठबळ द्यावे. युवकांना सक्षम करावे, लाचार करू नये, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात असलेल्या युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे युवकांचे म्हणणे आहे.

मंदिर संवर्धनाकडे लक्ष द्यावं
मये मतदारसंघाला प्राचीन मंदिरांचा वारसा लाभलेला आहे. या मंदिरांचे संवर्धन करण्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. येथील सप्तकोटेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. वायंगिणी येथील खेतोबाचे मंदिर, शिरगावचे लई-राई मंदिर, महामाया मंदिर अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांबाबत विविध आख्यायिका आहेत. येथे ‘मये’ दर्शन यांसारखा उपक्रम राबवून एखादा जाणकार गाईड नेमून पर्यटनदृष्ट्या विचार केला जाऊ शकतो, असे युवकांचे म्हणणे आहे.

निवडून येणाऱ्या आमदारांनी महिन्यातील एक दिवस मयेतील लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी द्यावा. युवकांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे भ्रष्टाचाराशिवाय नोकऱ्या द्याव्यात. वीज, पाणी, मूलभूत सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात. रस्त्यांचा विकास, गावात क्रीडा मैदानाचा विकास, जमिनींचे हक्क, नेटवर्क समस्या, अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे.
श्रद्धा कवळेकर, गावकरवाडा, मये 

मयेत आम्हाला फॅमिलीराज नको. नवा आणि युवा चेहरा हवा आहे. युवकांचे विषय त्यांनी मांडले पाहिजेत. रोजगार निर्मितीवर भर द्यायला हवा. त्यासाठी नवे, पर्यावरणपूरक प्रकल्प येथे आणता येतील. कला आणि क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावे. गावातील निसर्गाचे नुकसान न करणारे प्रकल्प हवे आहेत. त्यासाठी लक्ष देणारा लोकप्रतिनिधी येथे मिळावा, अशी अपेक्षा आहे. 
गुरुदास कृष्णा बाले, नार्वे 

मये मतदारसंघातील युवकांना सध्या रोजगार हवा आहे. रोजगार निर्मितीवर भर देणे सध्या फार महत्त्वाचे आहे. अन्य कुठल्याही विकासकामांचा विचार करण्याअगोदर प्रथम रोजगाराचा विचार करावा. कारण बेरोजगारीवर मात केली तरच आपण चांगल्या पद्धतीने इतर विकासाचा विचार करू शकतो. या अनुषंगाने काय करता येईल, याचे नियोजन आमदारांनी करावे, अशी अपेक्षा आहे. 
अश्विन चोडणकर, चोडण 

युवकांना सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. मये मतदारसंघाच्या आमदारांकडून खरेतर आम्हाला काही अपेक्षा नाही. लोकप्रतिनिधींनी  परप्रांतीयांना नव्हे तर स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बेरोजगारी हटवून युवकांना रोजगार, स्वयंरोजगार या अनुषंगाने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. 
विष्णू चोडणकर, नार्वे

Web Title: Goa Election 2022 Need for electricity water mobile network expectations of Goa youth The issue of local lands is on the agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.