Goa Election 2022: मायकल लोबोंची लागणार कसोटी; गोव्यात काँग्रेस नेत्यांच्या बंडानंतर चुरस वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:57 AM2022-01-19T11:57:59+5:302022-01-19T11:58:35+5:30

Goa Election 2022: कळंगुट मतदारसंघातील मतदारांनी आपला कौल सततपणे एकाच पक्षाच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या बाजूने न देता वेगवेगळ्या पक्षांना, उमेदवारांना निवडून देण्यास प्राधान्य दिले आहे.

goa election 2022 michael Lobo test after the revolt of congress leaders in goa | Goa Election 2022: मायकल लोबोंची लागणार कसोटी; गोव्यात काँग्रेस नेत्यांच्या बंडानंतर चुरस वाढली

Goa Election 2022: मायकल लोबोंची लागणार कसोटी; गोव्यात काँग्रेस नेत्यांच्या बंडानंतर चुरस वाढली

Next

प्रसाद म्हांबरेस लोकमत न्यूज नेटवर्क

म्हापसा : कळंगुट मतदारसंघातील मतदारांनी आपला कौल सततपणे एकाच पक्षाच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या बाजूने न देता वेगवेगळ्या पक्षांना, उमेदवारांना निवडून देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघावर एकाच पक्षाला  किंवा उमेदवाराला आपले प्रभुत्व गाजविण्यास आजअखेर शक्य झालेले नाही. मतदारसंघाचे माजी आमदार, हेविवेट नेते मायकल लोबो यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना काँग्रेसने उमेदवारीही जाहीर केली.  लोबोंच्या या प्रवेशानंतर काँग्रेस नेत्यांनी केलेल्या बंडामुळे हा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. 

कळंगुट मतदारसंघात कांदोळी, कळंगुट, हडफडे-नागवा, तसेच पर्रा या चार पंचायतींचा समावेश होतो. एकूण २५,४९३ मतदार या मतदारसंघात नोंद झाले आहेत. यात १२,३९६ पुरुष, तर १३,०९७ महिला मतदारांचा त्यात समावेश होतो. या मतदारसंघाचा इतिहास पाहता प्रस्थापितांना धक्कादायक ठरलेल्या मतदारसंघातील लोबो यांचे प्रतिस्पर्धी किती आणि कोण असणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, यंदाची होणारी निवडणूक अटीतटीची, तसेच रंगदार होण्यासारखी अवस्था या मतदारसंघातून निर्माण झाली आहे. 

विधानसभेची ही लढत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भाजप, तसेच आप या चार पक्षांत सरळ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, टिटोसचे मालक रिकार्डो डिसोझा यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार किंवा ते अपक्ष उतरणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, उमेदवारांच्या भाऊगर्दीत मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. 

लोबोंनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने येथे काँग्रेसची ताकद वाढली. मात्र लोबोंना प्रवेश दिल्याने नाराज झालेले माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, जोजफ सिक्वेरा, तसेच अँथोनी मिनेझीस यांनी लोबोंचा पराभव हे एकमेव उद्दिष्ट बाळगून लढा देण्याचे ठरवले आहे, तर दुसऱ्या बाजूने लोबोंमुळे रिक्त झालेली जागा भरून काढण्यासाठी भाजप तेवढ्याच ताकदीच्या उमेदवाराच्या शोधात आहे. कळंगुट पंचायतीचे पंच सदस्य सुदेश मयेकर हे आपच्या उमेदवारीवर उतरणार आहेत.  

बदलत्या राजकीय हालचालींमुळे मतदारसंघाची अवस्था दोलायमान झाली आहे. उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.  मात्र येथे तुल्यबळ लढत रंगणार आहे.

लोकसभेवेळी काँग्रेसला बळ

२०१२ सालच्या निवडणुकीत मायकल लोबो यांनी आग्नेल फर्नांडिस यांच्यावर १८६९ मतांनी आघाडी मिळवीत विजय प्राप्त केला होता. पाच वर्षांनंतर २०१७ साली लोबोंच्या आघाडीत वाढ होऊन जोजफ सिक्वेरा यांच्यावर ३८२५ मतांनी आघाडी मिळवीत विजय प्राप्त केला होता. २०१५, तसेच २०१९ या दोन्ही वेळेच्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाला कळंगुट मतदारसंघात आघाडी प्राप्त झाली होती. २०१९ सालच्या निवडणुकीवेळी काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना श्रीपाद नाईक यांच्यापेक्षा २४५८ मते जास्त मिळाली होती.  

वेगवेगळ्या पक्षांना मतदारांकडून नेहमीच प्राधान्य

या मतदारसंघावर एकाच पक्षाला प्रभुत्व गाजविण्यास यश मिळाले नाही. मतदारांकडून नेहमीच वेगवेगळ्या पक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे. युनायटेड गोवन्स, मगोप, युगोडेपा, काँग्रेस, भाजप या पक्षाने या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. तीन वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी एकाही लोकप्रतिनिधीला लाभली नाही. माजी आमदार आग्लेन फर्नांडिस, विद्यमान आमदार मायकल लोबो हे सतत दोन वेळा निवडून आले आहेत. माजी मंत्री सुरेश परुळेकर हे सुद्धा या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते.

Web Title: goa election 2022 michael Lobo test after the revolt of congress leaders in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app