अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 11:30 IST2025-12-07T11:29:33+5:302025-12-07T11:30:52+5:30
क्लबची उभारणी पाण्यात केली असून आत प्रवेश करणे आणि बाहेर पडण्यासाठी एकमेव लाकडी पुलाचा मार्ग बनवण्यात आला होता.

अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
म्हापसा - हरफडे बागा येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये ४ पर्यटक आणि १४ कर्मचाऱ्यांचा समावेश असून आणखी ७ मृतदेहांची ओळख पटली नाही. या दुर्घटनेत ६ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
'असा' होता क्लब
३ वर्षापूर्वी या क्लबची स्थापना करण्यात आली होती. ज्या जागेवर क्लब आहे त्याठिकाणी मिठागरे होती. त्यानंतर तिथे हा क्लब तयार करण्यात आला. क्लबची उभारणी पाण्यात केली असून आत प्रवेश करणे आणि बाहेर पडण्यासाठी एकमेव लाकडी पुलाचा मार्ग बनवण्यात आला होता. पूर्णपणे लाकडाचा वापर करून रचना करण्यात आलेल्या या क्लबच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. त्यालाच जोडून खाली तळमजल्यावर किचन होते. आगीच्या धुराचे लोळ तळमजल्यात शिरले. त्यामुळे किचनमध्ये असणारे कामगार आतमध्येच अडकले. धुरामुळे अनेकजण गुदमरून दगावले. मृतांत किचममध्ये काम करणारे कर्मचारीच जास्त आहेत. एक्झिट सुविधा किचनमध्ये नसल्याने अडचणीत जास्त भर पडली. कर्मचारी गुदमरण्याचे हे प्रमुख कारण बनले.
क्लबमध्ये लाकडी संरचना, सजावट आणि ज्वलनशील साहित्यामुळए काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच म्हापसा, पणजी आणि कळंगुट अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही स्वयंसेवक म्हणून मदत केली. अनेक मृतदेह ओळखण्याजोगे नसल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड ठरणार आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संबंधित घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अग्नितांडवात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रूपये आणि जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून केली जाणार आहे. दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. बाधितांना सर्वतोपरी मदत करा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तर ही केवळ एक दुर्घटना नाही तर सुरक्षा आणि प्रशासनाचे गुन्हेगारी अपयश आहे. सखोल, पारदर्शक चौकशी करून या घटनेची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. अशा दुर्घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.