आठ मतदारसंघांमध्ये बंडखोरी शक्य; उत्पल पर्रीकर पक्ष सोडणार?, पर्रीकर कुटुंबातलं पहिलं बंड ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 08:53 AM2022-01-16T08:53:46+5:302022-01-16T08:58:18+5:30

पक्षाचे टेन्शन वाढले; यादीकडे नजरा

goa assembly election 2022 Will Utpal Parrikar leave the party know what is the political condition | आठ मतदारसंघांमध्ये बंडखोरी शक्य; उत्पल पर्रीकर पक्ष सोडणार?, पर्रीकर कुटुंबातलं पहिलं बंड ठरणार?

आठ मतदारसंघांमध्ये बंडखोरी शक्य; उत्पल पर्रीकर पक्ष सोडणार?, पर्रीकर कुटुंबातलं पहिलं बंड ठरणार?

Next

वासुदेव पागी

पणजी : भाजपची उमेदवार यादी बुधवार, दि. १९ रोजी जाहीर होणार असल्याने इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. बहुतेक मतदारसंघात एकपेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यामुळे भाजपची उमेदवार यादी जाहीर होताच किमान आठ मतदारसंघात पक्षांतर्गत मोठी फूट पडण्याची पूर्ण शक्यता आहे. फुटीच्या उंबरठ्यावर काणकोण, सावर्डे, प्रियोळ, कुंभारजुवे, पणजी, मांद्रे, सांताक्रूझ व सांगे हे मतदारसंघ आहेत. यादी जाहीर झाल्यानंतरची भूमिकाही अनेकांनी ठरवली असून बंड झाल्यास ते शमवणे भाजपला नक्कीच जड जाणार आहे.

काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडीस आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरू आहे. शुक्रवारी तवडकर आणि पक्षाचे केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत उभयतांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला उघड संघर्ष हा या रस्सीखेचचा परिपाक आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यावर पक्षांतर्गत संघर्षाचा स्फोट होणे अटळ आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कथित ७० कोटींचा नोकरभरती घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी सावर्डे मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांचेच नाव होते. परंतु आमदार बाबूश मोन्सेरात यांनी कथित घोटाळा उघडकीस आणल्यानंतर या मतदारसंघात माजी आमदार गणेश गावकर यांचे नाव पुढे आले. उमेदवारी दोघांपैकी एकाला मिळणार असून त्यामुळे एकाची बंडखोरी निश्चित आहे.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आपल्या पत्नी सावित्री कवळेकर यांना सांगे मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. परंतु, सांगेसाठी माजी आमदार सुभाष फळदेसाई आपला दावा सोडण्यास तयार नसल्याने या मतदारसंघातही उमेदवारीच्या मुद्यावरून गृहकलह उफाळून येणार आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेले गोविंद गावडे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास भाजप केडरचे संदीप निगळ्ये यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षात निमंत्रण देऊन भाजपची उमेदवारी बहाल केलेले कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना यावेळी उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल खुद्द मडकईकर यांना खात्री नाही. तसेच सिद्धेश नाईक आणि रोहन हरमलकर हेही उमेदवारीसाठी आटापिटा करीत आहेत. पक्ष केडर शिस्तीत असलेले सिद्धेश नाईक उमेदवारी नाकारल्यास बंड कदाचित करणार नाहीत पण त्यांचे समर्थक बंड करू शकतात. भाजप अंतर्गत सर्वेक्षण अहवालाच्या आधारावर सांताक्रूज मतदारसंघात टोनी फर्नांडिस यांना उमेदवारी नाकारली तर तेही स्वस्थ बसणार नाहीत, हे निश्चित आहे. 

मायकल लोबो यांना पर्याय म्हणून भाजपमध्ये घेतलेले गुरू शिरोडकर यांना डालवून आता टिटोसचे मालक रिकार्डा डिसोझा यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. त्यामुळे इथेही शिरोडकर समर्थक बंडखोरी करू शकतात.

शिफारशींचा फार्स?
भाजपने मतदारसंघात पहिल्यांदा मंडल समितीकडून मतदानाने शिफारस केलेल्या उमेदवारांची नावे उमेदवारीसाठी पाठविली. प्रत्यक्षात ही खरोखरच पारदर्शक प्रक्रिया आहे की फार्स आहे, याबद्दलही शंका आहे. अनेक ठिकाणी मंडल समितीला नको असलेल्यांची नावेही पक्षाने उमेदवारीसाठी केंद्रात पाठविली आहेत.

पर्रीकर कुटुंबातले पहिले बंड
गोव्यात भाजप ज्या कुटुंबांनी उभा केला त्या कुटुंबियांपैकी एक असलेले स्व. मनोहर पर्रीकर कुटुंबिय. आज त्याच कुटुंबातील उत्पल पर्रिकर यांनी पणजी मतदारसंघातून उमेदवारीवर मोठा दावा केला आहे. तसेच पक्षाने त्यांचा दावा गांभीर्याने घेतला नसल्यामुळे उत्पल बंडाचा झेंडा हाती घेतील. बाबूश यांनाच भाजप तिकीट देणार असल्याने उत्पल यांनी बंड केल्यास ती राष्ट्रीय स्तरावरही मोठ्या चर्चेची घटना ठरेल. 

डोकेदुखी ठरणारे मतदारसंघ

  • पणजी 
  • काणकोण
  • सावर्डे
  • प्रियोळ
  • कुंभारजुवे
  • मांद्रे
  • सांताक्रूझ 
  • सांगे 


भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. बुधवार, दि. १९ जानेवारी रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. यादी एकाच टप्प्यात किंवा दोन टप्प्यातही यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 
- सदानंद शेट तनावडे, प्रदेशाध्यक्ष, अध्यक्ष

Web Title: goa assembly election 2022 Will Utpal Parrikar leave the party know what is the political condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app