गोव्याला वाघ ‘मेलेलेच’ हवे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 07:29 PM2020-01-09T19:29:22+5:302020-01-09T20:48:21+5:30

म्हादई अभयारण्याचा बराच मोठा भाग या तालुक्यात येतो.

Does Goa Want Tigers 'Dead'? | गोव्याला वाघ ‘मेलेलेच’ हवे आहेत का?

गोव्याला वाघ ‘मेलेलेच’ हवे आहेत का?

googlenewsNext

- राजू नायक

सत्तरी तालुक्यात पहिला वाघ मृत्युमुखी पडल्याच्या चार दिवसांतच आणखी दोघा पट्टेरी वाघांची कलेवरे सापडल्याने संपूर्ण गोव्यात खळबळ माजली असून गावकऱ्यांनी किमान चार वाघांना विष घालून ठार केले असण्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर तर घटनेतील तीव्रता वाढली आहे.

सत्तरी हा बऱ्यापैकी जंगलाने वेढलेला तालुका आहे. म्हादई अभयारण्याचा बराच मोठा भाग या तालुक्यात येतो. अभयारण्याला स्थानिक लोकांचा तीव्र विरोध आहे. गेल्या व्याघ्र गणनेत येथे किमान पाच पट्टेरी वाघांचा संचार असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पांतर्गत या अभयारण्याला सामावून घेण्याचा प्रयत्न झाला व स्थानिक लोक खवळले. या भागात स्थानिकांनी अरण्यावर आक्रमण केले असून आता आपल्याला आडकाठी येईल, अशी भीती त्यांना आहे.

काही महिन्यांपूर्वी म्हादई अभयारण्यातील आपल्या ‘अतिक्रमणा’ला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून सत्तरी तालुक्यातील २०० वर लोकांनी आंदोलन करून कुमठाळ-करंजोळ येथील वन खात्याच्या चेकपोस्टला आग लावून दिली होती. त्यांनी संरक्षित भागाची हद्द ठरविणारे कुंपणही मोडून टाकले व अभयारण्याचे फाटकही तोडले. गावकऱ्यांनी या भागातील जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या नोंदी वन खात्याकडे असता, आम्ही पूर्वापार या जमिनीत काम करीत असल्याचा दावा गावकरी करतात. त्यानंतर गावकऱ्यांना वन खात्याबरोबर सततचा संघर्ष चालू आहे. गावकऱ्यांनी ‘सत्तरी भूमिपुत्र संघटना’ स्थापन केली असून ‘आपली’ जमीन अभयारण्यातून वगळावी, अशी मागणी त्यांनी केली.

गेल्या तीन महिन्यांत हा संघर्ष तीव्र बनला असून तेथेच जंगलतोड करणाऱ्या एका गावकऱ्याला वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर लोक वेगवेगळ्या पद्धतीने राग व्यक्त करीत आहेत. अभयारण्य क्षेत्रात काहींनी लागवडही केली आहे. गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या असून स्थानिक नेते व काही प्रबळ मंत्री गावकऱ्यांना फूस लावत असल्याने वनाधिकारी हवालदिल बनले आहेत. त्यातच या भागात एक वाघीण व तिचे दोन बछडे फिरत असल्याचे वृत्त तीन महिन्यांपूर्वीच चर्चेत होते. त्यांची छायाचित्रेही वन खात्याने टिपली होती.

मे महिन्याच्या मध्यास ही चित्रे वन खात्याला सापडली होती व वनाधिकारी सुहास नाईक यांनी त्या घटनेस दुजोरा दिला होता. परंतु माहिती मिळते त्याप्रमाणे वाघांच्या सुरक्षिततेसंदर्भात जेवढी घ्यायला पाहिजे तेवढी खबरदारी वन खात्याने घेतली नाही. काही पर्यावरणवादी मानतात की राजकीय दबावाखाली असलेले अधिकारी अतिदक्षतेचे उपाय योजण्याबाबत हयगय करू शकतात. गावांमध्ये अशा गोष्टी लपून राहात नाहीत की वाघांना ठार करण्याचा बेत शिजला आणि तो वनाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे सांघिक पातळीवरच हे कारस्थान शिजले असले पाहिजे व लोकांनी स्थानिक नेत्यांनाही विश्वासात घेतले असण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ पर्यावरणवादी व केंद्रीय जैवसंवर्धन मंडळाचे सदस्य राजेंद्र केरकर यांनी- जे स्वत: सत्तरीचे रहिवासी आहेत, ‘लोकमत’ला सांगितले की सर्वांनाच वाघांचे अस्तित्व खुपत होते असे म्हणता येणार नाही; परंतु काही स्वार्थी घटक जरूर आहेत, ज्यांनी या कारस्थानात भाग घेतला आहे. केरकर यांच्या मते, या भागात किमान चार वाघ मारले असण्याची शक्यता आहे.

‘‘वनाधिकाऱ्यांची या भागात संख्याही अपुरी आहे व गावकºयांचे ज्वलंत प्रश्न वेळीच समजून घेऊन ते सोडविण्यात त्यांना अपयश आले, त्यातून या अशा दुर्दैवी घटना घडतात,’’ असे मत केरकर यांनी व्यक्त केले. असे असले तरी अभयारण्याच्या स्थापनेलाही स्थानिकांचा विरोध होता. वास्तविक राष्ट्रपती राजवटीच्या काळात जन. जेकब राज्यपाल असता त्यांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारे म्हादई व नेत्रावळी क्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा मिळाला. तोही राजेंद्र केरकर यांनी एका मृत वाघाचा पंचा नेऊन राज्यपालांची खात्री पटवली तेव्हा. सध्या पाच वाघांचा संचार या भागात असतानाही वन खात्याने त्यांच्या संरक्षणार्थ मोहीम राबविली नाही हेच दुर्दैव या घटनेतून सामोरे आले आहे. दुसºया बाजूला राज्य सरकारही वाघांच्या संरक्षणासंदर्भात संपूर्णत: बेफिकीर आहे. पर्यावरणाचे अनेक प्रश्न या सरकारने ज्या निष्काळजीपणाने हाताळले आहेत, त्यामुळे पर्यावरणवाद्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Does Goa Want Tigers 'Dead'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.