जिल्हा पंचायत निवडणूक: आता अनेक मंत्री, आमदारांची लागणार कसोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:14 IST2025-12-02T16:14:09+5:302025-12-02T16:14:09+5:30
उमेदवार निवडून आणले, तरच विधानसभेसाठी तिकिटाचा होणार विचार; मतदारसंघात ताकद दाखवावी लागणार

जिल्हा पंचायत निवडणूक: आता अनेक मंत्री, आमदारांची लागणार कसोटी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक काही मंत्री, आमदारांसाठी कसोटीची ठरणार आहे. २०२७ च्या विधानसभेसाठी ही निवडणूक सेमीफायनलच असून मंत्री, आमदारांना आपले उमेदवार निवडून आणून स्वतःची ताकद दाखवावी लागेल. आमदारांनी आता चांगली कामगिरी करून उमेदवार निवडून आणले, तरच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला तिकिटासाठी त्यांचा विचार होणार आहे.
या निवडणुकीत काही आमदार आपले उमेदवार विजयी करून उत्तीर्णही होतील. परंतु, अपयश आल्यास मात्र आगामी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारीबाबत त्यांच्या पदरी निराशा येऊ शकते.
२०२२ मध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपत आलेल्या आमदारांसमोर जास्त आव्हान आहे. शिवोलीत डिलायला लोबो यांचे गेल्या विधानसभा निवडणुकीतील खंदे कार्यकर्ते गजानन तिळवे यांनी त्यांची साथ सोडली असून, जि. पं. साठी ते उमेदवार देणार आहेत. गेल्यावेळी त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. ही मते त्यांना भाजपकडे वळवावी लागतील. हे आव्हान असतानाच तिळवे यांनी त्यांच्यासमोर आणखी संकट उभे केले.
साळगावमध्ये आमदार केदार नाईक यांच्यासमोरही रेईश मागुश मतदारसंघात भाजप उमेदवार रेश्मा संदीप बांदोडकर यांना विजयी करण्याचे आव्हान असेल. हा मतदारसंघ महिला राखीव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत केदार येथे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.
कळंगुट मतदारसंघात मायकल लोबो भाजप उमेदवार फ्रान्झिला सेलिन रॉड्रिग्स यांना निवडून आणावे लागेल. मायकलही गेल्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.
डॉ. चंद्रकांत शेट्येंसमोर आव्हान
डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये सध्या सरकारला पाठिंबा देऊन भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यांच्यासमोरही भाजप उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान आहे. लाटंबार्सेत विरोधक एकवटले असून, भाजपविरोधात सर्वमान्य उमेदवार उभा करण्याचा निर्णय झालेला आहे. अलीकडेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले मेघः श्याम राऊत यांच्या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
व्होटबँक वळवणार?
सांताक्रुझमध्ये रुडॉल्फ फर्नांडिस यांना चिंबल व सांताक्रुझ जि. पं. मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना निवडून आणावे लागेल. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला या मतदारसंघात २,००० मतांचीच आघाडी मिळवता आली. चिंबल झोपडपट्टी तसेच सांताक्रूझमधील काँग्रेसची व्होट बँक असलेली मते त्यांना भाजपकडे वळवावी लागतील.
भाजपचे बारकाईने लक्ष
कुंभारजुवेत भाजपने पुन्हा सिद्धेश श्रीपाद नाईक यांनाच तिकीट दिले आहे. गेल्यावेळी ते निवडून आले व उत्तर जिल्हा पंचायतीचे अध्यक्षही बनले. भाजपची व त्यांची स्वतःची मते आहेत. परंतु आमदार राजेश फळदेसाई यांनी २०२२ मध्ये विधानसभेत त्यांना मिळालेली मतें सिद्धेश यांच्याकडे वळवावी लागतील. या मतदारसंघात राजेश यांच्या कामगिरीवर भाजपचे बारकारईने लक्ष आहे.
मंत्र्यांवरील जबाबदारी
काही मंत्र्यांचीही कसोटी लागेल. कोलवाळ मतदारसंघात भाजपने सपना मापारी यांना तिकीट दिले आहे. त्यांना निवडून आणण्याचे आव्हान मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्यासमोर असेल. सांगेत मंत्री सुभाष फळदेसाई, शिरोड्यात मंत्री सुभाष शिरोडकर यांची कसोटी लागणार आहे.
दक्षिण गोव्यात वेगळी स्थिती
दक्षिण गोव्यात माजी मंत्री तथा आमदार आलेक्स सिक्वेरा यांची लोकसभा निवडणुकीत नुवेंत अत्यंत खराब कामगिरी राहिलेली आहे. भाजप उमेदवाराचा येथे धुव्वा उडाला. आता जि. पं. निवडणुकीत भाजप उमेदवारासाठी त्यांना कामगिरी करून दाखवावी लागेल
काँग्रेसच्या आमदारांचीही कसोटी
काँग्रेसमध्येही केपेत आमदार एल्टन डिकॉस्ता तसेच हळदोणेत आमदार कार्ल्स फेरेरा यांना काँग्रेस किंवा युतीचे उमेदवार निवडून आणावे लागतील. शेल्डे मतदारसंघात भाजपने सिद्धार्थ श्रीनिवास गावस-देसाई यांना उमेदवारी दिली असून ते प्रबळ उमेदवार मानले जातात. एल्टन यांना येथे बरेच कष्ट घ्यावे लागतील.