पणजी : भालचंद्र नाईक यांच्या पर्ये येथील कथित बेकायदा खाण प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस अडचणीत आले आहेत. सुदीप ताम्हणकर यांनी जॉन यांच्याविरुद्ध एसआयटीकडे तक्रार सादर केली असून भालचंद्र यांच्या बेकायदा व्यवहारांना समर्थन दिल्याबद्दल कारवाईची मागणी केली आहे. जॉन यांनी राज्यसभा खासदार असताना १५ एप्रिल २00८ रोजी तत्कालीन खाणमंत्री सीसराम ओला यांना पत्र लिहून या बेकायदा व्यवहारांसाठी भालचंद्र यांना मदत करण्याची विनंती केल्याचे ताम्हणकर यांनी एका इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा हवाला देऊन तक्रारीत म्हटले आहे. जॉन यांची कसून चौकशी केल्यास या बाबतीत आणखी काही राजकारण्यांच्या भानगडीही बाहेर येतील, असा दावाही त्यांनी केला आहे. दहेज मिनरल्सचे भालचंद्र यांनी बेकायदा खनिज उत्खनन आणि निर्यात केली, त्यास जॉन तसेच खाण खात्याचे अधिकारी, पोलीस, वाहतूक खात्याचे अधिकारी यांनी सहकार्य केले. त्यामुळे या सर्वांविरुद्ध भादंसंच्या कलम ३७९, १२0 (ब) तसेच १९८८च्या भ्रष्टाचारविरोधी कायदा आणि पर्यावरण संवर्धन कायद्याखाली कट कारस्थान, फसवणूक, सरकारी मालमत्तेची चोरी, अधिकाराचा गैरवापर, सरकारची दिशाभूल आदी कारणांखाली २४ तासांच्या आत गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी केली आहे. पर्ये येथील खाणीतून भालचंद्र यांनी ६0 हजार टन खनिजाचे बेकायदा उत्खनन केल्याचा आरोप आहे. या बाबतीत त्यांनी थेट उपमहानिरीक्षक के. के. व्यास यांच्याकडे तक्रार सादर केली आहे. (प्रतिनिधी)
जॉन फर्नांडिस यांच्याविरुद्ध तक्रार
By admin | Updated: July 12, 2014 01:45 IST