In Bardes taluka, 51 percent of the politicians hide there property from declaration | बार्देस तालुक्यातील ५१ टक्के लोकप्रतिनिधींनी मालमत्ता लपवली
बार्देस तालुक्यातील ५१ टक्के लोकप्रतिनिधींनी मालमत्ता लपवली

म्हापसा : स्थानिक राज संस्थावरील पंचायती, जिल्हा पंचायती व पालिकेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपली मालमत्ता लोकायुक्तांजवळ जाहीर करणे बंधनकारक असून सुद्धा बार्देस तालुक्यातील पंचायत स्तरावरील ५१ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला अहवाल सादर केला नाही. तसेच जिल्हा पंचायतीवरील ५ सदस्य व तालुक्यातील एकमेव पालिकेतल्या अर्ध्या नगरसेवकांनी आपला अहवाल सादर करणे टाळले आहे. अशा प्रतिनिधींची नावे लोकायुक्तांनी जाहीर केली आहेत. त्यात विद्यमान सरपंच व उपसरपंचांचा समावेश आहे. 

३१ मार्च २०१७ पर्यंतच्या आर्थिक वर्षातील आपली मालमत्तेचा अहवाल लोकायुक्तांकडे जाहीर करणे आवश्यक होते. त्यांना दिलेल्या निर्धारीत वेळेत अहवाल सादर केला नसल्याने त्यांना दोन महिन्याची मुदत वाढही देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत सुद्धा त्यांनी अहवाल सादर करणे टाळले होते. त्यानंतर आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर गोवा लोकायुक्त कायदा २०११ च्या कलम २१ (२) अंतर्गत सदरचा अहवाल लोकायुक्तांनी २ आॅगस्ट २०१८ रोजी राज्यपालांना सादर केला होता. तसेच त्याची प्रत संबंधीत  पंचायतीचे सचिव, पालिकेचे मुख्याधिकारी तसेच जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठवण्यात आल्या होत्या.  

बार्देस तालुक्यात एकूण ३३ पंचायतीवर एकूण २७९ लोकप्रतिनिधी असून त्यावर निवडून आलेल्या १४२ पंचसदस्यांनी आपला अहवाल सादर केला नाही. अहवाल सादर न करणाºया पंचायतीत मोठ्या पंचायती आघाडीवर आहेत. सांगोल्डा, साल्वादोर द मुंद तसेच साळगाव पंचायतीवरील सर्व लोकप्रतिनिधींनी आपले अहवाल सादर केले आहेत. मालमत्ता लपवण्यात थिवी पंचायतीवरील पंचसदस्य आघाडीवर आहेत. पंचायतीच्या ११ सदस्यापैकी १० पंचसदस्यांनी अहवाल सादर केला नाही. त्यानंतर हळदोणा पंचायतीच्या ९, अस्नोडा, गिरी पंचायतीच्या प्रत्येकी ८ तर नागवा-हडफडे, बस्तोडा, कोलवाळ, शिरसई पंचायतीच्या प्रत्येकी ७ पंचसदस्यांनी अहवाल सादर केले नाहीत. मयडे, नास्नोळा, पिळर्ण-मार्रा, वेर्ला-काणका पंचायतीच्या प्रत्येकी ६ पंचसदस्यांचा त्यात समावेश आहे. 

अहवाल सादर न करणाºया लोकप्रतिनिधीत सरपंचाचा सुद्धा समावेश आहे. त्यात अस्नोडा पंचायतीच्या सपना मापारी, मयडे पंचायतीच्या रिया बेळ्ळेकर, बस्तोडा  पंचायतीचे सावियो मार्टीन्स, कळंगुट पंचायतीचे शॉन मार्टीन्स, शिरसई पंचायतीचे आनंद टेंबकर यांचा त्यात समावेश होत आहे. तसेच काही उपसरपंचांचा सुद्धा त्यात समावेश आहे. 

म्हापसा पालिकेतील २० नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी आपला अहवाल सादर केला नाही. त्यात नगरसेवक अल्पा भाईडकर, मधुमिता नार्वेकर, अनंत मिशाळ, तुषार टोपले, अ‍ॅनी आल्फान्सो, मार्टीन कारास्को, स्वप्नील शिरोडकर, फ्रान्सिस्को कार्व्हालो, कविता आर्लेकर, राजसिंह राणे यांचा त्यात समावेश आहे. यातील बहुतांश सर्व नगरसेवक पहिल्यांदाच पालिकेवर निवडून आलेले आहेत. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीवरील ६ सदस्यांनी आपली मालमत्ता जाहीर केली नाही. त्यात श्रीमती श्रीधर मांद्रेकर, रुपेश नाईक, सवन्ना आरावझो, सिडनी पावलू बार्रेटो, धाकू मडकईकर, शॉन मार्टीन्स यांचा समावेश होतो. 


Web Title: In Bardes taluka, 51 percent of the politicians hide there property from declaration
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.