पाणीबाणीतही लोकांच्या अनास्थेचे दर्शन; राज्यकर्त्यांना खडसावून सवाल कधी करणार आहोत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 06:39 PM2019-08-22T18:39:56+5:302019-08-22T18:40:40+5:30

गोव्यात सात दिवस पाणी नव्हते. पाइपलाइन फुटली आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणातून लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. या काळात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना कुठे होत्या?

Article on goa water crisis, When are we going to question the rulers? | पाणीबाणीतही लोकांच्या अनास्थेचे दर्शन; राज्यकर्त्यांना खडसावून सवाल कधी करणार आहोत?

पाणीबाणीतही लोकांच्या अनास्थेचे दर्शन; राज्यकर्त्यांना खडसावून सवाल कधी करणार आहोत?

googlenewsNext

राजू नायक

पाणी टंचाईने ग्रासलेल्या पणजी राजधानी व तिसवाडी तालुक्यातील जनतेला सरकार ज्याप्रमाणे आश्वस्त करू शकले नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या वेदनेला वाचा फोडण्यास विरोधी पक्षांना अपयश आले. केवळ प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लढविला. याचे कारण कॉँग्रेससारखा पक्ष सरकारची खुशामत करीत होता व ‘आप’ला सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ निदर्शने करायला मुहूर्त सापडला. तेव्हाही १० कार्यकर्ते व ५० पेक्षा जास्त पोलीस अशी परिस्थिती होती. विरोधी पक्षनेत्याने सरकारविरोधात ‘ब्र’ काढला नाही.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले, सार्वजनिक तिजोरीवर गलेलठ्ठ होणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना लोक म्हणून आपण खडसावून सवाल कधी करणार आहोत? लोक संतापले आहेत, त्यांच्यात असंतोष भडकत आहे वगैरे आम्ही पत्रकार लिहीत होतो. परंतु एक-दोन नगरसेवकांना फोन केल्यानंतर आपल्याला टॅँकर येतो ना, मग उगाच पावसात आंदोलन का करा, असा ‘सुज्ञ’ विचार लोकांनी केला असावा. परंतु ‘जनता’ म्हणून आपला आवाज उठविण्याचा अधिकार ते कधी बजावणारच नाहीत का?

सध्या गोव्यात विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. कॉँग्रेसचे इनमीन पाच सदस्य बाकी राहिले आहेत. त्यातील अनेकांवर केसेस आहेत. काहींना अधूनमधून पोलीस स्थानकावर हजेरी लावावी लागते. काहींवर ते भाजपमध्ये येण्यात एका पायावर तयार असण्याचीही टीका झाली आहे. हे लोक जनतेचे प्रश्न घेऊन काय लढणार आहेत? त्यातील काहीजण तर मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व ‘आप’चेही काही खरे नाही. मगोपने सरकारविरोधात बसण्याचे धोरण स्वीकारले होते. परंतु त्याच्या विपरीत विधानसभेत एका फुटकळ सत्काराचे निमित्त साधून मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून त्यावर अडीच तास चर्चा केली, जी रात्री १२ पर्यंत चालली. हे ढवळीकर सरकारविरोधात बोलण्याचे धारिष्ट्य काय दाखवतील?

‘आप’ची लोकप्रियता ढळल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते रोडावले आहेत. त्याची परिणती म्हणजे पणजीतील निदर्शनांना मोजून दहा जण हजर होते. परंतु विरोधी पक्षांची आजची ही दयनीय अवस्था जनतेच्याच अनास्थेचे प्रतीक नाही का? जे लोक पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर केवळ घरात बसून आक्रंदत होते तेच रस्त्यावर येण्यास नाखुश होते. एकाही सामाजिक संस्थेने मोर्चा काढण्यास पुढाकार घेतला नाही. येथे महिला संघटना अनेक आहेत. परंतु त्याही सुखवस्तू असल्याने एकही मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर काही गोव्यात निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे जी पाइपलाइन ४८ तासांत दुरुस्त होऊ शकली असती ते काम सात दिवस उलटूनही पूर्ण होऊ शकले नाही आणि दोन तालुक्यांना पाण्याविना तडफडावे लागले. ज्या देशातील नागरिक निष्प्रभ आणि मुर्दाड असतात, त्या देशाला भवितव्य नसते, असे एका विचारवंतांने लिहून ठेवले आहे आणि त्यातल्या त्यात गोव्याचे अस्तित्व तर सध्या कड्याच्या टोकाला पोहोचले आहे.

Web Title: Article on goa water crisis, When are we going to question the rulers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.