कोरोना इफेक्ट: बोंडला अभयारण्यातील प्राणी सध्या गोमांसाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:30 PM2020-04-06T16:30:36+5:302020-04-06T16:32:07+5:30

कत्तलखाना बंद असल्याने गोमांस मिळणं अवघड

Animals in the Bondala Sanctuary not getting beef due to coronavirus | कोरोना इफेक्ट: बोंडला अभयारण्यातील प्राणी सध्या गोमांसाविना

कोरोना इफेक्ट: बोंडला अभयारण्यातील प्राणी सध्या गोमांसाविना

Next

पणजी : बोंडला अभयारण्यातील प्राण्यांची काळजी घेणे, त्यांची देखभाल करणे ही कामे सरकारच्या वन खात्याने सुरूच ठेवली आहेत. मात्र अभयारण्यातील काही प्राण्यांना दर आठवड्याला जे गोमांस पूर्वी मिळत होते, त्याचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे सध्या प्राण्यांना गोमांसाची चव चाखता येत नाही, असे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील अन्य अभयारण्यांप्रमाणोच बोंडला अभयारण्य लोकांसाठी यापूर्वीच बंद केले गेले आहे. बोंडला प्राणी संग्रहालयाला एरव्ही देश- विदेशातील बरेच पर्यटक भेट देत होते. तिथे सध्या प्राण्यांची संख्या कमी असली तरी, वाघ, बिबटे, अस्वल, साळी, हत्ती, गवेरेडे आदी प्राणी तसेच अजगर व अन्य साप आहेतच. वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी विकास देसाई यांनी सोमवारी लोकमतला सांगितले, की प्राण्यांसाठी रोज वेगवेगळा आहार ठरलेला असतो. तो पुरविण्याचे काम वन खाते करते. लॉक डाऊनच्या काळातही आहार पुरविला जात आहे पण आम्ही सध्या बीफचा पुरवठा करू शकत नाही. कत्तलखाना बंद असल्याने गोमांस उपलब्ध होत नाही. मात्र चिकन, मटण आदी आहार पुरविला जात आहे.

काही प्राण्यांना आठवडय़ातून एकदा गोमांस पुरविले जात होते. रोज एकच आहार ठेवला जात नाही. वेगवेगळा आहार पुरवून प्राण्यांना जगविले जाते. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाची दालने व अन्य ठिकाणहूनही काही माल आणून तो बोंडला अभयारण्यातील काही प्राण्यांना आहाराच्या रुपात पुरविला जात आहे. त्या कामात खंड पडलेला नाही.

दरम्यान, देसाई यांनी सांगितले की म्हादई अभयारण्यात लावलेल्या कॅमेऱ्यांचे कामही लॉक डाऊनच्या काळात सुरू आहे. कॅमेऱ्यांमध्ये विविध प्राणी टिपले गेले आहेत. पट्टेरी वाघ मात्र नव्याने दिसून आला नाही. वन खात्याचे रक्षकही अभयारण्यावर लक्ष ठेवून आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Animals in the Bondala Sanctuary not getting beef due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.