जिल्हा परिषदेत सत्तापालट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:26+5:30

दुसरीकडे विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारत त्यांची जागा काँग्रेसचे सदस्य घेणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. तसे झाल्यास अध्यक्षपद भाजपकडून निघून काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. ५१ सदस्यीय जिल्हा परिषदेच्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपला २०, काँग्रेसला १५, आदिवासी विद्यार्थी संघाला ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागी विजय मिळाला होता.

Will Zilla Parishad rule? | जिल्हा परिषदेत सत्तापालट होणार?

जिल्हा परिषदेत सत्तापालट होणार?

Next
ठळक मुद्देअध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी : इच्छुकांच्या भाऊगर्दीने तापणार जि.प.चे राजकारण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघ यांनी मिळून अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे मंगळवारी जि.प.अध्यक्षपदाची मुंबईत नव्याने सोडत काढण्यात आली. त्यात गडचिरोली जि.प.चे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने सर्वच पक्षातील दिग्गज सदस्यांच्या इच्छांनी उभारी घेतली आहे.
दुसरीकडे विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारत त्यांची जागा काँग्रेसचे सदस्य घेणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. तसे झाल्यास अध्यक्षपद भाजपकडून निघून काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.
५१ सदस्यीय जिल्हा परिषदेच्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपला २०, काँग्रेसला १५, आदिवासी विद्यार्थी संघाला ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागी विजय मिळाला होता. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाचे २ आणि २ अपक्ष उमेदवारही विजयी झाले होते. कोणालाच स्पष्ट बहुमत नसले तरी सर्वाधिक सदस्य असणाऱ्या भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघाला सोबत घेत अध्यक्षपद आणि दोन सभापतीपद पदरी पाडून घेत आपले वर्चस्व निर्माण केले. आविसंला उपाध्यक्षपदासह एक सभापती आणि राष्ट्रवादीला एक सभापतीपद देण्यात आले. त्यानुसार गेल्या अडीच वर्षात या पदाधिकाºयांकडून सुरळीतपणे जि.प.चा गाडा हाकण्यात आला.
आता अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या नवीन समीकरणाचा परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणातही दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास सर्वाधिक (१४) सदस्य असलेला काँग्रेस पक्ष अध्यक्षपदावर दावा करू शकते. काँग्रेसकडून ज्येष्ठ सदस्य तथा माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.राम मेश्राम यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचेही ते निकटवर्तीय आहेत. काँग्रेसने सत्तेचे जुगाड जमविल्यास अ‍ॅड.मेश्राम यांच्या नावावर सर्वसहमती होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विद्यमान जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार हेसुद्धा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. आविसंची सदस्यसंख्या कमी असली तरी अडीच वर्षात त्यांनी सर्वपक्षीय सदस्यांसोबत जुळविलेले मित्रत्वाचे संबंध त्यांच्या पथ्यावर पडून त्यांच्या नावाचा विचार होईल, अशी आशा काही सदस्यांनी बोलून दाखविली.
असे असले तरी जिल्हा परिषदेवरील सत्ता भाजप सहजपणे हातून जाऊ देणार नाही. त्यासाठी लवकरच खलबते सुरू होतील.

- तर मुदतीपूर्वीच नवीन पदाधिकारी होणार विराजमान
२० मार्च २०१७ रोजी सत्तारूढ झालेल्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ गेल्या २० सप्टेंबर रोजीच पूर्ण झाला. परंतू विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना ४ महिन्यांची, अर्थात २० जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ राज्यपालांनी दिली. असे असले तरी आता अध्यक्षपदाची सोडत निघाल्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडीची तारीखही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ही निवड होताच राज्यपालांनी दिलेली मुदतवाढ संपुष्टात येऊन नवीन पदाधिकारी विराजमान होणार आहेत.

- पेंढरी गट्टाच्या जागेसाठी १२ डिसेंबरला निवडणूक
जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १५ सदस्य होते. परंतू धानोरा पंचायत समितीअंतर्गत पेंढरी गट्टा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जि.प.सर्कलचे सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी निर्धारित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात पेंढरी गट्टाच्या नवीन जि.प.सदस्यासाठीही निवडणूक कार्यक्रम लावला असून येत्या १२ डिसेंबर २०१९ रोजी त्यासाठी मतदान होणार आहे.

Web Title: Will Zilla Parishad rule?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.