दुर्लक्षित विषयांना प्रथम प्राधान्य देणार; गडचिरोलीतील स्वातंत्र्यदिनी राज्यमंत्री यड्रावकर यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:08 PM2020-08-15T14:08:57+5:302020-08-15T14:09:13+5:30

गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचं स्थान आहे. इथली आदिवासी संस्कृती, चालीरीती, सण, उत्सव, कलासंस्कार नागरिकांनी जसेच्या तसे जपले आहेत.

Will prioritize neglected topics first; Statement by Yadravkar on Independence Day in Gadchiroli | दुर्लक्षित विषयांना प्रथम प्राधान्य देणार; गडचिरोलीतील स्वातंत्र्यदिनी राज्यमंत्री यड्रावकर यांचे प्रतिपादन

दुर्लक्षित विषयांना प्रथम प्राधान्य देणार; गडचिरोलीतील स्वातंत्र्यदिनी राज्यमंत्री यड्रावकर यांचे प्रतिपादन

Next

गडचिरोली: भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी गडचिरोली जिल्हयातील दुर्लक्षित विषयांवर लक्ष केंद्रीत करून ते प्राधान्याने सोडविणार असल्याचे सांगितले. 

या सोहळयास जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार नामदेव उसेंडी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी तसेच इतर पदाधिकारी, अधिकारी व नागरीक उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या देशभक्तांना आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमा रेषेवर प्राणांचे बलिदान देणा-या सैनिकांना तसेच नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण केली. ते म्हणाले, राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित रहावी, तसेच एकीकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण काढणे व त्यांच्या विचारांना उजाळा देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचं स्थान आहे. इथली आदिवासी संस्कृती, चालीरीती, सण, उत्सव, कलासंस्कार नागरिकांनी जसेच्या तसे जपले आहेत. या जिल्हयातील वेगवेगळया भाषा, भौगोलिक परिसर, निसर्ग जणू एक मिनी भारतच. गडचिरोली जिल्ह्याला हिरवागार शालू पांघरणारी वनश्री, घनदाट जंगलात मुक्तपणे संचार करणारे वन्यजीव, स्वच्छंद विहरणारे पशुपक्षी, नद्या आणि त्यांच्या साथीनं आपलं रम्य जीवन जगणारे आदिवासी, त्यांची कलाकुसर अशा अनेक बाबी जिल्हयाचे सौंदर्य प्रकट करतात.  अशा या गडचिरोलीसाठी हे शासन प्रत्येक दुर्लक्षित विषयांचा आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने योजनांची अंमलबजावणी करत आहे. 

अत्यंत आवश्यक आणि दुर्लक्षित विषयांची निवड प्राधान्यक्रमाने करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. अर्थव्यवस्था बळकट करून जिल्हयातील युवकांना जिल्हयातच काम मिळवून देणे शासनाचे महत्त्वाचे उद्दीष्ट असणार आहे. जिल्हयातील रोजगार वाढवून अर्थव्यवस्थेला बळकटी देवून जिल्हयातील प्रत्येक नागरिकाला विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी शासन कटीबध्द आहे, असे ते म्हणाले.

गडचिरोली जिल्हयातही सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस व प्रशासनातील लोकांनी मेहनत करून संसर्गाला रोखण्यासाठी योगदान दिले आहे. जनतेने केलेल्या सहकार्यामूळे आज कोरोनाला रोखण्यात चांगले यश मिळत आहे. यापुढेही आपण आरोग्यविषयक अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे असे यड्रावकर म्हणाले.

दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचविण्यासाठी येत्या काळातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयातून कार्य करत राहतील. बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर सिंचन प्रकल्प राबवून जिल्हयातील शेती व्यवसायाला चालना देण्यात येणार आहे. शेतीमध्ये दुबार पिक पध्दत घेण्यासाठी शेतकरी पुढे येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड दिल्यास जिल्हयातील शेती अधिक प्रगतशील होईल असे ते म्हणाले.

नक्षलवाद कमी होत आहे : आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आत्मसन्मानाने जगता यावे व जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्यासाठी आता त्यांच्या पुनर्वसनासाठी भरीव प्रयत्न केले जाणार आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकराने जिल्हा नियोजनमध्ये नवे शिर्षक तयार करून जवळजवळ 10 कोटींची तरतूद त्यामध्ये करण्यासाठी नियोजन केले आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे त्याला लवकरच मंजूरी मिळेल. प्रत्येक आत्मसमर्पितास सन्मानपूर्वक पुन्हा समाजामध्ये वागवणे, त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्यांचा सत्कार-

 यावेळी जलसंधारण अंतर्गत सिंचन क्षेत्रात भरीव व उत्कृष्ट कामगिरीबद्दल मनोहर कुंभारे शाखा अभियंता कुरखेडा यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना उत्कृष्टपणे राबविल्याबद्दलही नितीन मस्के, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गडचिरोली व राजेंद्र चौधरी, जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड गडचिरोली यांचा सन्मान करण्यात आला. कोविड 19 साथरोग अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचाही राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ.माधुरी किलनाके, डॉ.मुकुंद ढवले, विनोद म्हशाखेत्री, बागराज दुर्वे, विनोद बीटपल्लीवार, सारिका दुधे, नागेश ताटलावार, संतोष महातो, प्रशांत कराडे, सुनील हजारे, अशोक तागडे व विनोद लटारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी जिल्ह्यातील यशस्वी कोरोनामुक्त झालेल्या चार कोरोना रुग्णांचा सन्मानही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला

Web Title: Will prioritize neglected topics first; Statement by Yadravkar on Independence Day in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.