उपसा सिंचन योजना मार्गी लागणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 06:00 AM2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:16+5:30

तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केलेल्या गोदावरी नदीवरील कालेश्वरम प्रकल्पानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आणि विशेषत: सिरोंचा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कालेश्वरम प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला असताना या प्रकल्पाच्या वरील बाजुने (बॅक वॉटरवर) असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या चार योजनांची कामे रखडलेली आहेत.

Will the irrigation scheme be implemented? | उपसा सिंचन योजना मार्गी लागणार का?

उपसा सिंचन योजना मार्गी लागणार का?

Next
ठळक मुद्देदक्षिण भागातील सिंचनाचा प्रश्न : चार योजनांसह तुमडीहेटी प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात मोठ्या नद्यांची नैसर्गिक देण असतानाही सिंचन प्रकल्प नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्याच्या दक्षिण भागात काही उपसा सिंचन प्रकल्प मंजूर आहेत, पण त्या प्रकल्पांच्या कामाने अद्यापही गती घेतलेली नाही. आता लोकप्रतिनिधीची खांदेपालट झाल्यामुळे नवीन आमदार यात लक्ष घालून दक्षिण गडचिरोलीतील सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी पुढाकार घेणार का? असा प्रश्न तमाम शेतकऱ्यांच्या मनात घोंघावत आहे.
तेलंगणा सरकारने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केलेल्या गोदावरी नदीवरील कालेश्वरम प्रकल्पानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आणि विशेषत: सिरोंचा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कालेश्वरम प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला असताना या प्रकल्पाच्या वरील बाजुने (बॅक वॉटरवर) असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या चार योजनांची कामे रखडलेली आहेत.
टेकडा, पेंटीपाका आणि रंगयापल्ली अशा तीन उपसा सिंचन योजनांमधून सिरोंचा तालुक्यातील ५०६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. याशिवाय रेगुंठा उपसा सिंचन योजनेतून या तालुक्यातील २०५२ हेक्टर शेतजमिनीला तर तुमडीहेटी प्रकल्पातून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या २५ हजार हेक्टरला पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतू प्रत्यक्षात या योजनांची सद्यस्थिती पाहता गेल्या ३-४ वर्षातही या योजनांच्या कामांना गती आली नसल्याचे दिसून येते.
तीन प्रमुख योजनांची प्राथमिक मंजुरी झाली आहे. पुढील प्रक्रिया मात्र संथगतीने सुरू आहे. छोट्या योजना असतानाही या कामांना गती मिळत नसल्यामुळे पाठपुरावा करण्यात लोकप्रतिनिधी कमी पडल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत. कालेश्वरम प्रकल्पासारखे सदर योजनांचे काम झाले असते तर आतापर्यंत या योजनांचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहोचणे शक्य झाले असते. मात्र त्यासाठी प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधीस्तरावर पाठपुरावा कमी पडला.

‘पेंटीपाका’अभावी २२१८ हेक्टर सिंचनापासून वंचित
सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवरील मेडिगड्डा बॅरेजच्या पाणी पसाºयातून नदीच्या डाव्या तिरावर पेंटीपाका उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. ही योजना गोदावरी या मुख्य खोºयाच्या उर्वरित गोदावरी (जी-१०) या उपखोºयाअंतर्गत येते. गोदावरी पाणी तंटा लवादानुसार जी-१० या उपखोºयात महाराष्ट्र राज्याला २८.३२ दलघमी पाणी वापराचे हक्क आहे.
पेंटीपाका योजनेची किंमत ४४.७५ कोटी असून सिंचन क्षमता २२१८ हेक्टर आहे. त्यासाठी ६.५४ किमी लांबीच्या डाव्या कालव्याद्वारे १५०१ हेक्टर सिंचन तर ७१७ हेक्टर सिंचनासाठी २१० मीटर लांबीच्या उजव्या फिडर कॅनलद्वारे पेंटीपाका लघु पाटबंधारे तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.
या योजनेतून आयपेठा, तुमनूरमाल, तुमनूरचेक, पेंटीपाकाचेक, मुगापूर, पेंटीपाका वेस्टलँड, मृदुक्रिष्णापूर, राजनपल्ली, आरडा, मदीकुंठा, जामनपल्ली वेस्टलँड व रामानुजापूर या १२ गावातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा होणार आहे. या योजनेला २६ मे २०१० रोजी मंजुरी मिळाली आहे. मात्र योजनेच्या कामाला अद्यापही गती आलेली नाही.

१४ वर्षांपासून टेकडा सिंचन योजना थंडबस्त्यात
सिरोंचा तालुक्यात टेकडा फाट्यापासून ८ किमी अंतरावर प्राणहिता नदीवर प्रस्तावित असलेल्या टेकडा उपसा सिंचन योजनेची मागणी अनेक वर्षांपूर्वीची आहे. ३७ कोटी ३५ लाख रुपये किमतीच्या या योजनेतून २००० हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. त्यासाठी ४.२३ किमी लांबीचा टेकडा मुख्य कालवा आणि ३.९० किमी लांबीच्या नेमडा मुख्य कालव्याद्वारे सिरोंचा तालुक्यातील १४ गावांना सिंचनाची सोय होणार आहे. या योजनेसाठी ६७.०१५ हेक्टर खासगी तर ६ हेक्टर वनक्षेत्राची आवश्यकता आहे. या योजनेला १९ मे २००५ रोजी तत्कालीन काँग्रेस-राष्टÑवादी सरकारने मंजुरी दिली आहे. पण गेल्या १४ वर्षात या योजनेचा अंतिम सर्वसाधारण आराखडा तयार झालेला नाही. अडचणींवर मार्ग काढून तातडीने कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Web Title: Will the irrigation scheme be implemented?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.