Use of 44 thousand metric tons of chemical fertilizers | ४४ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर
४४ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर

ठळक मुद्देसेंद्रीय शेतीकडे पाठ : जनजागृतीनंतरही अपेक्षित परिणाम नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंंद्रिय खत वापरावे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असले तरी रासायनिक खतांचा वापर कमी झाला नसून दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी सुमारे ४४ हजार १२ मेट्रिक टन खतांची विक्री झाली आहे.
कीटकनाशके व रासायनिक खतांच्या वापरामुळे खरी हरितक्रांती निर्माण झाली. कीटकनाशके व रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. मात्र कीटकनाशके व रासायनिक खतांच्या अतीवापरामुळे अल्पावधीतच त्याचे दुष्परिणामही दिसून यायला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असा सल्ला विविध विभागाच्या तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मात्र शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करीत असल्याचे रासायनिक खतांच्या विक्रीवरून दिसून येते.
रासायनिक खतांमध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एसएसपी, एमओपी, मिश्रखते, संयुक्त खते यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात विक्री होणाºया खतांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास युरिया व संयुक्त खतांची सर्वाधिक विक्री केली जात असल्याचे दिसून येते.
युरिया खतासाठी केंद्र शासन मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने हे खत सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग या खताची मागणी करतात. परिणामी कधीकधी या खताचा तुटवडा सुद्धा निर्माण होतो. एक महिन्यापूर्वी युरियाची मागणी अचानक वाढली होती. परिणामी तुटवडा निर्माण झाला होता. यावर्षीच्या खरीप हंगामात १४ हजार ९२० मेट्रिक टन विक्री झाली आहे. त्यानंतर संयुक्त खताचा क्रमांक लागतो.
सुमारे १३ हजार ३१६ मेट्रिक टन संयुक्त खतांची विक्री झाली आहे. रासायनिक खतांचा वाढता वापर भविष्यासाठी धोक्याची घंटा असली तरी त्याचा वापर सर्वच शेतकरी करीत आहेत. सेंद्रीय शेतमाल चांगला असला तरी त्याला किंमत मिळत नसल्याने शेती परवडत नाही.

सेंद्रीय शेती परवडत नसल्याचा अनुभव
रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होते. मात्र अतिप्रमाणात यांचा वापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होतात. तसेच जमीन, पाणी, हवेचे प्रदूषण होते. त्यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन कृषी विभाग व इतर संस्थांमार्फत केले जाते. रासायनिक खते व कीटकनाशकांऐवजी सेंद्रीय खते व कीटकनाशकांचा वापर करावा, असे आवाहन केले जाते. शेतीत वाढत चाललेला यंत्राचा वापर यामुळे पशुधन घटले आहे. परिणामी सेंद्रीय खत तयार करणे बंद झाले आहे. तसेच सेंद्रीय पद्धतीने बनविलेल्या कीटकनाशकांना कीटक मानत नाही. परिणामी शेतकरी रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.
सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाचा दर्जा चांगला राहतो. वेळप्रसंगी सेंद्रीय शेतीचा उत्पादन खर्चही वाढतो. त्यामुळे सेंद्रीय मालाला अधिकचा भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र ग्राहक सेंद्रीय व रासायनिक खतांनी पिकविलेल्या मालातील फरक लक्षात घेतल्या जात नाही. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या मालाला अधिकची किंमत मिळत नाही. परिणामी शेतकरी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर सर्रास करीत आहे.


Web Title: Use of 44 thousand metric tons of chemical fertilizers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.