शेतीकाम करताना वाघाचा हल्ला; वृद्ध महिला ठार; वर्षभरात पाच जणांचा घेतला बळी
By गेापाल लाजुरकर | Updated: December 2, 2025 20:15 IST2025-12-02T20:13:30+5:302025-12-02T20:15:39+5:30
आरमाेरी तालुक्यातील घटना : इंजेवारीत पसरली दहशत

Tiger attacks while working in the fields; Elderly woman killed; Five people killed in a year
गडचिराेली : गावापासून अवघ्या दीड किमी अंतरावरील शेतात पिकातील कचरा काढणीचे काम करत असताना वाघाने हल्ला करून वृद्धेला ठार केले. ही घटना मंगळवार, २ डिसेंबर राेजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरमाेरी तालुक्याच्या इंजेवारी येथे उघडकीस आली. या घटनेमुळे इंजेवारी- देऊळगाव परिसरात दहशत पसरली आहे.
कुंदाबाई खुशाल मेश्राम (६५) रा. इंजेवारी, ता. आरमाेरी असे मृत महिलेचे नाव आहे. रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी शेतीची मशागत म्हणजेच कचरा काढण्यासाठी कुंदाबाई ह्या मंगळवारी दुपारी २ वाजता आपल्या नातवासह दुचाकीने शेतात गेल्या. दीड किमी अंतरावर पटाच्या दाणीच्या परिसरात त्यांचे शेत आहे. नातवाने त्यांना शेतात साेडून दिले व ताे घरी परतला. त्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास नातू हा कुंदाबाईला घेण्यासाठी शेतात गेला असता कुंदाबाई तेथे दिसल्या नाही. आजी घराकडे परत आली असेल म्हणून ताे घरी आला; मात्र तेथेसुद्धा आजी नव्हती. ताे आपल्या आईसह दुचाकीने पुन्हा शेतात गेला व आजीचा शाेध घेऊ लागला. दरम्यान शेतातील बांधीत रक्ताचा सडा दिसला. तेव्हा काहीतरी विपरीत घडल्याच्या शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. त्यांनी शेतशिवारात शाेध घेतला असता कुंदाबाई ह्या तलावाच्या पाळीखाली मृतावस्थेत आढळल्या. वाघाने त्यांच्या मानेचा काही भाग खाल्लेला हाेता. घटनेची माहिती गावात कुटुंबीयांना देताच. गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वन विभागाला घटनेची देण्यात आली.
वर्षभरात पाच जणांचा बळी; पंधरवड्यातील तिसरी घटना
जिल्ह्यात यावर्षी वाघांनी पाच जणांचा बळी घेतला आहे. १ मार्च राेजी चामाेर्शी तालुक्यातील गणपूर रै. येथील संताेष भाऊजी राऊत, ५ जून राेजी देलाेडा (सुवर्णनगर) येथील मीराबाई आत्माराम काेवे यांना वाघाने ठार केले, तर इंजेवारीलगतच्या देऊळगाव येथे १९ नाेव्हेंबर राेजी मुक्ताबाई दिवाकर नेवारे यांना वाघाने ठार केले. याच दिवशी देऊळगाव येथीलच सरस्वताबाई जिंगर वाघ ह्यासुद्धा गावालगतच्या झुडपी जंगलात मृतावस्थेत आढळल्या. त्या १२ नाेव्हेंबरपासून बेपत्ता हाेत्या. त्यांनाही वाघानेच ठार केले हाेते. २ डिसेंबरची यंदाची ही पाचवी घटना आहे.