The teachers have been given the responsibility given to the District Council | शिक्षकांनी जिल्हा कचेरीसमोर दिले धरणे
शिक्षकांनी जिल्हा कचेरीसमोर दिले धरणे

ठळक मुद्देविज्युक्टाचे आंदोलन : जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विज्युक्टा) च्या वतीने उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या विविध मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विज्युक्टा व महासंघाच्या वतीने आजवर अनेक आंदोलने करण्यात आली. त्यानंतर झालेल्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन सुध्दा दिले. मात्र मागण्यांची पूर्तता झाली नाही. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षकांनी आक्रमक होत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. यानंतरही शासनाने शिक्षकांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
निवेदन देताना प्रा. भाऊराव गोरे, प्रा. विजय कुत्तरमारे, प्रा. प्रकाश शिंदे, प्रा. देवानंद कामडी, प्रा.अरूण गुरे, प्रा. कैलास खोब्रागडे, प्रा. शाम दोनाडकर, प्रा. मनोहर वैद्य, प्रा. विलास पारधी, प्रा. नोमेश उरकुडे, प्रा.संजय खाडे यांच्यासह बहुसंख्य उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.
जुनी पेन्शन योजना लागू करून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकनास पात्र उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित अनुदान सूत्र लागू करावे, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षाच्या सेवेनंतरची आश्वासीत प्रगती योजना शिक्षकांना लागू करावे, राज्याचा अभ्यासक्रम राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या समकक्ष करावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.


Web Title: The teachers have been given the responsibility given to the District Council
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.