पाचवीच्या विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांची हाेताहे दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 05:00 AM2022-05-07T05:00:00+5:302022-05-07T05:00:26+5:30

गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ४६४ शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित मिळून जवळपास ४०० शाळा आहेत, याशिवाय आदिवासी विकास विभागांतर्गत अनुदानित व विनाअनुदानित मिळून १०० आश्रमशाळा आहेत. इंग्रजी माध्यमांच्या काॅन्व्हेंट व शाळांची संख्या १०००च्या आसपास आहे. एकूणच इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांची एकूण संख्या २ हजार आहे.

Teachers are struggling for the admission of fifth grade students | पाचवीच्या विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांची हाेताहे दमछाक

पाचवीच्या विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांची हाेताहे दमछाक

googlenewsNext

दिलीप दहेलकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गाव तिथे शाळा या अभियानांतर्गत शासनाच्या वतीने १० ते १२ वर्षांपूर्वी मराठी माध्यमाच्या शाळांची खैरात वाटण्यात आली. गडचिराेली जिल्ह्यातही मराठी माध्यमांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या भरमसाठ वाढली. दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा काॅन्व्हेंटचीही संख्या दुपटीने वाढली. याचा परिणाम शहरी व ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या शाळा पटसंख्येवर झाला. इयत्ता पाचवीचे विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना बराच आटापिटा करावा लागत आहे.
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ४६४ शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित मिळून जवळपास ४०० शाळा आहेत, याशिवाय आदिवासी विकास विभागांतर्गत अनुदानित व विनाअनुदानित मिळून १०० आश्रमशाळा आहेत. इंग्रजी माध्यमांच्या काॅन्व्हेंट व शाळांची संख्या १०००च्या आसपास आहे. एकूणच इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांची एकूण संख्या २ हजार आहे. या सर्व शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळविणे गेल्या सात-आठ वर्षांपासून कठीण झाले आहे. विद्यार्थी व पालकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आमिष दाखवून प्रवेशित विद्यार्थी मिळविण्याचा प्रयत्न खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचे शिक्षक करीत आहेत.
दरवर्षी अंतिम परीक्षा आटाेपली की, उत्तरपत्रिका मूल्यांकनादरम्यान इयत्ता पहिली व पाचवी, तसेच आठवीच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांचे दाखले मिळविण्यासाठीचे नियाेजन शाळास्तरावर केले जाते. शिक्षण संस्था चालक व मुख्याध्यापकांच्या आदेशाने आपली नाेकरी टिकविण्यासाठी शिक्षक जीवाचा आटापिटा करून विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतात. 
सध्या गडचिराेली जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४४ अंशांवर पाेहाेचत आहे. अशा भर उन्हात शिक्षक गडचिराेली शहरानजीकची गावे, वार्डावार्डात पालकांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांचे दाखले मिळवित आहेत.
या उलट जिल्हा परिषद शाळांमध्ये परिस्थिती आहे. फुलाेरा उपक्रमातून जि. प. शाळांची गुणवत्ता वाढत असून गावातील पालक जि. प. शाळांनाच प्राधान्य देत आहेत. परिणामी जि. प. च्या शिक्षकांना प्रवेशाचे टेंशन नाही.

उद्दिष्टपूर्तीसाठी आटापिटा 
संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडून विद्यार्थी प्रवेशाचे उद्दिष्ट प्रत्येक शिक्षकाला मिळाले आहे. खासगी शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत खासगी शाळांमध्ये शिकविणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला सहा ते सात विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट मिळाले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीचे शिक्षक परिश्रम घेत आहेत. 

अर्धेअधिक वेतन हाेत आहे खर्ची 
प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांचे मासिक वेतन ७० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत आहे. यातील एका महिन्याचे अर्धेअधिक वेतन विद्यार्थी प्रवेशाचे उद्दिष्ट गाठण्यावर खर्च हाेत आहे. ८ ते १० विद्यार्थ्यांसाठी ५० हजार रूपये खर्च हाेत आहे. 

राेख रकमेसह दाखल्याच्या पावतीचाही खर्च पडताहे माथ्यावर

शाळा प्रवेशासाठी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची कमतरता भासत असल्याने, या वर्गाचे विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये स्पर्धा लागली आहे. दरम्यान, शिक्षकांना पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दाखला मिळविण्यासाठी विविध प्रकारचे आमिष पालकांना द्यावे लागत आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शिक्षकाला एका विद्यार्थ्यांमागे आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च येत आहे. विद्यार्थ्याच्या पालकाला पाच हजार रुपये राेख, टीसीसाठीचे ५०० ते १ हजार रुपये याशिवाय विद्यार्थ्यांना सायकल, गणवेश, पुस्तक या सर्वांचा खर्च शिक्षकांना करावा लागत आहे.

 

Web Title: Teachers are struggling for the admission of fifth grade students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.