लॉकडाऊनमध्येही सरकारी बांधकामांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:48+5:30

लॉकडाऊनमुळे काही दिवस कामे पूर्णपणे ठप्प होती. नंतर शारीरिक अंतराचा नियम पाळत कामे आटोपण्याच्या सूचना मिळाल्याने पुन्हा कामे सुरू झाली. पण यावर्षी सरकारी बांधकामांसाठी रेतीच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कामांना फटका बसला. काही कंत्राटदारांनी सिरोंचा परिसरातील रेती आणून काम भागविले. पावसाळ्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते.

Speed up government construction even in lockdown | लॉकडाऊनमध्येही सरकारी बांधकामांना गती

लॉकडाऊनमध्येही सरकारी बांधकामांना गती

Next
ठळक मुद्देरेतीसाठी कसरत : वनविभागाचाही अडथळा, दोन बेली ब्रिज पावसाळ्याआधी पूर्ण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उन्हाळ्यात वेगाने होणाऱ्या रस्ते, पूल आदी कामांमध्ये यावर्षी कोरोनामुळे सुरू असलेल्या सततच्या लॉकडाऊनमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पण तरीही या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाला सुरूवात होण्यापूर्वी शक्य तेवढी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या गडचिरोली कार्यालयामार्फत केला जात आहे.
लॉकडाऊनमुळे काही दिवस कामे पूर्णपणे ठप्प होती. नंतर शारीरिक अंतराचा नियम पाळत कामे आटोपण्याच्या सूचना मिळाल्याने पुन्हा कामे सुरू झाली. पण यावर्षी सरकारी बांधकामांसाठी रेतीच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कामांना फटका बसला. काही कंत्राटदारांनी सिरोंचा परिसरातील रेती आणून काम भागविले. पावसाळ्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते. ती सर्व कामे पूर्ण होणे आता शक्य नसली तरी बहुतांश कामांनी सध्या वेग घेतला आहे.
सध्या सा.बां.विभाग क्र.२ अंतर्गत धानोरा तालुक्यात ६ कामे, गडचिरोली तालुक्यात ३ आणि चामोर्शी ५ कामे, विशेष प्रकल्प विभाग सिरोंचा अंतर्गत सिरोचा येथे ३ कामे, सा.बां.विभाग क्र.१ अंतर्गत गडचिरोलीत १४ कामे, आरमोरी येथे ७, वडसा ६, कुरखेडा ५, कोरची ५, तसेच सा.बां.विभाग आलापल्ली अंतर्गत अहेरी येथे २१ तर एटापल्ली येथे ६ कामे सुरू आहेत. या ८१ कामांवर एकूण ७०२ मजूर कार्यरत असल्याचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड यांनी सांगितले. काही कामे अंतिम टप्प्यात असून ती पूर्णत्वाकडे जात आहेत.

नक्षलवाद्यांचा अडथळा
जिल्ह्यात मंजूर असलेल्या ७ बेली ब्रिजपैकी ५ पुलांचे काम सुरू झाले होते. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी तिथे पत्रके टाकून कामात अडथळा आणला. त्यामुळे काही दिवस काम बंद होते. तरीही पावसाला सुरूवात होण्यापूर्वी दोन बेली ब्रिजची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वनविभागाचे नियमांवर बोट
मंजूर असलेली अनेक रस्ते व पुलांची कामे वनविभागाच्या अडथळ्यामुळेही अडली आहेत. नियमांवर बोट ठेवत वनविभागाकडून ती कामे थांबविली जात आहेत. विशेष म्हणजे एक नियम पूर्ण केला की पुन्हा दुसरा काही नियम पुढे केला जात असल्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण कशी करणार? असा प्रश्न बांधकाम विभागाच्या यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. विकासात्मक कामांसाठी नियमात शिथिलता देऊन कामे पूर्ण करण्यासाठी वनविभागाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

Web Title: Speed up government construction even in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.