Sattighat Mokat for smugglers | तस्करांकरिता रेतीघाट मोकाट
तस्करांकरिता रेतीघाट मोकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील वैनगंगा नदीवरील बाम्हणी व सुकळी (देव्हाडी) रेतीघाट महसूल प्रशासनाने पुन्हा मोकाट सोडल्याचे दिसत आहे. घाट लिलाव नसतांना दोन्ही रेती घाटातून रेतीचे अवैध सर्रास उत्खनन सुरु आहे. सध्या दोन्ही रेतीघाटावर रेतीचा अवैध साठा आहे. येथे महसूल प्रशासन कुणाच्या दडपणाखाली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री कामे करण्यात येथील महसूल प्रशासन मग्न दिसत आहे. नवनियुक्त पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी येथे धडक कारवाई करणार काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. येथील रेतीला प्रचंड मागणी नागपूरात आहे. तालुक्यातील बाम्हणी व सुकळी रेतीघाट रेती तस्करांना सध्या वरदान ठरला आहे. राजरोसपणे येथे रेतीचे उत्खनन सुरु आहे. नदी काठावर झाडाच्या आडोसात रेती साठा करण्यात आला आहे. तेथून यंत्राने ती ट्रकमध्ये भरली जाते. त्यानंतर ट्रकने रेती वाहतूक केली जाते. नदी पात्रात ट्रॅक्टर नेले जातात. बाम्हणी येथे सुमारे १५ ट्रॅक्टर नदीपात्रातून काठावर आणतात. हा नित्यक्रम दिवसभर व पहाटेपासून सुरु आहे.
गुरुवारी ब्राम्हणी रेतीघाट दिवसभर बंद होता. पुन्हा गुरुवारी सकाळी येथून ट्रक रेती घेऊन रवाना झाले. तुमसरपासून बाम्हणी केवळ चार किमी अंतरावर आहे. तर सुकळी (दे) रेती घाट आठ किमी अंतरावर आहे. सदर रेतघाटांची तक्रार केल्यावरही महसूल प्रशासन येथे दखल घेत नाही. महसूल प्रशासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अशी साखळी तुमसर तालुक्यात आहे. दिवसाढवळ्या नदी घाटावर रेतीचे टिप्पर रेती भरीत आहेत. ट्रॅक्टर नदीपात्रात राजरोसपणे मजूराकडून भरले जात आहेत. रेती घाट तस्करांकरिता मोकळे सोडण्याचे कारण अद्याप सर्वसामान्यांना समजले नाही. येथे केवळ दबावापोटी कारवाई होत नाही.
राज्य शासनाने वरिष्ठ अधिकारी एवढे दडपणाखाली वावरण्यामागील कारण कोणते हा संशोधनाचा विषय आहे. महसूल प्रशासनाचा येथे धाक उरला नाही. रेती तस्कर मुजोर झाले आहेत. नदी काठावरील गावागावांत रेती तस्करांची टोळके तयार झाले आहेत. त्याची मुजोरी व दादागीरी वाढली आहे. येथे पुढे स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य शासनाच्या लाखोंचा महसूल मागील काही महिन्यांपासून बुडत आहे. गावातील वातावरण दूषित होत आहे. शासकीय मालमत्तेची लूट सुरु असताना कर्तव्य बजावणारे अधिकारी केवळ उघड्या डोळयाने बघत आहेत. एवढी लाचारी पत्करण्याची कारणे कोणती अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. महसुल प्रशासनाची किमान पत सांभाळण्याची येथे गरज आहे.
भंडाराचे पालकमंत्री परिणय फुके व नव्याने रुजू होणारे जिल्हाधिकारी नरेश गीते यांनी किमान शासकीय मालमत्तेची लुट थांबविण्याकरिता प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.


Web Title: Sattighat Mokat for smugglers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.