ग्रामीण भागात सुरक्षित अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:55+5:30

दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी काही भाजीपाला व किराणा दुकानदारांनी चुन्याने चौकोनी तर काहींनी वर्तुळ आखले आहे. त्याच ठिकाणी उभे राहून ग्राहकांना सामान घ्यायचे आहे. दुकानाजवळच्या वर्तुळातील ग्राहकाला वस्तू मिळाल्यानंतर मागे असलेला ग्राहक रिकाम्या वर्तुळात सरकतो. या पद्धतीमुळे गर्दी होत नसल्याचे दिसून येत आहे.

Safe distance to the countryside | ग्रामीण भागात सुरक्षित अंतर

ग्रामीण भागात सुरक्षित अंतर

Next
ठळक मुद्देदुकानदारांनी चुन्याने आखले वर्तुळ, चौकोन : शहरी भागात मात्र तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासन, प्रशासन व आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गरजेच्या वस्तू खरेदी करताना सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी किराणा दुकान, बेकरी, फळ व भाजीपाला दुकानांसमोर ग्राहकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर चौकोनी डबे आखले आहेत. चामोर्शी, एटापल्ली शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना दुकानदारांनी सुरू केली आहे. या सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करण्याच्या व्यवस्थेमुळे एकापासून दुसऱ्याला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी झाला आहे.
दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी काही भाजीपाला व किराणा दुकानदारांनी चुन्याने चौकोनी तर काहींनी वर्तुळ आखले आहे. त्याच ठिकाणी उभे राहून ग्राहकांना सामान घ्यायचे आहे. दुकानाजवळच्या वर्तुळातील ग्राहकाला वस्तू मिळाल्यानंतर मागे असलेला ग्राहक रिकाम्या वर्तुळात सरकतो. या पद्धतीमुळे गर्दी होत नसल्याचे दिसून येत आहे. चामोर्शी शहरातही काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर चुन्याने वर्तुळ आखून त्याच ठिकाणी उभे राहून वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. एटापल्ली येथील काही किराणा दुकानदारांनीआपल्या दुकानासमोर आडवे बांबू लावले. दुकानाच्या आतमध्ये ग्राहकाला प्रवेश न देता आवश्यक वस्तू त्या बांबूजवळ नोकरांकरवी आणून दिल्या जात आहे. एक-एक ग्राहकांना वस्तू घेऊन परत पाठविले जात आहे.
लॉकडाऊनच्या या परिस्थितीत दूध, किराणा, भाजीपाला व औषधी आदी वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंची दुकाने कडकडीत बंद आहेत. बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्या. इतर लोकांपासून आवश्यक अंतर ठेवून आपले व्यवहार पूर्ण करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गडचिरोली शहरासह बाराही तालुकास्तरावरील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. मात्र इतर बाजारपेठ बंद आहे.

गडचिरोलीतील किराणा दुकानांत नियमबाह्य गर्दी
विशिष्ट अंतर ठेवून ग्राहकाला किराणा देण्याच्या नियमाची ग्रामीण भागात अंमलबजावणी सुरू झाली असली तरी गडचिरोली शहरातील अनेक किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये बुधवारी गर्दी कायम होती. विशिष्ट अंतरावर उभे राहण्याबाबत कोणत्याही सूचनेचे पालन त्यांच्याकडून केले जात नव्हते. हे चित्र असेच राहिले तर संचारबंदीच्या आदेशाचा उद्देश कितपत यशस्वी होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गुजरीतही विशिष्ट अंतराची अंमलबजावणी सुरू
आठवडी बाजार वगळता दैनंदिन भाजीपाला मिळण्याचे गडचिरोलीतील एकमेव ठिकाण असलेल्या गुजरीत नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे वृत्त बुधवारी लोकमतने प्रकाशित करताच त्याचा परिणाम दिसून आला. गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर चुन्याने वर्तुळ आखून सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाल्याची विक्री सुरू केली. भाजीपाला दुकानाजवळ ग्राहकांनी गर्दी करू नये, आखून दिलेल्या जागेतच उभे राहून भाजीपाल्याची खरेदी करावी, असे गुजरीतील दुकानदार ग्राहकांना सांगत आहेत.

उत्साही लोकांना पोलिसांनी पांगविले
प्रशासनाने १४४ कलम लागू करून संचारबंदी केली. याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. मात्र काही अतिउत्साही लोक तसेच काही युवक मुख्य रस्त्यावर तसेच जिल्हा स्टेडियमवर जमाव करीत असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने धानोरा, चामोर्शी मार्गासह स्टेडियम परिसरात जाऊन त्यांना हुसकावून लावले, पण पुन्हा सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काही लोकांनी धानोरा मार्गावर जमाव करण्याचा प्रयत्न केला. पोलीस तिथे पोहोचताच लोक आपापल्या घरी परतले.

Web Title: Safe distance to the countryside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.