कंदीलाच्या उजेडात चालायच्या धानपिकाच्या रोवण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:56+5:30

जोरदार पाऊस बरसला तरच रोवणीच्या हंगामाला उधाण येत असे. त्यात रोवणी आणि महिला यांचे अतूट असे नाते, एवढे कि महिलांशिवाय रोवणीची कल्पना पण होऊ शकत नाही. परंतु आजपासून ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आतासारखी रोवणीची गुत्ता (हुंडा) पद्धत नव्हती. त्यामुळे येथील महिला पारोग (प्रहर) पद्धती आणि दिवसाच्या रोजीने (वणीने) धानपीक रोवणी करीत असत.

Rows of grain to walk in the light of the lantern | कंदीलाच्या उजेडात चालायच्या धानपिकाच्या रोवण्या

कंदीलाच्या उजेडात चालायच्या धानपिकाच्या रोवण्या

Next
ठळक मुद्देतीन दशकांपूर्वीपर्यंत पारोग पद्धतीने रोवणी : रोवणी यंत्र आले पण महिलांची दादागिरी कायम

अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : काळानुरूप शेतीचे यांत्रिकीकरण होऊन शेतीची कामे दिवसेंदिवस सोपी होत आहेत. मात्र आजपासून ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत महिला धानपीकाच्या शेतात रोवणी करताना दिवसाच्या रोजीसह पारोग (प्रहर) पद्धतीने काम चालत असे. महिला सकाळी सूर्योदयापूर्वी आणि सायंकाळी सूर्यास्तानंतरही शेतात असायच्या. परिणामी अंधार पडताच कंदीलाच्या उजेडात धान पीकाची रोवणी केली जात असे.
फार पूर्वीपासून धानाच्या शेतातील रोवणीची कामे महिलाच करतात. धान पेरणी झाल्यावर २१ दिवसानंतर रोवणी सुरू होत असे. मात्र जोरदार पाऊस बरसला तरच रोवणीच्या हंगामाला उधाण येत असे. त्यात रोवणी आणि महिला यांचे अतूट असे नाते, एवढे कि महिलांशिवाय रोवणीची कल्पना पण होऊ शकत नाही. परंतु आजपासून ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आतासारखी रोवणीची गुत्ता (हुंडा) पद्धत नव्हती. त्यामुळे येथील महिला पारोग (प्रहर) पद्धती आणि दिवसाच्या रोजीने (वणीने) धानपीक रोवणी करीत असत.
पारोग म्हणजे दोन-तीन तासांचा अवधी. ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतात रोवणी सुरू करायची आहे तो शेतकरी गावातील किंरा गावाबाहेरील महिलांना भेटून कामावर येण्यास बोलणी करत असे. यादरम्यान जो अधिक पैसे देणार त्याकडे महिला कामावर जात.
पारोग पद्धती असल्यामुळे स्त्रीया पहाटे तीन वाजता झोपून उठत असे. उठल्यावर घर-दार आणि अंगण झाडझूड, सडासारवण केल्यावर सकाळचे जेवण शिजवून पहाटेच्या चार-साडेचार वाजताच रोवणीला घरून निघत असे. मात्र पहाटे काळोख असल्यामुळे शेतकरी कंदिलाच्या उजेडात महिला मजुरांना शेतात सोबत घेऊन जात असे.
आतासारखे शेतशिवारावर जाणारे पांदण रस्ते तेव्हा नसल्याने चिखल तुडवत पायवाटेने शेत गाठले जात होते. घरापासून शेताचे अंतर नेमके किती आहे त्यावरून महिला घरून निघत. त्यामुळे सूर्योदय होण्याआधीच महिला मजूर शेतावर पोहचत. त्यावेळी वातावरणात पुसटसा अंधार पसरला असला तरीही महिला कंदीलाच्या प्रकाशात धान रोप रोवायच्या. शेतमालक बांधित वा बांधावर कंदील पकडून उभा राहून प्रकाश दाखवत असे. मात्र आता ही पध्दत बंद झाली आहे.

सकाळी ८ वाजता शेतातून घरी
सकाळी सात-आठ वाजतापर्यंत दिवसातील रोवणीचा पहिला पारोग संपत असे. पारोग संपताच महिलांचा जत्था पायीच घराच्या दिशेने निघे. घरी येताच आंघोळ करून आधी कुटुंबातील सदस्यांचे कपडे धुऊन काढत, मगच जेवण करीत असे. या दरम्यान ज्या कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धती होती तिथे घरातील अन्य महिला सदस्य काम करून ठेवत असे. अन्यथा कामाचा डोंगर पार करताकरता दिवसाच्या रोजीवर जायची वेळ झाली राहायची.

उजेडासाठी शेतमालक पकडायचा कंदील
सकाळी अकरा वाजेपासून दिवसाच्या रोजीला (वणीला) सुरु वात होत असल्यामुळे महिला घरून एक तासापूर्वीच निघत. ११ ते ५ वाजेपर्यंत धान रोवणी झाल्यावर परत दुसऱ्या पारोगाला आरंभ होत असे. सूर्य क्षितिजापलीकडे गेल्यावरही रोवणी सुरूच असे. परिणामी काळोख दाटू लागताच पुन्हा शेतमालक कंदील घेऊन शेतामध्ये उभा राहून प्रकाश दाखवत होता. सायंकाळी सात वाजतापर्यंत रोवणी चालू राहात असत. सरतेशेवटी रात्री आठ वाजता महिला कंदीलाच्या टिमटिमत्या प्रकाशात घरी पोहचत.

चार आण्यांपासून दोन रुपयापर्यंत मजुरी
याबाबत विसोरा, शंकरपूर, कसारी येथील महिला-पुरु षांशी बातचीत केली असता एका पारोगाला चार आणे (२५ पैसे), आठ आणे (५० पैसे), बारा आणे (७५ पैसे), एक रु पया, दोन रुपये मजुरी होती असे त्यांनी सांगितले. त्या तुलनेत दिवसाची मजुरी दुप्पट मिळत होती. विसोराच्या कस्तुरबा नगर येथे राहणाऱ्या जानका नेवारे सांगतात, चार आणे ते एक रु पया रोजीने त्यांनी धान रोवणी केली आहे. कसारीच्या भिवरा मडावी म्हणाल्या, मी माझ्या जीवनात अनेक वेळा कंदीलाच्या उजेडात धान रोवणी केली आहे. आज धान रोवणी यंत्र आले, तरीपण महिलाच घरातील संपूर्ण कामे करून धानपीक रोवणीची कामे करायला जातात. यातील त्यांची मक्तेदारी अजूनही कायम आहे.

Web Title: Rows of grain to walk in the light of the lantern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.