रिक्त पदांमुळे पीएचसी खिळखिळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कमलापूर : अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैैद्यकीय अधिकारी गट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ या प्रवर्गासह प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अन्य आरोग्य कर्मचाºयांची एकूण सात पदे रिक्त असल्याने सेवेवर परिणाम झाला आहे. परिणामी यामुळे आरोग्य सेवा खिळखिळी झाली आहे.
कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एक आरोग्य पथक, नऊ उपकेंद्राचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ हजार ९०० एवढी लोकसंख्या आहे. या व्यतिरिक्त आरोग्य केंद्रात दररोज ओपीडीमध्ये रूग्णांवर औषधोपचार करण्यासाठी विविध १६ पदे मंजूर आहेत. यामध्ये गट ‘अ’ व ‘ब’ प्रवर्गाचे दोन वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपीक, औषध निर्माण अधिकारी, दोन आरोग्य सहायक, एक आरोग्य सहायिका, नेत्र चिकित्सक, वाहन चालक, तीन परिचर, एक सफाईगार आदी पदांचा समावेश आहे.
या आरोग्य कर्मचाºयांच्या भरवशावरच रूग्णांवर उपचार करणे शक्य आहे. मात्र येथे मागील काही महिन्यांपासून गट ‘ब’ प्रवर्गाचे वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपीक, नेत्र चिकित्सक, वाहन चालक, दोन परिचर आदी सात पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांची कामे अन्य कर्मचाऱ्यांना करावी लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य पथक व उपकेंद्रातील बहुतांश पदे रिक्त असल्याने रूग्णांवर वेळीच उपचार होण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे रूग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. लोकसंख्येचा विचार करता कमलापूर येथे गट ‘ब’ च्या वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती लवकर करणे आवश्यक आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा पुढील काळात उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.