आता आठ रूग्णालयांत मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:50+5:30

गरीब कुटुंबांना खासगी व सरकारी रूग्णलायांमध्ये मोफत उपचार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. पिवळे, केशरी, अंत्योदयचे रेशन कार्ड असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र मानले जातात. २०१२ मध्ये ही योजना राज्यातील निवडक आठ जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश होता.

Now free treatment in eight hospitals | आता आठ रूग्णालयांत मोफत उपचार

आता आठ रूग्णालयांत मोफत उपचार

Next
ठळक मुद्देमहात्मा फुले जनआरोग्य योजना : अहेरी, कुरखेडा, आरमोरी आणि चामोर्शीवासियांसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेसोबत आता जिल्ह्यातील आठ रूग्णालये संलग्नित झाली आहेत. त्यामुळे आता त्या रूग्णालयांमध्येही या योजनेतून मोफत उपचार मिळण्याची सोय निर्माण झाली आहे.
नव्याने करारबद्ध झालेल्या रूग्णालयांमध्ये अहेरी, कुरखेडा व आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालये, चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालय, गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालय, तसेच खासगी रूग्णालयांमध्ये गडचिरोली येथील सिटी हॉस्पिटल आणि धन्वतंरी हॉस्पिटलचा समावेश आहे. जिल्हा रूग्णालये यापूर्वीच करारबद्ध आहेत. योजनेची माहिती देण्यासाठी प्रत्येक रूग्णालयात एक आरोग्य मित्र नेमण्यात आला आहे. हा आरोग्य मित्र रूग्णांना योजनेची माहिती देऊन त्याला योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी मार्गदर्शन करतो.
गरीब कुटुंबांना खासगी व सरकारी रूग्णलायांमध्ये मोफत उपचार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. पिवळे, केशरी, अंत्योदयचे रेशन कार्ड असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र मानले जातात. २०१२ मध्ये ही योजना राज्यातील निवडक आठ जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश होता. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे उत्पन्न कमी असल्याने जवळपास ९० टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या जरी अधिक असली तरी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय हे एकच रूग्णालय या योजनेसोबत जोडले असल्याने केवळ याच रूग्णालयात मोफत उपचार मिळत होते. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यास मर्यादा येत होत्या. आता नवीन सात रूणालये करारबद्ध झाल्याने लाभार्थी वाढणार आहेत.
योजनेचा लाभ देण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्याची नोंदणी केली जाते. नोदणीच्यावेळी आधारकार्ड व रेशनकार्ड ही दोन महत्त्वाची कागदपत्रे आहेत. नोंदणी झाल्यानंतर संबंधित रूग्णावर उपचार किंवा शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र एखाद्याला आकस्मिक उपचार आवश्यक असल्यास त्याच्यावर सर्वप्रथम उपचार केले जातात. उपचारानंतर ७२ तासांमध्ये रूग्णाला कागदपत्रे सादर करून नोंदणी करता येते.

आतापर्यंत १० हजार रूग्णांवर उपचार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सुरूवातीपासून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील ९ हजार ९३७ रूग्णांवर उपचार करण्यात आला आहे. त्यासाठी २१ कोटी ७१ लाख ८० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. ह्रदयाशी संबंधित रोग असल्यास रूग्ण नागपूर किंवा वर्धा येथील रूग्णालयांमध्ये उपचार घेण्यास पसंती दर्शवितात. त्यामुळे येथील आरोग्य मित्र त्यांना तेथे पाठवितात. उपचारासोबतच, जेवण व रूग्णाला घराकडे परत जाण्याचा खर्च या योजनेंतर्गत केला जाते.

९९६ रोगांवर उपचार व शस्त्रक्रिया
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ प्रकारच्या रोगांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामध्ये नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थीव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया, मेंदू व मज्जासंस्था यांच्या संबंधित आजार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रूग्णावर उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचा, सांधे, फुफुसाशी संबंधीत आजार, कर्करोग, मानसिक आजार, इंटरव्हेशनल रेडिओलॉजी आदी उपचार मिळतात.

पिवळे, केशरी आणि अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील सदस्य या योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी पात्र असतात. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र बरेच नागरिक गडचिरोलीला उपचारासाठी येताना सोबत रेशकार्ड व आधारकार्ड आणत नाही. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ देता येत नाही. पुन्हा रेशन व आधार कार्डासाठी गावाकडे परत जावे लागते. परिणामी उपचारास उशिर होतो. त्यामुळे प्रत्येक रूग्णाने आपल्यासोबत रेशन कार्ड व आधार कार्ड आणल्यास योग्य होईल.
- लिलाधर धाकडे,
जिल्हा प्रमुख, महात्मा फुले जनआरोग्य योजना

Web Title: Now free treatment in eight hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.