‘तो’ मृत नक्षलवादी होता पेरमिली दलमचा कमांडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 03:38 PM2020-07-04T15:38:28+5:302020-07-04T15:38:46+5:30

दलम कमांडर सोमा उर्फ शंकर याच्यावर गडचिरोली पोलीस दलातील अनेक ठाण्यांमध्ये १५ गुन्हे दाखल आहेत.

‘That’ naxal was a commander of the Permili Dal | ‘तो’ मृत नक्षलवादी होता पेरमिली दलमचा कमांडर

‘तो’ मृत नक्षलवादी होता पेरमिली दलमचा कमांडर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी (दि.३) झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटली असून तो पेरमिली दलम कमांडर कोटे अभिलाष उर्फ चंदर उर्फ शंकर उर्फ सोमा (३६) असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर राज्य शासनाने आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभाग अंतर्गत मौजा येलदमडी जंगल परिसरात शुक्रवारी सायंकाळी सी-६० कमांडोंसोबत नक्षलवाद्यांची चकमक उडाली होती. त्यानंतर घेतलेल्या शोधमोहिमेत एका मृतदेहासह एक बंदूक, दोन प्रेशर कुकर, वायर बंडल, दोन वॉकीटॉकी, कॅमेरा फ्लॅश, २० पिट्टू आणि इतर नक्षल साहित्य पोलीस पथकाच्या हाती लागले होते. शनिवारी (दि.४) मृत नक्षलवाद्याची ओळख पटविण्यात यश आले.
मृत सोमा उर्फ शंकर हा तेलंगणा राज्यातील कारापल्ली (जि. मुलुगू) येथील रहिवासी होता. तो २००८-०९ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला होता. २०१२-१३ पासून गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना २०१८-१९ मध्ये त्याच्याकडे पेरमिली दलम कमांडर म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्याच्या मृत्यूमुळे नक्षल दलमला हादरा बसला आहे.

विविध ठाण्यात १५ गुन्ह्यांची नोंद
दलम कमांडर सोमा उर्फ शंकर याच्यावर गडचिरोली पोलीस दलातील अनेक ठाण्यांमध्ये १५ गुन्हे दाखल आहेत. त्यात खुनाचे ५ गुन्हे, चकमकीचे ५ गुन्हे, जाळपोळीचे ३, दरोड्याचा १ आणि इतर १ अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावर ८ लाखांचे बक्षीस ठेवले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या जहाल नक्षलवाद्यास कंठस्नान घालणाऱ्या सी-६० कमांडोंच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना रोख पारितोषिक जाहीर केले.

Web Title: ‘That’ naxal was a commander of the Permili Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.