Naxal-free elections for the first time in 3 years | २५ वर्षांत प्रथमच नक्षल कारवायामुक्त निवडणूक

२५ वर्षांत प्रथमच नक्षल कारवायामुक्त निवडणूक

ठळक मुद्देपोलीस दलाने रचला इतिहास : विक्रमी मतदानासह जिल्हा राज्यात दुसरा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकशाही प्रणालीतील महत्वाचा घटक असणाऱ्या निवडणुकांमध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांनी प्रत्येक निवडणुकीत केले आहेत. त्या प्रयत्नात अनेक वेळा पोलीस दलातील जवानांना शहीद व्हावे लागले तर कधी जखमी व्हावे लागले. पण यावेळची विधानसभा निवडणूक गेल्या २५ वर्षात प्रथमच नक्षली कारवायामुक्त आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता झाली. विशेष म्हणजे यावेळची मतदानाची टक्केवारी (७०.२६ टक्के) राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत द्वितीय क्रमांकाची ठरली आहे. पोलीस दलाच्या योग्य नियोजनासोबतच जवानांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले असून लोकांना नक्षलवाद नको, तर लोकशाही मार्गाने विकास हवा आहे, हेच यातून सिद्ध होत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात यावेळी झालेल्या वैशिष्ट्ययपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दलची माहिती शुक्रवारी (दि.२५) पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मतदार जनजागृतीसाठी तयार केलेल्या स्वीप समितीचे सदस्य सचिव तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग हेसुद्धा उपस्थित होते.
नेहमीप्रमाणे यावेळीही नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनर आणि पोस्टरबाजी करून अनेक भागातील आदिवासी नागरिकांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. मात्र मलमपडूर आणि परिसरातल्या गावकऱ्यांनी नक्षल्यांनी लावलेले बॅनर व पोस्टरची होळी करून त्या भागात ६३.६३ टक्के मतदानाची नोंद केली. ही नक्षलवाद्यांसाठी जोरदार चपराक ठरली. याच पद्धतीने अनेक संवेदनशिल भागात मतदारांनी भरघोस मतदान करत त्यांच्या मनात असलेली नक्षलवादाबद्दलची चिड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातील सी-६० पथकाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर नक्षलविरोधी अभियान राबविले. महारापोलीस दलाने रचला इतिहास : विक्रमी मतदानासह जिल्हा राज्यात दुसऱ्या दिनी जांभुळखेडा येथे घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटासाठी नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या लवारी गावातील लोक यापूर्वीही नक्षलवाद्यांना मदत करत होते. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत तेथील मतदान केंद्र मरारटोला येथे हलविण्यात येत होते. मात्र यावेळी गावकºयांनी नक्षलवाद्यांना गावबंदीचा ठराव करत पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन माफी मागितली. त्यांचा प्रतिसाद पाहून लवारी येथेच यावेळी मतदान केंद्र ठेवण्यात आले. त्याला गावकºयांनी चांगला प्रतिसाद देत ८०.८० टक्के मतदान केले.
याशिवाय गडचिरोलीपासून २२० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशिल व अतिदुर्गम मेंढरी येथील मतदान केंद्र सुरक्षेच्या कारणावरून पिपली बुर्गी किंवा जवेली खुर्द येथे हलविण्यात येत होते. यावेळी मात्र ग्रामस्थांचा उत्साह पाहता हे मतदान केंद्र मेंढरीतच ठेवण्यात आले. २५ वर्षात पहिल्यांदाच या गावात नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावत ६३.९९ टक्के मतदान केले. यापूर्वीच्या नक्षली कारवायांचा अभ्यास करून यावेळी नियोजन करण्यात आले.

निवडणुकीदरम्यान दारूबंदीचे २३७ गुन्हे
नक्षलवादावर अंकुश ठेवण्याची महत्वाची जबाबदारी सांभाळताना पोलीस दलाने भयमुक्त आणि दारूमुक्त निवडणुकीसाठीही विशेष मेहनत घेतली. निवडणुकीच्या काळात पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये ३०६ आरोपींवर २३७ गुन्हे दाखल करून २३ हजार ७८१ लिटर दारू जप्त केली. या कारवायांमध्ये एकूण ७६ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याशिवाय ४९४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

आचारसंहितेदरम्यान तीन चकमकी, साहित्य जप्त
आचारसंहितेच्या काळात पोलीस व नक्षलवाद्यांत ३ चकमकी झाल्या. त्यात पोलीस वरचढ ठरल्याने नक्षलवाद्यांना साहित्य सोडून पळ काढावा लागला. त्यात ४ बंदुका, गावठी बनावटीचे १४ हॅन्ड ग्रेनेड, १४ मोटार सेल, १२ डिटोनेटर कॉरडेक्स, १० किलोग्रॅम जिलेटीन, १ किलो गन पावडर याशिवाय दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. सी-६० कमांडोंनी लांब पल्ल्याचे आणि आखूड पल्ल्याचे अभियान प्रभावीपणे राबविताना छत्तीसगडच्या सीमेपर्यंत नक्षल्यांना सळो की पळो करून सोडले. या चकमकीत काही नक्षलवादी मारले गेले असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. मात्र कोणाचे मृतदेह हाती लागलेले नाही.

गावभेटीतून घेतले नागरिकांना विश्वासात
गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून तब्बल २६५ किलोमीटर अंतरावर असलेले पातागुडम हे सर्वात दूरचे मतदान केंद्र होते. मतदानाच्या काही दिवस अगोदर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जाऊन तेथील गावकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे गावकºयांचा प्रशासनाबद्दलचा विश्वास वाढला आणि नागरिकांनी मतदानाला मोठा प्रतिसाद दिला. त्या केंद्रावर तब्बल ८२.२६ टक्के मतदान झाले.

जांभुळखेडा भूसुरूंग स्फोटासाठी मदत करणाऱ्या लवारीतील काही नागरिक नक्षलवाद्यांमुळे भरकटले होते. पण पोलीस कारवाईनंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांच्या विनंतीनुसार यावेळी मतदान केंद्र त्यांच्या गावात ठेवले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मार्ग चुकलेले लोक जर योग्य वळणावर येऊ इच्छित असतील तर त्यांना आम्ही निश्चितच मदत करणार.
- शैलेश बलकवडे,
जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: Naxal-free elections for the first time in 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.